विलायती खाऊ ८ -एमा दात्शी



एमा दात्शी ही आपला शेजारचा देश भूतानची खासियत. त्यांची 'नॅशनल डिश'. मूळ कृती अगदी सोप्पी (ती देतोच) त्यातील घटकांवरून प्रेरणा घेऊन मी केलेला हा प्रकार!


लागणारे जिन्नस असे :
१) एक कांदा
२) एक टोमॅटो
३) हिरव्या मिरच्या (आवडत्या प्रकारच्या आणि तितक्या संख्येत. मूळ पदार्थात त्या जास्तच असतात.)
४) चीज (माझ्या व्हर्जन साठी बेक करता येईल असे कुठलेही. मूळ कृतीसाठी ब्लु, फेटा वगैरे चालेल. पनीरही चालेल. मूळ पदार्थात स्थानिक भूतानी चीज वापरतात.)
५) थोडेसे तेल किंवा बटर.

क्रमवार पाककृती :

मूळ कृती अगदी सोप्पी आहे. यात कांदा, टोमॅटो व बिया काढलेल्या मिरच्या असे सर्व ऊभे कापून पाण्यात शिजवतात. त्यात थोडेसे तेल किंवा बटर घालतात. हे सर्व शिजले की त्यात चीज घालतात आणि चीज वितळले की एमा दात्शी तयार! हा सूप सारखा प्रकार भातासोबत खातात.

मी केलेला प्रकार असा :

१) कांदा, मिरच्या आणि टोमॅटो उभे कापून घेतले.
२) एका डिशमधे ते अरेंज करून घेतले आणि त्यावर थोडे ऑलिव्ह ऑईल घातले.
३) मग १० मिनिटे grill combo आणि १० मिनिटे grill करुन घेतले.
४) मग त्यावर चीज घातले आणि परत सहा मिनिटे grill केले.

माझी एमा दात्शी तयार!!!

या पदार्थात मीठ घालायची गरज नसते (चीजचा खारटपणा पुरतो, पण तूम्हाला वाटले तर घालू शकता. मूळ कृतीत मिरपूड वगैरे नाही, मिरच्या कमी तिखट असतील तर घालू शकता.)
हा प्रकार घरी सहज असणाऱ्या(चीज तेवढे आणावे लागेल) घटकातून होणारा पदार्थ आहे. पोटभरीचा पण आहे. टोस्टसोबत भन्नाट लागतो. जाडसर कमी तिखट, मिरच्या वापरल्या, तर जास्त चांगले.

दिनेश शिंदे


1 comment: