व्हिटॅमिन 'सी'




 'अग येत्या चार दिवसात आंबे येत आहेत हं कोकणातून.' दरवर्षीप्रमाणे साने काकूंचा फोन आला. आवाजात नेहमीचाच सळसळणारा उत्साह. 'हो, येते काकू नक्की' असं म्हणून मी फोन ठेवला. यंदा रेट काय आहे वगैरे प्रश्न मला विचारावेसे वाटले नाहीत कारण तो रास्तच असणार ही खात्री होती.

चार पाच दिवसांनी त्यांच्या घरी गेले. साहजिकच  गिऱ्हाइकांची गर्दी होती. काकू प्रत्येकाची हसून दखल घेत होत्या. आंब्यांच्या पेटया उघडून दाखवत होत्या, गिऱ्हाइकाची पसंती मिळाली की हिशोब करून त्या पेटया प्रेमानं त्याच्या हातात देत होत्या. सगळ्या कामात अदम्य उत्साह आणि व्यवस्थितपणा!

बैठकीच्या खोलीतच एका लाकडी रॅकवर नुकताच आलेला वेगवेगळा कोकण मेवा रिकाम्या बॉक्सेस मधे नीट लावून ठेवलेला दिसला. त्यावर ठळक अक्षरात लेबलं लावली होती. त्यामुळे किंमत, वजन याबद्दल गोंधळ नव्हता. जवळच्या हुकाला कापडी पिशव्या टांगलेल्या होत्या. गिऱ्हाइकं हवे असलेले जिन्नस त्यात भरुन बिलासाठी काकूंकडे देत होती. मी पण त्यांचे अनुकरण करत आगळ, मिरगुंड, फणस पोळी असे आवडीचे शेलके जिन्नस उचलले.

"काकू, ही पिशवीची आयडीया आवडली हं.". तशी हसून म्हणाल्या "अग, प्लास्टिकची पिशवी देणं मला आवडत नाही आणि प्रत्येक जण बरोबर पिशवी आणतोच असं नाही. म्हणून सीझन सुरु व्हायच्या आधीच भरपूर पिशव्या शिवून ठेवल्या." या दणकट पिशवीचे जास्तीचे फक्त दहा रुपये देऊन मी घरी आले. आंब्याचा घमघमाट इतका सुटला होता की मी घरात शिरताच मुलं धावत आली. देवापुढे नेवैदय ठेवून आंब्याची पहिली फोड तोंडात घातली.... आ हा हा! अप्रतिम! मनातून १० वेळा तरी काकूंना धन्यवाद दिले गेले. आंब्यांवर मनसोक्त ताव मारल्यावर पिशवीतून आणलेले जिन्नस बाहेर काढले. सगळ्यांवर पॅकींगची तारीख, किंमत, expiry date सुवाच्च्य अक्षरात लिहीलेली लेबल चिकटवलेली होती. सगळे  काकूंचेच  काम!

गेली १५ वर्ष मी त्यांना बघते आहे. कोकणात जाऊन आंब्यांची निवड करणं, इकडे पुण्यात बॉक्सेस उतरवून घेणं, त्यांचे  वर्गीकरण करणे, फोन करून मार्केटींग करणे, गिऱ्हाइकाला उत्तम फळ मिळावं याची खबरदारी घेणे  या सगळ्या आघाडया त्या लिलया सांभाळतात. ते ही एकटीने!

आंब्यांचा सीझन संपला की उरलेल्या फळांचा पल्प करुन त्या विकतात हे मला माहित होतं. या वर्षी मी ठरवलं की मैत्रिणींना  वाढदिवसाला मॅंगो पल्पची बाटली भेट दयायची. काकूंना फोन केला आणि दुपारी त्यांच्याकडे पोहोचले. सीझन संपल्यामुळे बैठकीच्या खोलीचे रूप पालटले होते. मोजके, छान फर्निचर. त्यावर स्वतः भरतकाम केलेले कुशन कव्हर, टेबल क्लॉथ. सगळीकडे कमालीची स्वच्छता! गप्पा मारत असतानाच स्वैपाकघरातून काकूंनी माझ्यासाठी थंडगार लिंबू सरबत आणलं आणि पल्पच्या बाटल्यांचा बॉक्स माझ्या सुपूर्द केला. "काकू, कॅनींग तुम्ही स्वतः करता?", "अग, पूर्वी करायचे, पण आता आंब्याचा व्यवसाय खूप वाढलाय, त्यामुळे नाही जमत. मी दोन गरजू बायकांना याचं प्रशिक्षण दिलं आहे. आता त्या करून देतात.''

बोलणं चालू असतानाच बेल वाजली. चाळीशीचा एक तरुण कुबड्यांच्या मदतीनं आत आला. त्याच्या बरोबर साधारण दहा वर्षाचा एक मुलगा होता. काकूंच्या उत्साही चेहऱ्यावर खूप आनंद पसरला. त्या छोटया मुलाला पोटाशी धरत मला म्हणाल्या, "हा माझा नातू, आणि  हा लेक. इथेच औंधला रहातो." त्या तरूणाकडे बघून मला धक्का बसला, पण तो चेहऱ्यावर न दाखवता मी नमस्ते म्हणून त्यांचा निरोप घेतला. रस्त्यात आणि घरी आल्यावर काकूंच्या दिव्यांग मुलाचा विचार मनातून जात नव्हता. काकूंना घरचे कोणीच नाही का असं वाटायच. पण असे काही असेल अस कधीच त्यांच्या बोलण्यातून जाणवलं नव्हतं.

