वाचन आणि भोजन


माझ्या अगदी पहिल्या आठवणी औरंगाबादच्या आहेत. इयत्ता ७वी पर्यंत आम्ही औरंगाबादला होतो. ते वय नाजूकच असतं... मी काही त्याला अपवाद नव्हतो! आणि या वयातच मी दोघींच्या प्रेमात पडलो – मुली नव्हेतदोन गोष्टी.

लहानपणापासूनच मी तसा एकलकोंडा. थोडासा माणूसघाणाच म्हणा ना! शारिरीक, आडदांड खेळांपासून दूर पळणारा. या वयात माझी पुस्तकांशी पहिली दोस्ती झाली. त्या पुस्तकातल्या जगात मी हरवून जाऊ लागलो – राजे, राण्या, राजकन्या, त्यांना पळवून नेणारे, त्रास देणारे राक्षस – आणि ते राजपुत्र,  ती जंगले, पक्ष्याच्या पोटात आपले जीव ठेवणारे दुष्ट जादूगार ! मी या अद्भुत विश्वाच्या प्रेमात पडलो.  वाचण्याची माझी भूक वाढतच गेली. सुदैवाने माझ्या एका मावशीकडे गोष्टीच्या पुस्तकांची एक मोठी पेटी होती. माझ्यासाठी खजिन्याचीच! थोडा मोठा झाल्यावर राजे-राण्या यांच्या जगातून मी मराठी कथाकादंबऱ्यांकडे वळलो. महाराष्ट्रातली सार्वजनिक ग्रंथालयांची परंपरा माझ्या या वेळी मदतीला आली. माझं पुस्तकांवरचं प्रेम कायम ठेवायला त्यांनी मदत केली. मी वेड्यासारखी पुस्तकं वाचली! अजूनही वाचतो. दुष्काळातून आलेली बकरी ज्याप्रमाणे चारा खाईल, त्याप्रमाणे मी पुस्तकांची पानं खाल्ली – खातो. पुस्तकांवर, वाचण्याच्या माझ्या सवयीवर मी मनापासून प्रेम केलं!!

पुस्तकांबरोबर माझी दुसरी आवड – खाण्याची! तिखट, गोड,कडू,आंबट – मला काहीच वर्ज्य नव्हतं! लहान म्हणून, माझ्या खाण्याच्या आवडीचं सुरुवातीला कौतुक झालं. मी पण चुकत माकत का होईना – पण बहुधा बरोबर कॉमेंट्स देत गेलो. कशात मीठ बरोबर आहे, वेलची कमी आहे का जास्त, लसूण आणि तिखट प्रमाणात आहेत का – यासारखे छोटेच पण महत्त्वाचे सल्ले मी द्यायला लागलो आणि बहुतांश बरोबर असल्याने; आईही मला विचारायला लागली. पुरणपोळी, उपमा, मसालेभात, गुलाबजाम, वांग्याची भाजी – हे माझे विशेष आवडते. खाण्यावरच्या माझ्या प्रेमातले माझे रुचकर सहभागी. मसाले;, गूळ, साखरेचा खमंगपणा, सुरेख तळल्या गेलेल्या वड्यांचा तोंडाला पाणी आणणारा स्वाद; श्रीखंडातलं केशर; पोह्यांवर पेरलेला ओल्या नारळाचा कीस आणि कोथिंबीर – या सगळ्यांनी माझ्या खाण्यावरच्या प्रेमाला एक स्वादिष्ट सुरुवात करून दिली.

वाचन आणि खादाडी – एक couch potato बनण्याची ती सुरुवात होती. पहिलं प्रेम विसरता येत नाही याचीअनुभूती घेत; आज एवढं वय वाढूनही मी या माझ्या पहिल्या प्रेमांमध्ये बुडूनच राहिलो आहे!!


अभिजित टोणगांवकर

2 comments: