आठ मार्च जागतिक महिला दिन. स्त्रीमुक्तीबद्दल अनेक मतं, विचार आपण ऐकतो. फेमिनिझम या विषयावर चिममंडा वेगळ्या
प्रकारे प्रकाशझोत टाकते. तिची फेमिनिझमची संकल्पना मला मनापासून आवडली. चिममंडा
नगोझि अडीची या नायजेरियन स्त्रीने २०१२ मधे एक 'TED Talk' दिला होता. त्यावरुन तिने लिहिलेले पुस्तक आहे, "We Should
All Be Feminists". तिने जास्त करून आफ्रिकेतील लोक, तिचे मित्र मैत्रिणी आणि तिथला तरुण वर्ग यांना डोळ्यासमोर ठेवून हे
पुस्तक लिहिले आहे.
सर्वात प्रथम feminist ह्या शब्दाचा
मराठीतून अर्थ होतो, स्त्रीवाद!
आणि feminism ह्या शब्दाचा अर्थ आहे स्त्रीत्व.
एकदा ह्या शब्दांचा अर्थ स्पष्ट असल्यावर पुढचे संदर्भ व्यवस्थित लागतील.
फेमिनिझम हा तिच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने तिने त्याच्यावर
बोलण्याचं ठरवलं. ती म्हणते, फेमिनिझमची रुढ संकल्पना
साचेबध्द विचारांमधे अडकली आहे. तिला लहानपणापासून स्त्री पुरुष भेदभावामुळे आलेले
अनुभव आणि तिचे सखोल विचार ह्यावरच तिचे हे विवेचन आहे. ती तिच्या एका कादंबरीच्या
प्रमोशनसाठी गेलेली असताना तिला एक नायजेरियन पत्रकार सल्ला देतो की तिने स्वत:ला
फेमिनिस्ट म्हणू नये. कारण "Feminists are women who are unhappy
because they cannot find husbands ".
मग ती स्वत:ला 'Happy Feminist' म्हणवून
घेऊ लागली. तर एका नायजेरियन बाईंनी तिला सांगितलं की हे un-African आहे. तू पाश्चिमात्य संस्कृतीने प्रभावित झाली आहेस. मग ती स्वत:ला
'Happy African Feminist' म्हणवून घेऊ लागली.
ती म्हणते ,एका क्षणी ती स्वत:ला
'Happy African Feminists Who Does Not Hate Men And Who Likes To Wear Lip Gloss
And High Heels For Herself And Not For Men' असे संबोधू लागली
पुढे ती अधोरेखित करते की आफ्रिकेमधे 'फेमिनिस्ट'
हा शब्द अतोनात नकारात्मकतेच्या ओझ्याखाली दबला आहे. 'स्त्रीवादी' म्हणजे पुरुषांचा तिरस्कार करणारी
स्त्री! किंवा स्वतःवर व इतरांवर चिडलेली, विनोदबुद्धी
नसलेली स्त्री! समाजातल्या अशा चित्र विचित्र कल्पना तिला अस्वस्थ करतात.
लहानपणीची आठवण सांगताना ती म्हणते, वर्गांमध्ये
जो अभ्यासात पहिला येईल तो मॉनिटर होणार असे ठरलेले असायचे. मी सगळ्यात जास्त
मार्क्स मिळवले होते. मी पहिली आले होते आणि दुसर्या नंबरचा मुलगा होता. तो मुलगा
होता म्हणून त्याला मॉनिटर केले होते. ही गोष्ट माझ्या मनात घर करून राहिली.
त्या नंतर अनेक वर्षांनी एकदा कार पार्किंगसाठी मदत करणार्या एका मुलाला
तिने टिप दिली. त्याने तिच्याकडे सरळ दुर्लक्ष करुन तिच्या मित्राचे आभार दिले. ते
पैसे पुरुषाकडूनच आले आहेत असे त्याने गृहीतच धरले. हा त्या माणसाचा दोष नव्हता
तर समाजाच्या मानसिकतेचा होता.
बाई आणि पुरुष यांच्यामध्ये मुळातच फरक आहे तो biological, physical, hormonal आहे. हजारो वर्षांपूर्वी जो
बलवान तो कळप प्रमुख असे. पुरुष हा शारीरिकदृष्ट्या तेव्हा ही बलवानच होता. तो कळप
प्रमुख किंवा म्होरक्या असे. पण आता जग बदलले आहे. बुध्दिवान व्यक्ती आता नेतृत्व
करते. ती व्यक्ति शारीरिकरीत्या बलवान असेलच असे नाही. ती व्यक्ति, स्त्री किंवा पुरुष कोणीही असू शकते. चिममंडा नायजेरियात स्त्रियांना मिळणार्या वागणुकीविषयी लिहिते, स्त्री कधीही एकटी क्लबमधे जाऊ शकत नाही, एकटी हॉटेलमधे राहू शकत नाही. ती सांगते वेटर्स नेहमीच स्त्रियांकडे
दुर्लक्ष करतात. हे मला अपमानास्पद वाटते.
Chimamanda asks that we should
begin to dream about and plan for a different world. Fairer world. A world of
happier men and happier women who are truer to themselves.
"WE MUST RAISE OUR DAUGHTERS
DIFFERENTLY. WE MUST ALSO RAISE OUR SONS DIFFERENTLY".
चिममंडा लिहिते " We shrink girls". मुलींवर नाना प्रकारची बंधनं आपण टाकतो जसे की तू घरात मिळवती आहेस पण चार
लोकात सांगू नको. जेणे करुन नवऱ्याला कमीपणा येईल. तुझं लग्न टिकवायचं असेल तर तू
तडजोड कर.
नायजेरियात एखाद्या मुलीचं लग्न झाले नाही तर त्या मुलीचे ते खूप मोठे अपयश
आहे असे मानले जाते; पण जर तो मुलगा असेल तर
त्याला अजून चांगली योग्य मुलगी मिळाली नाही असे समजले जाते.
चिममंडाच्या भाषेत सांगायचं तर आदर्श लग्न म्हणजे मालकी नाही, तर जोडीदारी आहे. किती सुंदर विचार आहे हा!
स्रिया वगैरे असं म्हणण्यापेक्षा 'मनुष्य'
(just human being) असं का म्हणू नये? यावर ती
सांगते, स्त्रीपण दुर्लक्ष करणे, म्हणजे
निव्वळ स्त्री असल्यामुळे आलेले कटू अनुभव दडपण्यासारखं झालं. नक्कीच मी एक मनुष्य
आहे. पण काही अनुभव हे मी एक केवळ स्त्री आहे म्हणून आणि म्हणूनच अनुभवले आहेत.
नायजेरियात काहीजणांना वाटेल की त्यांच्या संस्कृतीप्रमाणे स्त्री ही
पुरुषाची कनिष्ठ साथीदारच आहे. पण समाज आणि संस्कृती काळानुसार बदलत असतात. जसं की
इगबो समाजात जुळं जन्माला येणं हा शंभर वर्षांपूर्वी अपशकुन समजला जात होता. स्वत:
चिममंडा इगबो समाजातली आहे. पण आज मात्र तशी स्थिती नाही.
चिममंडा म्हणते...."My own definition of a feminist is a man or a woman who says, 'Yes, there is a problem with gender as it is today and we must fix it, we must do better." All of us, women and men, must do better.
वेगवेगळ्या उदाहरणांमधून ती सांगत राहते - स्त्रीवाद म्हणजे पुरुष द्वेष
नाही, स्त्रीत्व नाकारणं नाही, स्त्रियांना
जास्त महत्व देणं नाही. पण स्त्री आणि पुरुषांना ते आहेत तसे स्वीकारणे, आणि त्यांच्यातल्या फरकांचा आणि स्वत्वाचा एक व्यक्ती म्हणून आदर करणे.
स्वत:ला आलेले अनेक अनुभव, समाजात दिसणारी
स्त्रियांना आणि काही प्रमाणात पुरुषांनाही मिळणारी शारिरिक आणि मानसिक क्रूर
वागणूक तिला स्वस्थ बसू देत नाही. सतत विचार करायला प्रवृत्त करते. ते सर्व
विचारमंथन तिने या पुस्तकातून मांडले आहे. एक चांगलं, आनंदी
जग निर्माण केलं पाहिजे, जे या बिरुदांखाली दबलेले नसेल.
प्रत्येक व्यक्ती ही तिच्या कुवतीनुसार जगेल. तिचं जगणं हे उत्स्फूर्त असेल असा एक
आदर्श समाज तिच्यासमोर आहे.
ऐकायचंय चिममांडाचा ह्या पुस्तकाचा TED Talk? मग क्लिक करा. link.... https://www.ted.com/talks/chimamanda_ngozi_adichie_we_should_all_be_feminists
भारती सप्रे
Thought provoking !chimmanda च्या लिखाणाचा शोध घेतला पाहिजे
ReplyDeleteछान सोप्या भाषेत अर्थ सांगितला स्त्रिवादाचा, उगीच लोकानी या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला आहे
ReplyDelete