'वीज' वाचल्यानंतर मनात उरते ती एक शून्य, असहाय्य जाणीव, रिकामपण, आयुष्याला अर्थच नाही ही सर्व काही संपून गेल्यानंतर उरणारी पोकळी. 'पिंगळावेळ' संग्रहामधली ही कथा 'हंस' मध्ये प्रकाशित झाली होती. त्या संग्रहातल्या काही कथांना खूप मान्यता, प्रसिद्धी मिळाली उदा. 'स्वामी', 'कैरी', 'यात्रिक' अगदी 'घर' या कथेवर सुद्धा एक लेख वाचल्याचे स्मरते. त्यामानाने वीज या कथेला पुरेसा न्याय मिळालेला नाही. जीएंच्या कथाविश्वात या कथेला एक महत्वाचे स्थान आहे असे मला वाटते. जीएंच्या कथांमध्ये आढळणारी प्रमुख वैशिष्ठे जसे की प्रवास, अस्तित्ववाद, घट्ट बांधेसूदपणा, प्रतिमा, दृशात्मकता, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, शोकात्मता इ. या कथेमध्येही आढळतात.
काळम्माचे
मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा अत्यंत परिणामकारकरित्या एखाद्या
कॅमेऱ्याच्या लेन्सने टिपावा तसा जीएंनी टिपलेला आहे. मंदिराचे आवार, त्यात वस्ताद इराण्णांनी टाकलेली
फरशी, अजस्त्र वड आणि त्याचा पार, मागे पडका बुरुज, जुना
तेलाफुलात चिकट झालेला शिलालेख, ओवरीतल्या धर्मशाळेच्या
खोल्या, देवळाच्या रुंद पायर्या हे सर्व अगदी आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. मंदिराच्या
पायऱ्या ओलांडून गेल्यावरचा रस्ता, धाकटे स्टॅन्ड, दासप्पाचे हॉटेल, कावेने स्वस्तिक
काढलेली सारवलेली घरे आणि मंदिराच्या मागची माळ्याची विहीर व त्याचे खोपटे हा सर्व परिसर
फार जिवंतपणाने या कथेमध्ये जीएंनी चितारला आहे. ही वर्णन करताना
जीएंच्या डोळ्यांसमोर एक प्रत्यक्षातले मंदिर, एक छोटेसे गाव नक्की असावे. आपल्या
लहानपणाची स्मृती आपल्या प्रवासात दिसलेलं चमकून गेलेलं गाव आणि
त्यायोगे होणाऱ्या भूतकाळाच्या तरल जाणिवा हे जीएंच्या दृश्यात्मक वर्णन शैलीचे
यशच आहे.
कानडी मराठी
मुलुख, मिश्र मराठी, भौगोलिक प्रादेशिक रंग या सार्यांची एक विशिष्ठ
पार्श्वभूमी 'वीज'ला मिळालेली
आहे.
गुरुनाथ आबाजी कुलकर्णी (जी. ए. कुलकर्णी) |
जीएंच्या
कथांमधून येणारी प्रादेशिक वास्तवाची जाणीव हा एक वेगळाच विषय आहे. या परिसरात, या पूरक
पात्रांच्या बरोबर कथा पुढे सरकत जाते ती बळवंत मास्तरांच्या बरोबर त्याच्या
आयुष्यात तळपून गेलेल्या वीजेसोबत आणि जीएंनी वेगवेगळ्या
प्रसंगातून दुग्गोचर केलेल्या दृश्यात्मक वर्णनशैलीतून.
"आता एक दोन दिवस संध्याकाळी वारे सुरु झाले होते. तेकाडला वळसा घालून वारे धावत सुटे. ते प्रथम खोपटा वर आदळे, मग पुढे पसरून देवळाकडे जाऊन मोठ्या वडाची पाने खुळखुळवून सोडे."
“थोड्या दिवसात, एका
संध्याकाळी दुपारी तापून लखलखत असलेले आभाळ पाहता, पाहता काळे झाले. वाऱ्याचा जोर
एकदम वाढला. कोपऱ्यातल्या चार खांबावर उभे असलेले खोपटे तिरपे होऊ लागले. मग पहिली
वीज कडाडली, तेंव्हा दोन बोटे जाड रेषा आभाळच तडकल्याप्रमाणे थेट मध्यापर्यंत
उमटली आणि तिला फाटे फुटत गेले.”
“पावसाच्या
धारा जाड दोराप्रमाणे दणादणा आदळू लागल्या भोवताली ओहळ सुरु झाले व वेगाने
विहिरीकडे जाऊ लागले.थोड्याच वेळात पुन्हा लख्खन जांभळा प्रकाश पसरला. चिटपाखरू
नसलेले देवळाचे आवार क्षणभर अंधारा बाहेर आले. ठिकठिकाणची साचलेली डबकी आरशाच्या
लहान-मोठ्या तुकड्यांप्रमाणे चमकली आणि दुसर्याच क्षणी एक पाऊल मागे सरकल्याप्रमाणे
सारे अंधारात गेले.”
ही
फक्त काही उदाहरणे. उपमा आणि प्रतिमा, काळाचे आणि क्रियांचे अचूक वर्णन या
प्रसंगांना एखाद्या सिनेमाप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर उभे करतात. खरे तर सिनेमाचा डोळा,
कॅमेरा, ज्याप्रमाणे काम करतो त्याप्रमाणे जीएंची लेखणी काम करते. श्री.अरुण
खोपकर यांनी सिनेमाच्या अंगाने श्री.अरुण
कोलटकर यांच्या कवितांची समीक्षा केलेली आहे. जिज्ञासूंनी त्यांचा “कालकल्लोळ”
हा ग्रंथ अभ्यासावा.
जीए
आणि चित्रपट हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे.
प्रामुख्याने जीएंच्या फँटसी अंगाने झुकणाऱ्या मध्ययुगीन रूपक कथांवर
चित्रपटांमधील दृश्यांचा, कॅमेऱ्याच्या अँगल्सचा प्रभाव आहे. वाळवंटात उडणारी वाळू,
राजवस्त्रे, सूर्यास्त, ग्रीक मंदिरे, रेड इंडियन्स, अजस्त्र आकृती,
रथ
या सर्व वातावरण निर्मितीमागची प्रेरणा सिनेमातील काही दृश्ये असावीत असे मला
वाटते. अर्थात यामागे जीएंच्या लेखणीला कमी लेखण्याचा प्रयत्न नाही. पटकन एखाद्या
सिनेमातील दृश्यापासून प्रेरणा घेऊन, त्यातील बारकावे स्मृतीत रेखाटून, त्यावर
आपल्या प्रतिभेचे संस्कार करून जीएंनी
अत्यंत रेखीव प्रतिमासृष्टी आणि वातावरण निर्मिती केलेली आहे.
कथेच्या
मूळ गाभ्यामध्ये बळवंतमास्तर, त्याच्या इच्छा-आकांक्षा, आयुष्यात झळकून गेलेली वीज,
झपाटलेपणा, त्याची निवृत्ती, प्रवृत्ती, त्याचा निरोप आहे. एका लहान गावातला साधा
मास्तर सर्कशीतील आवळ कपड्यातील गोऱ्या सुंदरीला पाहतो आणि झपाटून जातो. सर्व
गोष्टींचा त्याग करून तिच्या मागे मागे दोन-तीन वर्षे फिरतो. एका सामान्य माणसाच्या
आयुष्यात असा एखादा असामान्य लखलखीत वीजक्षण येतो आणि तो माणूस होत्याचा नव्हता होऊन
जातो. अप्राप्य गोष्टींच्यामागे धावण्याची ईर्षा ही काही
काळा पुरती मर्यादित असते. जीएंच्या बऱ्याच गोष्टींमध्ये ‘प्रवास’ असतो तसा तो इथेही आहे.
एका सामान्य मास्तराचा असामान्यामागे धावणारा प्रवास.
देवमाशाची
शिकार, सिंहाचा मुखवटा फोडणे, हिम शिखराचे गिर्यारोहण या प्रत्येक फॅन्टसी सदृश प्रसंगांमध्ये
बळवंतमास्तर जिंकतो आणि सर्कससुंदरी त्या प्रत्येक प्रसंगाच्या अखेरीस खास
त्याच्यासाठी एखादी गोष्ट करते. परत एकदा सिनेमॅटिक तंत्राचा वापर, एडिटिंग,
कालरेषा या गोष्टी जीएंच्या शैली मधून स्पष्ट होतात. अर्थात या सर्व कल्पनारम्य
प्रसंगांच्या प्रांगणामध्ये होणाऱ्या गोष्टी. एक फाटका मास्तर असे अचाट खूळ घेऊन या
गोष्टींच्या मागे कसा काय लागलाय़, त्याच्या कल्पनाशक्तीने त्याला कोठे नेऊन सोडलेय? बळवंतमास्तरांमधील
हे झपाटलेपण फार वेगळे असते आणि ते आहे सुद्धा. डॉन किहोतेची सूक्ष्म आठवण येथे
होत राहते.