पुढे चार एक महिन्याने एका मैत्रिणीचे  गीता सप्ताहाचे निमंत्रण आले. ठरल्या वेळेला पोहोचले. वक्त्या म्हणून समोर सानेकाकू! त्यांना बघून मला आनंद झाला आणि आश्चर्य ही वाटलं. पुढे तीन तास काकूंनी त्यांच्या गीता निरुपणानं सगळयांना खिळवून ठेवलं. त्या दिवशी काकूंबद्दलचा आदर कित्येक पटीनं वाढला.

निघताना त्यांना म्हटलं 'काकू, मी रिक्षा करते आहे, तुम्हाला सोडू घरी?'

'अग रिक्षा कशाला करतेस, मी गाडी घेऊन आली आहे. मीच सोडते तुला.'

सगळ्यांचा निरोप, शुभेच्छा घेत काकू बाहेर आल्या. 'चल', म्हणून पटकन रस्ता क्रॉस केला आणि खांद्यावरची पिशवी मागच्या सीटवर ठेवून स्टीअरींग व्हीलचा ताबा घेतला. मी अचंबित होऊन त्यांच्या शेजारच्या सीटवर बसले. काकू सफाईदारपणे गाडी चालवत होत्या. 'काकू, काय काय करता तुम्ही? कुठून आणता एवढी एनर्जी?' न रहावून मी विचारलं. त्यावर जोरात हसल्या आणि म्हणाल्या, 'व्हिटॅमिन सी' ची कमाल आहे ही. मी मनात म्हटलं, की आपणही द्याच आणावं. त्यांनी बहुतेक हे ओळखलं. त्या म्हणाल्या 'अग, व्हिटॅमिन सी म्हणजे curiosity, challenges, connectivity आणि creativity. याची deficiency येऊ दयायची नाही. बघ, माझं वय आहे ७८. आहे ना अजून मस्त ठणठणीत? पैशाचीही औषधं नाहीत. तुला सांगू, १८ वर्षांपूर्वी यजमान गेले. त्यावेळी मुलीचं लग्न झालं होतं, पण मुलाचं राहिलं होतं. माझ्या मुलाला जन्मतः चार मणके कमी आहेत, त्यानंतर पहिल्या वर्षातच त्याची काही ऑपरेशन्स  करावी लागली. खूप रडले तेव्हा. पण खंबीर झाले. मनाशी ठरवलं याच्या संगोपनात त्याचं अपंगत्व आड येऊ दयायचं नाही. जसा तो मोठा होत होता तसं त्याच्या मनावर बिंबवत गेले कि तुझ्याकडे जे भरभरून आहे त्यावर फोकस कर. मला त्याला सर्वसामान्य मुलांच्या शाळेत घालायचं होतं. पण शाळा त्याला स्विकारायला तयार नव्हत्या. शेवटी एका शाळेनं मान्य केलं की त्याची बौध्दिक चाचणी घेऊन त्यानुसार ठरवू. मला खूप आनंद झाला कारण मला माहित होतं की तो बुद्धीमान आहे. तो उत्तम रितीने पास झाला आणि शाळेत दाखल झाला. पुढं त्यानं MSc computer केलं आणि एका MNC मधे नोकरी घेतली. यजमान गेल्यावर वर्षात त्याचं लग्न झालं. त्याला स्वतःची, संसाराची जबाबदारी पेलता यावी म्हणून त्याच्या लग्नाआधीच टोकन अमाऊंट भरुन मी एक प्लॅट बुक केला होता. लग्नानंतर तो नवीन घरात रहायला गेला. १६ वर्ष झाली. मस्त चाललय त्याचं. मी पण इकडे हास्य क्लब, वाचन ग्रुप, नातेवाईकांची भिशी, रोजचं चालणं यात स्वतःला गुंतवून ठेवलं. शिवाय जोडीला आंब्यांचा व्यवसाय आहेच.

तुला curiosity म्हटलं ना मगाशी. तर सांगते, गेल्या १५ वर्षात मी दासबोधाच्या परिक्षा दिल्या, उपनिषदांचा  अभ्यासक्रम पूर्ण केला. गीतेचा सखोल अभ्यास केला. Internet वापरणं, email करणं, online बँकेचे व्यवहार सगळं शिकले. गेल्या दोन वर्षात पुणं ते कोकण दर महिन्याला एसटी प्रवास करुन तिकडे प्रशस्त घर बांधलं. चालू आहे बघ.. म्हणत छान हसल्या. 'आता माझ्या नातीचं म्हणजे मुलीच्या मुलीचं बाळंतपण आहे. तिला जुळं होणार आहे त्यामुळे सध्या बाळंत विडा करण्यात माझी कल्पकता पणाला लागली आहे.' अशी आहे ही चार components ची व्हिटॅमिन सी.

मी हे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. एका सिग्नलला गाडी थांबली तेव्हा लक्षात आले की घराची गल्ली मागेच राहिली. पटकन काकूंना म्हटलं, 'काकू अहो मी इथे उतरते, घराची गल्ली miss झाली'. ' अग, कशाला? थांब यू टर्न घेते '. असं म्हणत काकूंनी यू टर्न घेऊन मला दारात सोडलं. खरं तर मला सिग्नलला सोडून त्या पुढे जाऊ शकत होत्या पण प्रत्येक गोष्टीला शंभर टक्के आपले प्रयत्न द्यायचे हा त्यांचा स्थायीभाव होता.. गुड नाईट म्हणत काकूंनी निरोप घेतला. मी मात्र गाडी दिसेनाशी होईपर्यंत जागी खिळून राहिले.

 

 आरती उदय जोशी






2 comments: