शतकानुशतके मराठी मनाचे प्रसन्नतेने
भरण-पोषण करणारे आनंदाचे चिरंजीव
निमित्त म्हणजे गणेशोत्सव! नवीन वर्षाचे मराठी कॅलेंडर हातात पडले की पहिल्यांदा बघितली जाते, ती या वर्षीच्या गणेशोत्सवाची सुरवात कधी होते आहे ती तारीख. आहेत अजून बरेच दिवस असे वाटत
असतानाच महिन्यांची पाने पटापट उलटली जातात आणि एकदम समोर येऊन ठेपतो श्रावण.
श्रावणाच्या संजीवक सरी सणांचा संदेश देत, ऊन पावसाचा खेळ रंगवत, फुलांचे सडे घालून बरसतात.आणि गोकुळाष्टमी झाली की
गणेशोत्सवाची ओढ वाटू लागते. बघता बघता भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा
दिवस उजाडतो.
घराबाहेर 'श्रीं' च्या आगमनाचे ढोल, ताशे, बेंजो ,डी
जे वाजायला लागतात आणि घराघरातील वातावरण मंगलमय व्हायला लागते. घरातली आरास, 'श्रीं'चे आगमन, नैवेद्य, आरत्या, गौरी येणं अशी सगळी गडबड आटोपून
पुन्हा बाहेरच्या कार्यक्रमांना हजेरी लावायची असते. गौरी-गणपती, नातेवाईक यांच्या बरोबरची सुवेळ
झपाटय़ाने पुढे सरकत राहते.
वर्षामागून वर्षे सरताना गणेशोत्सवाचे रूप बदलू लागले. पूर्वी हा उत्सव जास्त श्रवणीय होता. तो दिवसेंदिवस प्रेक्षणीय व्हायला
लागला. रोषणाई, मिरवणूक, आरास, लेझीम, ढोल-ताशे - उत्सवातील झगमगाट वाढला. हळूहळू गणेशोत्सवाचा 'फेस्टिव्हल' झाला. मतदारांना, ग्राहकांना खुश करण्याच्या
वेगवेगळ्या क्लुप्त्या गणेशोत्सवात शिरल्या. गणेशोत्सवात सिनेमे दाखवले जाऊ
लागले. उत्सव साजरा
करण्यामागे काही वैचारिक चिंतन असावे, नीतिमूल्ये पाळली जावीत असे विचार
कुठल्याकुठे गेले. असे
असले तरीही उत्सव साजरा करण्यात कधी खंड पडला नाही. लोकांचा उत्साह वाढताच राहिला. गणेशमूर्तीची भव्यता वाढली. सजावट, देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम यातून मराठी
माणसाची श्रद्धा आणि कलाप्रेम दिसतच राहिले. अनेक कार्यकर्ते, कलाकार, गायक, नट या सार्वजनिक उत्सवातून आपल्या
सादरीकरणाची सुरुवात करून पुढे देश गाजवणारे नामवंत कलाकार झाले. एकूण मराठी लोकजीवनाला मंगलमूर्तीच्या
उत्सवाने अदम्य चैतन्य प्रदान केली हे निर्विवाद. शंभरी पार केलेला हा उत्सव आजच्या
विज्ञाननिष्ठ जगात सुद्धा पूर्वी इतकाच लोकप्रिय आहे.
मराठी घरांमध्ये गणेशोत्सवाची अशी
धामधूम शतकानुशतके चालू आहे. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा
लोक घरोघरी गणपती बसवायचे. पेशवाईत तर दरबारी थाटात
गणेशोत्सवाची बहार उडायची. पुरंदर किल्ल्यावर गणपती बसायचा. महाराष्ट्राबाहेर तर ग्वाल्हेर,
बडोदा, इंदौर अश्या शहरांमध्ये मराठी संस्थानिक आणि सरदारांच्या राजवाड्यांमध्ये
गणेशोत्सव शाही थाटात साजरा व्हायचा. माळव्याचे अधिपती असलेल्या इंदौरच्या
होळकरांच्या राजघराण्यात सुमारे दोनशे वर्षांपूर्वी पासूनच गणेशोत्सव खास मराठी
पद्धतीने पण राजकीय रुबाबात साजरा व्हायचा. सन १८४४ मध्ये दुसरे तुकोजीराव होळकर
यांच्या कारकिर्दीत गणेशोत्सवाचे रूप फारच वैभवशाली होते. या गणेशोत्सवाला राजाश्रय लाभलेला
असल्याने उत्सवमूर्तीचे आगमन सुद्धा दोन हत्ती, घोडेस्वार, बॅण्ड वाले, पायी चालणारे लष्कर अश्या साऱ्या सरंजमासह
होत असे. गणेशाची
मूर्ती बग्गीमध्ये विराजमान होऊन राजवाड्यात येत असे. लोक सुध्दा साऱ्या चिंता, काळज्या दूर ठेवून गणेशोत्सवाचा
आनंद घेत.
खाजराना गणेश मंदिर इंदोर |
इंग्रजी अंमल जोर धरू पाहणाऱ्या त्या
काळात सुद्धा गणपती उत्सवाचे वैभव बरेच ठिकाणी टिकून होते. १८५७च्या लढ्याआधी तर सरकारी
दफ्तरखान्यात गणेशमूर्ती बसवल्याचे उल्लेख आहेत. त्यानंतरच्या इंग्रजी राजवटीच्या
काळात मात्र अशा काही घडामोडी घडल्या की भारतीय जनतेमधली सारी स्फूर्ती मावळत
गेली. इथे राहणाऱ्या लोकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वतःच्याच
देशात संपुष्टात येऊ लागले. खुद्द महाराष्ट्रातील सार्वजनिक
गणेशोत्सव पार ढेपाळला होता. इंग्रजांच्या धाकात फक्त एक परंपरा म्हणून घरापुरता
गणपती बसवायचा. इथपर्यंत
लोकांचा उत्साह खालावला होता. बृहनमहाराष्ट्रात मात्र मराठी राजे
महाराजे सरदार यांच्या घराण्यांमध्ये सामान्य लोकांना सामील करून घेऊन गणेशोत्सव
चालू होते.
अशाच ग्वाल्हेर येथे पाहिलेल्या
गणेशोत्सवापासून स्फूर्ती घेऊन पुण्यातील विश्वनाथ खाजगीवाले, भाऊसाहेब रंगारी, आणि गणेश घोटावडेकर यांनी सार्वजनिक
गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ पुण्यात पुन्हा नव्याने रोवली. लोकमान्य टिळकांनी 'केसरी' या त्यांच्या वृत्तपत्रातून या उत्सवाचे खूप कौतुक केले आणि ते
महाराष्ट्रभर पोचले. १८९३ साली पुण्यात पहिला सार्वजनिक
गणेशोत्सव साजरा झाला. त्यानंतर
त्वरित मुंबईतील केशवजी नाईक चाळीत तो सुरू करण्यात आला. पुण्यातला गणेशोत्सव मुंबईत
झपाट्याने पसरला. पुण्यातही
तो विस्तारत गेला आणि
प्रतिवर्षी अखंडपणे होऊ लागला. या गणेशोत्सवाचा उपयोग लोकमान्यांना
स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रभावी माध्यम म्हणून करायचा होता. त्यांनी या उत्सवाच्या निमित्ताने 'केसरी' मधून भरभरून लिहिले. मुंबई पुण्यापासून दूर जिथे
सार्वजनिक गणेशोत्सव होत नव्हता तिथल्या लोकांनाही ही वर्णने वाचून सार्वजनिक
गणेशोत्सव सुरू करण्याची प्रेरणा मिळावी हा टिळकांचा हेतू होता. जाती भेद विसरून लोकांनी या उत्सवात
सामील व्हावे असे लोकमान्यांना वाटत होते.
१८९९ पासून लोकमान्य टिळक स्वतः या
सार्वजनिक उत्सवात सहभागी होत असत. स्वतः दहा-पंधरा ठिकाणी पान सुपारीला जात. व्याख्याने देत, स्वदेशीचा प्रसार करत. इंग्रजी राजवटीवर बहिष्कार कसा घातला
पाहिजे हे लोकांना पटवून देत. या उत्सवात सामान्य लोकांना
स्वातंत्र्यवीर सावरकर, दादासाहेब खापर्डे, पंडित मदनमोहन मालवीय, सरोजिनी नायडू, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा महान देशभक्तांची व्याख्याने ऐकायला मिळत. देशभक्तीपर गीते गाणारे मेळे आपले
कार्यक्रम सादर करत. सामान्य
लोकांमधील कलागुणांना वाव मिळे. प्रसंग धार्मिक असल्याने इंग्रजांना
फारशी ढवळाढवळ करता येत नसे.
लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव
समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न सुरू करून अवघ्या महाराष्ट्राचे विचारविश्व ढवळून
काढले. ठिकठिकाणी
नवचैतन्याने भारलेले गणेशोत्सव सुरू झाले आणि दिवसेंदिवस लोकांमध्ये सार्वजनिक
गणेशोत्सवाचे महत्व वाढू लागले. इंग्रजांनी वैयक्तिक पातळीवर
लोकमान्यांना वेगवेगळ्या शिक्षा ठोठावून त्यांच्यावर सूड उगवलाच पण सार्वजनिक
गणेशोत्सव हे मराठी संस्कृतीचे अविभाज्य अंग झाले ते झालेच. त्यानंतरचा इतिहास पाहिला तर हा उत्सव येथील समाजात सतत
विस्तारातच गेला. गल्ली
गल्लीत, चाळी
चाळीत, सरकारी
कचेऱ्यातून गणेशोत्सव अव्याहतपणे साजरे होऊ लागले. सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रात
पुरता मुरला.
मध्यंतरी आपले एक मराठी वैज्ञानिक
श्री महेश दारवटकर संशोधन कार्यानिमित्त भारतीय संशोधकांच्या टीमसमवेत
अंटार्क्टिका येथे राहत होते. भाद्रपद महिन्यात त्या भारतीय टीमने
अंटार्क्टिका मध्ये गणेशोत्सव साजरा केला. आरास होती बर्फ आणि penguin च्या
चित्राची. तिथेही
श्री दारवटकर यांच्याबरोबर असलेल्या सर्व भारतीयांनी एकत्रितपणे हा उत्सव साजरा
करून गणेश ही देवता विश्वभर पुजली जाते हे दाखवून दिले.
मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही
गेला तरी तो गणेशोत्सव साजरा केल्याशिवाय राहू शकत नाही हे आता अनेक मराठी लोकांनी
सिद्धच केलं आहे. आपल्या
देशात आणि परदेशात सुद्धा विविध ठिकाणी मराठी लोकांची मंडळं स्थापन होऊन गणेशोत्सव
साजरा करणाऱ्यांची संख्या भरपूर वाढली आहे. फक्त महाराष्ट्रात ५०,००० पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळे आहेत.आणि
भारतातील इतर राज्यातही मोठ्या प्रमाणावर आहेत. बृहनमहाराष्ट्रात प्रत्येक मोठ्या
शहरातील महाराष्ट्र मंडळात गणेशोत्सव वर्षानुवर्षे साजरा होत आहे.
गेल्या ५० वर्षांपासून मराठी माणूस संधी मिळेल
त्या देशात नोकरी व्यवसायानिमित्त जाऊ लागला. तिथेच स्थायिक होऊ लागला आणि
गणेशोत्सव पण साजरा करू लागला. अमेरिकेत कायम राहायला गेलेल्या
भारतीयांची संख्या खूप वाढत गेली तशी तिथे मराठी मंडळं पण संख्येने
वाढत गेली. १९६९ मध्ये अमेरिकेत पहिलं महाराष्ट्र मंडळ शिकागो इथे स्थापन
झाले आणि त्यानंतर
अनेक मंडळं स्थापन झाली. यातल्या बहुतेक मराठी मंडळींनी गणेशोत्सवाची मंगल घडी
साधूनच आपल्या मंडळाचा श्रीगणेशा केला.
अमेरिका सोडून इतर देशात झालेल्या
गणेशोत्सवाचे वृत्तांत सुद्धा प्रसारमाध्यमं आपल्यापर्यंत पोचवतच असतात. परदेशात राहणाऱ्या मराठी मंडळींनी या
उत्सवात तेथे राहणाऱ्या सर्व भारतीय लोकांना सामावून घेतले. आणि तेथे या उत्सवाचे स्वरूप समस्त
भारतीयांचा सण असे झाले. म्हणूनच
अमेरिकेत यावर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याआधी ज्यो बायडन यांनी सर्व
हिंदू बांधवाना अगदी आठवणीने गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
गणेशोत्सवाचे हे विश्वव्यापी रूप
पाहून सहज दोन ओळी सुचल्या
"जिथे मराठी आहे भाषा आणि मराठी व्यक्ती,
गणेश उत्सव आहे तेथे जागते मराठी शक्ती."
पूर्वी अक्षर ओळख होण्याआधीच श्री गणेशाय नमः ने या प्रथमेशाची ओळख व्हायची. आता ती पद्धत मागे पडत चालली. तरी प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवामुळे आपण लहानपणापासून अतिशय आनंददायक पद्धतीत या ओंकार स्वरूप आदिबीजाचे पूजन आणि आरती करू लागतो. आणि या उत्सवात जे जे काही करतो त्या सर्वातून आपलं मराठीपण अधोरेखित करतो. मोदक, आरती, गौरीची पावलं, आरास, अथर्वशीर्ष. नाटक बघणं आणि करणं.. शेवटी नकोसं वाटणारं विसर्जन..येऊन ठेपतेच. अगदी हवा हवासा वाटणारा...मंगलदायक पाहुणा आपल्या घरी जायला निघतो. मन हुरहुरते. पण मनाला दिलासा असतो की पुढच्या वर्षी बाप्पा नक्की येणार.
बदलत्या
काळाबरोबर उत्सवाचे स्वरूप बदलेल कदाचित. पण
श्रद्धेचा पाया डळमळीत होणार नाही. श्रद्धावान हा उत्सव चालू ठेवणार आणि हौशी
लोकांची त्याला साथ मिळणार. फक्त या
उत्सवाचं स्वरूप कसं असणार? आणि नवीन
पिढीच्या मनात या शेकडो वर्षांच्या परंपरेचा नेमका काय अर्थ उतरलाय, याचे उत्तर
मात्र येणाऱ्या पिढ्याच देणार आहेत.
शर्मिला
पटवर्धन फाटक
Chhan!
ReplyDelete