जीएंच्या
गोष्टींमधले प्रवास निरर्थक, क्रूर अपेक्षाभंगामध्ये संपणारे, आयुष्याचा फोलपणा
जाणवून देणारे असतात. 'वीज'
कथेचे वेगळेपण असे की यामध्ये दोन प्रवास आहेत. एक पूर्णपणे अपेक्षाभंगात होणारा,
घर सोडून वणवण भटकणारा, चाबकाचा वळ घेऊन परत घराकडे परतणारा प्रवास. पण यानंतरचा
प्रवास अत्यंत वेगळा आहे आणि या वेगळेपणामुळे 'वीज'
ही कथा फार सामर्थ्यवान बनलेली आहे.
हा
प्रवासाचा दुसरा टप्पा एका परतप्रवासाची दुखरी आणि जिव्हार लागणारी नोंद आहे.
ज्या
मागे बळवंतमास्तर लागला होता ते अप्राप्य त्याला झिडकारून टाकते आणि आयुष्यावरची
श्रद्धा संपलेला, जगण्याची असोशी संपलेला
बळवंतमास्तर परत काळम्माच्या देवळात येतो.
सर्व
काही गमावल्याची जाणीव, जगण्यासाठी लागणारी उमेद संपल्याची विदारक अनुभूती,
जगण्याच्या वणवणीतील समजलेली निरर्थकता, ईप्सितांचे फोलपण आणि मग उरलेल्या
दिवसांची निरभ्र पोकळी बळवंतमास्तराचा पुढचा प्रवास स्पष्ट करते.
एकामागून
एक निरर्थक अक्षरेच्या अक्षरे रद्दी मधून वाचत राहणे, अधाशासारखे वाचत राहणे,
जगण्यावरची शुद्ध हरपून वाचत राहणे, काय खाल्लं याची पर्वा नाही, अंगावर ऊन्ह आलं
की थोडं बाजूला सरकणं, पण अक्षरांवरून डोळे फिरवत राहणार ...मात्र या परिस्थितीत
स्मृती, काळ,
विचार यांचा पूर्णपणे गोंधळ चाललेला असतो बळवंतमास्तराच्या डोक्यात.
लहान मुलांना गोष्टी सांगताना कथानकांची होणारी सरमिसळ बळवंत मास्तराच्या
विचारांचे प्रतीकच आहे.
“आणि वाचनात हरवलेला
बळवंत मास्तर काय किंवा हरवण्यासाठी वाचनाची देखील गरज नसलेली गंगी गाय काय -
दोघांची पोरांना कधीच कसली हरकत नव्हती”
ही
मुलांबरोबर ची थोडी करमणूक सोडली तर बळवंत मास्तराच्या जीवनात आता पूर्ण शून्य
उरले होते. गंगी गाय सोडून.
पण तीसुद्धा माळ्याच्या विहिरीत पडून मरते आणि बळवंत मास्तराच्या आयुष्यात उरलेले
शेवटचे हिरवे पान गळून पडते. झपाटून जाऊन या नियती विरुध्द लढण्याचा अखेरचा
प्रयत्न बळवंतमास्तर विहीर भरताना करतो. पण ते सारेच अतिशय दुर्धर, अशक्य कोटीतले
असते. बळवंतमास्तर आपल्या आयुष्यात झपाटलेपणाने वागतो आणि जेव्हा हा झपाटलेपणा संपतो
तेंव्हा त्याच्या आयुष्यातील अर्थच संपतो. यानंतर बळवंतमास्तरांने केलेली
आत्महत्या हा निव्वळ सोपस्कार. त्याच्या प्रवासाची ही निश्चित अखेर. पूर्णविराम.
झपाटून
जाऊन केलेले हे सारे प्रवास अशक्यप्रायच असतात. या सार्या प्रवासांची अखेर ही बहुतेक
ठरलेलीच असते, हे म्हणणे जीए आपल्या कथांमधून वारंवार मांडत असतात.
मधुराज
जाधव
मधुराज - जी ए नावाच्या मनावर भुरळ पाडणाऱ्या या अवलियाची ओळख करून दिल्याबद्दल - मनःपूर्वक आभार!!
ReplyDeleteवीज ही गोष्ट मी पुर्वी वाचली होती - पण या लेखातून ती वेगळ्याच अर्थाने समोर आली!
लय भारी मध्या. जीए, डिकन्स्, मॅाम वाचल्यानंतर डोक्याला ओला पंचा गुंडाळून बसायची पाळी येते.
ReplyDelete