विलायती खाऊ -१० केनयन खिमा चपाती

खिमा चपाती हा केनयामधला एक लोकप्रिय खाद्यप्रकार आहे. नावाप्रमाणे तो अर्थातच खिम्याचा करतात, मी इथे शाकाहारी प्रकार देतोय. खरा तर हा प्रकार काही नवीन प्रकार नाही, आपल्या पराठ्याचाच केनयन अवतार आहे. पण आपल्याकडचे पराठे लाटताना जरा कठीण जातात. सारण बाहेर येणे, पारी फुटणे, कडेला सारण न जाणे, नीट आकारात लाटता न येणे या अडचणी येतातच. या सगळ्यावर इथे मात केलीय.
अर्थात हा प्रकार भारतीयांकडूनच इथे आला असणार. इथे चपातीला चपातीच म्हणतात आणि खिम्याला खिमाच म्हणतात. (उच्चार किमा असा करतात) करायला लागणारा वेळ साधारण १ तास.
मी वापरलेले साहित्य असे -
) पारीसाठी
) एक कप कणीक.
) चवीपुरते मीठ आणि मोहनासाठी तेल

) सारणासाठी
) अर्धा किलो फ्लॉवर
) एक मध्यम बटाटा
) एक लहान गाजर
) एक चहाचा चमचा खसखस
) तिखट, मीठ, हळद, हिंग, आवडीप्रमाणे मसाले.
खिमा वापरणार असाल, तर टिप्स पहा.

क्रमवार पाककृती :
) पारीसाठी चपातीला भिजवतो तशी कणीक मळून बाजूला ठेवा.
) सारणासाठी, फ्लॉवर व गाजर किसून घ्या व त्यात बटाट्याच्या फोडी टाका.
) त्यातच सगळे मसाले घालून सगळे कूकरमधे उकडून घ्या.
) कूकर उघडून भाज्या घोटून घ्या अणि सगळे पाणी आटवून मऊसर सारण करा.
) कणकेचे जरा मोठे असे चार ते सहा गोळे करा.
) त्याची अगदी पातळ अशी मोठी चपाती लाटा.

) त्यावर मध्यभागी सारण जरा पसरून ठेवा. (पावाला लोणी लावतो, त्याप्रमाणे.)

) आता चपातीचा वरचा आणि खालचा भाग घडी घालून सारणावर येऊ द्या

) आता मधल्या अर्ध्या भागावर परत सारणाचा एक थर द्या, आणि त्यावर कडेचे भाग येऊ द्या

१०) आता याला चौकोनी आकार आला असेल. तसेच ते तव्यावर टाकून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या.

सोबत इथे केचप घेतात. मी काकडीची वेगळी कोशिंबीर घेतलीत. (टिप बघा.)
वाढणी/प्रमाण : चार ते सहा जणांसाठी.

अधिक टिपा :
) खिमा वापरायचा असेल तर 

खिमा स्वच्छ धुवून निथळून घ्या. त्याला आले, मिरची, लसूण यांचे अर्धे वाटण लावा. त्यात हळद घालून कूकरमधे शिजवून घ्या. मग बाकीचे वाटण, तिखट, मीठ, गरम मसाला वगैरे घालून पाणी आटवून घ्या. तेल सुटले असेल तर ते काढून घ्या.
इथे चपात्या सहसा मैद्याच्याच करतात. आणि जरा जाडच असतात. भरपूर वनस्पती तूप घालून जवळजवळ तळूनच घेतात. त्यांच्या तब्येतीला त्या मानवतात, आपल्यासाठी वरीलप्रमाणे बदल केले आहेत.
) कोशिंबीर

आपल्याकडे कोशिंबीर करताना काकडीला पाणी सुटू नये याकडे आपला कटाक्ष असतो. हा जरा वेगळा प्रकार. भूमध्यसमुद्राच्या आसपासचा. काकडीच्या चकत्या वा तूकडे करुन त्याला मीठ व किंचीत साखर लावून चाळणीत निथळत ठेवतात. मग त्यात घट्ट दही व पुदीना घालतात. मी वापरलेय ते केनयन माला. माला या शब्दाची गंत आहे. स्वाहिली भाषेत दूध म्हणजे मझिवा आणि लाला म्हणजे झोप. मझिवा लाला म्हणजे झोपलेले दूध आणि त्याचे लाडके नाव, माला.
सारणासाठी अर्थातच आवडीचा प्रकार वापरू शकता. पावभाजी सारखे प्रकार पण वापरू शकता. पण ते नीट घोटून मात्र घ्या. घट्ट शिजवलेले वरण सुद्धा मीठ मसाले घालून वापरू शकता. खसखस, तीळ वगैरे घातले की क्रंच मिळतो. याची खासियत आहे ती घडी आणि आकार.

दिनेश शिंदे


1 comment: