टळटळीत उन्हात, प्लास्टिकच्या कागदावर, रांगांमध्ये चिकटून बसलेल्या त्या गोल गोल गिरिक्यांच्या... पिवळसर पांढऱ्या... चक्राकृती भिंगऱ्या अंग आक्रसून बारीक झाल्या होत्या. एकीला हळूच हाताने उचलल्या बरोबर ती अलगद माझ्या हातात आली. पालथी केली तर मध्यभागी जिथे वेटोळे जाडसर होते,तिथे किंचित ओलसर मऊ लुसलुशीतपणा हाताला जाणवला.....
मग तिला तशीच उन्हात उताणी झोपवून बाकी सगळ्यांनाही उलथंपालथं केलं .... मग लक्ष गेलं ताटात गोल फेर धरून उभ्या असलेल्या छोट्या छोट्या सांडग्यां कडे! हात लावताच ते सुट्टे झाले होते.... ताटा पासून. पटकन एक उचलला अन् तोंडात टाकला.... त्या रणरणत्या लख्ख उन्हातही नकळत डोळे मिटले गेले.... वरून कडकडीत वाळलेला आणि आत मऊ.... लुसलुशीत गर असलेला सांडगा..... जीभेतून मेंदूपर्यंत एक सुखद संवेदना देऊन गेला.... थोडा कडक... थोडा मऊ... थोडा आंबूस...थोड्या खारवट चवीच्या त्या सांडग्याने गेल्या चार-पाच दिवसातील कष्टांचे जणू चीज केले होते. परदेशी बनावटीच्या.... वरून कडक असलेल्या चॉकलेट मधील वाइनची चव घेताना बहुदा असंच काहीतरी वाटत असावं... चवीनं खाणाऱ्यांना!
या घमघमणाऱ्या वासाने गृहिणी मात्र खूष होते.... छान आंबलेत गहू.... आता कुरडया छानच होणार.... याचा घमघमता पुरावाच मिळतो तिला! असे तीन ते चार दिवस रोज पाणी बदलून भिजवलेले गहू, उन्हाळ्यातील उकाड्यात छान टपोरले, की ते वाटायचे..... त्यावेळी होणारा रबरबाट न टाळता येणारा..... पण तो गाळून त्याचं सत्व काढताना त्यात परत परत पाणी घालून गव्हाच्या चोथ्याला चोळून मोळून स्वच्छ करताना हाताच्या बोटांना आणि मनगटांनाही छानच व्यायाम होतो. आणि त्यातून पाण्यात विरघळणारे सत्व मनाला एका आनंदाची अनुभूती देते. ही सगळी प्रक्रिया करताना सगळ्या घरादाराला आंबूस वासानं ग्रासलेलं असतं.... ग्रासेनात का बिचारे! हीच नाकं मुरडणारी माणसं उद्या डोळे मिटुन गरमागरम चीक जिभेने घोळवत खाणार आहेत हेही माहीत असतं.
असा हा चीक... रात्रभर झाकून ठेवला की दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे त्यावरचं पाणी काढून टाकायचं.... आणि मग हे गव्हाचं सिमेंट हळूहळू एखाद्या मजबूत डावाने आणि नंतर बोटांनी सोडवायचं.... हलकं करायचं... प्रवाही करायचं... हा सगळा अक्षरशः व्यायाम प्रकार... दमवणारा!
उकळत्या पाण्यात मीठ घालून मग एकीने हे गव्हाचं दूध बारीक धारेने पाण्यात सोडायचं आणि दुसरीने लाकडी दांड्याने त्याला हलवून एकजीव करायचं....
फिरणार्या पाण्यात हळूहळू घट्ट होत जाणारं हे सत्व तुमच्यातील सत्वाची परीक्षा बघतं.... आणि काही मिनिटांत तुमच्या ताकदीचा परमोच्च बिंदू गाठून मग चकचकीत चीकात त्याचं सुखद परिवर्तन होतं..... बाळंतपणाच्या कळा सोसाव्या आणि त्यानंतर बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मातृत्वाने सगळे कष्ट विसरून आनंदात बुडून जावं असंच काहीसं यावेळी वाटतं!
तर असा हा चार दिवस घरादाराला छळणारा.... रुपरंग बदललेला... गरमागरम चकचकीत चीक.... ताटलीत घेऊन त्यावर तेलाची धार सोडून खाताना....घरादाराला वर्षातून एकदाच मिळणारी खास चव कायमची स्मरणात ठेवायला लावतो. आणि हा स्पेशल खाण्यासाठीच शिजवला असेल तर त्यातील हिंगाची चिमूट...... अहाहा!!! असं म्हणायला लावल्यावाचून राहत नाही. तर गव्हाचे सत्व खाण्याचा हा सात्विक सोहळा वर्षातून एकदा प्रत्येकाने अनुभवायलाच पाहिजे असा!
ऊन्हं चढायच्या आंत.... कोवळ्या ऊन्हात दोन पायांवर बसून.... प्लास्टिकच्या कागदावर सोर्यातून एक सारख्या मापाची गोल गोल कुरडई घालणं हे देखील एक कौशल्य! इथे पण दोघी जणी!.... हे एकट्या बाईचं काम नाही..... एकीनं गरमागरम चीक साच्यात गळ्यापर्यंत निपटून भरून द्यायचा.... प्रत्येक वेळी रिकामा झालेला सोर्या गार पाण्यात हात घालून स्वच्छ करून घ्यायचा.... आणि दुसरीने कागदावर आखीव-रेखीव रांगांमध्ये फारशी दाटीवाटी न करता सगळ्या कुरडया शिस्तीत बसवायच्या. सगळा चीक संपला तरी भांड्याला भरपूर चिकटलेला चीक नंतर त्याला घडवण्याच्या पलीकडे गेलेला असतो, मग तो चांगला हाताने निपटून एखाद्या ताटलीत त्याचे छोटे-छोटे सांडगे घालून वाळत ठेवायचा. गरमागरम चीक खाणे हा जसा आनंद.... तसंच अर्धवट वाळलेले सांडगे खाणं..... हाही एक अपूर्व आनंदच!
मग मन तिसऱ्या आनंदाची वाट बघायला लागतं.... दोन-तीन दिवस उलथ्या पालथ्या करून वाळवलेल्या नाजूक घेरदार कुरडया मग हलक्या हाताने ताटामध्ये विराजमान होतात.... रात्रीच्या जेवणात सगळे वाट बघतात.... या वर्षीची पांढरीशुभ्र.... कुरकुरीत... तोंडात विरघळणारी.... ती अवीट आंबुस... किंचित खारी चव अनुभवायला.... कढईतल्या धुरकट गरमागरम तेलात पहिली सोडलेली कुरडई चारी अंगांनी कढई भर पांढरीशुभ्र फुललेली बघणं हा त्या गृहिणीच्या दृष्टीने आनंदाचा सोहळा असतो. ती फुललेली पहिली कुरडई बघण्याचं दृष्टी सुख काय असतं ते कुरडई करून बघितल्याशिवाय कळणार नाही. जीभेवरून पोटात विरघळणारी कुरडई मग गहू भिजत घातलेल्या पासूनचा तिचा सगळा हाल-अपेष्टांचा प्रवास विसरायला लावते. प्रत्येक वर्षीच्या उन्हाळ्यातला हा अनुभव दर वर्षी पुन्हा नव्याने येतो.
पोलपाटावर पहिला पापड लाटताना काढलेले नकाशे.... आणि हातावर हळूहळू नियंत्रण येऊन हलक्या हाताने गोल गरगरीत लाटलेले पापड, नंतर लाटण्यावर हलक्या हाताने उचलून वाळण्यासाठी कागदावर टाकतानाचे कौशल्य आठवले की आता जाणवते... किती अपूर्व आनंद दिला या गोष्टींनी आपल्याला! अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकून, त्यातील कौशल्य आत्मसात करता करता नकळत आपल्यातला आत्मविश्वास वाढत जातो. कोणतीही गोष्ट चिकाटीने शिकली तर ती आपल्याला उत्तम प्रकारे येऊ शकते हा विश्वास आपल्यात निर्माण होतो. या छोट्या-छोट्या कौशल्यातून आपल्या नकळत आपण अनेक कौशल्ये सहजगत्या शिकतो. फक्त त्याचा पाया या अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये होता याची आपल्याला बरेचदा जाणीव नसते.
उन्हाळ्यात रणरणत्या उन्हात आमचा मुक्काम गच्चीतच असायचा.... पापड... पापड्या... कुरडया... सांडगे... हे सगळे वाळत आले की उलटेपालटे करून पुन्हा नीट वाळत घालायचे... वाऱ्याने उडू नये म्हणून कागदावरची वजने नीट ठेवायची आणि सगळ्यात शेवटी सगळे वाळलेले पदार्थ नीट गोळा करून ठेवायचे.... यात या सावलीच्या कोपऱ्यात बसून अर्धवट वाळलेला.... अर्धवट ओला... हा उन्हाळी मेवा दाटीवाटीने बसून आम्ही गुपचूप मटकवत असू.... जोडीला गप्पाटप्पा... मस्ती... आणि खिदळणं! डोक्यातून घाम गळत असला तरी त्याची पर्वा आम्हाला नसायची.... आणि उकाडा तर अजिबात जाणवायचा नाही! हे सगळे पदार्थ छान वाळले की ते पहिल्यांदा खाताना खूप मजा यायची. आईचा चेहरा सुद्धा पापड कुरडई सारखा फुललेला असायचा. पदार्थाचे कौतुक करून करून आम्ही हा कुरकूरीत... तेलकट... खमंग खाऊ आवडीने खात असू.
हे गच्चीत तापणं, तापवणं संपत आलं की तोपर्यंत एकीकडे कैरीच्या लोणच्याचा हंगाम चालू व्हायचा. लालबुंद... दळदार तिखट, मोहरीची घरी केलेली पिवळी काळसर डाळ... मेथीची पूड करताना येणारा कडवट वास आणि चांगल्या तापलेल्या तेलाचा वास नाकात शिरायचा. हिरव्याकंच कैरीच्या करकरीत... हळद मीठ लावलेल्या फोडी गालात ठेवून चघळतना तोंडाला पाणी सुटायचं... लोणचं घातलं की ते मुरेपर्यंत दोन तीन दिवसाचा वेळ काढणं असह्य वाटायचं. मग एक दिवस तेलाच्या लालबुंद तवंगात.... मसाल्यात अंगभर बुडालेल्या करकरीत पांढऱ्या हिरव्या रंगाच्या फोडींचं दर्शनच भूक दुप्पट करायचं! अशा आंबट.. तिखट... करकरीत फोडीं बरोबर पोळ्यांवर पोळ्या खाल्ल्या जायच्या... पुरी असेल तर मग मेजवानीच!
एकीकडे आंब्यांचा घमघमाट हळूहळू दरवळायला लागलेला असायचा.... सुरुवातीला कधीमधी होणारा आंब्याचा रस मग रोजच व्हायचा. आणि मग लालबुंद लोणचं, कूरकूरीत पापड.. कुर्डया.. आंब्याचा रस आणि आईच्या हातच्या पदर सुटलेल्या खमंग मऊसूत पोळ्या अशी सगळी सुट्टी सार्थकी लागायची!
तेव्हा अजून आईस्क्रीम बाजारात खूप उपलब्ध नव्हतं. पण लिंबाचं सरबत... कैरीचं पन्हं... चैत्र गौरीची कैरीची डाळ... टरबूज... खरबूज... कोकम सरबत... घरी केलेल्या दह्याची लस्सी... सोलकढी... फणसाचे गरे... काळी काळी डोंगरची मैना... जांभळं... कैरीचा साखर आंबा असा आमचा उन्हाळी वसंत फुललेला असायचा. त्याचा बहर आम्ही विविध अंगांनी उपभोगायचो. आजही त्यातल्या काही गोष्टी शिल्लक आहेत. काही आयुष्यातील धावपळीत आणि बिन गच्चीच्या फ्लॅट संस्कृतीत काळा आड गेल्या. पण अस्सल पारंपारिक ऊन्हाळा आमच्या पिढीने मात्र मनमुराद उपभोगला.
(सर्व फोटो गूगल च्या सौजन्याने)
माधुरी राव
फारच छान लेख! लहानपणीच्या आठवणी परत ताज्या झाल्या.
ReplyDelete