मागील भाग : व्हेअर इगल्स डेअर
उरी आधी सर्जिकल
स्ट्राईक झाले नाहीत अशातला भाग नाही, पण
इतक्या मोठ्या प्रमाणावर एकत्रितपणे केलेला यशस्वी, तसेच जग
काय म्हणेल याची पर्वा न करता बिनदिक्कतपणे जगासमोर जाहीर केलेला हा भारताचा
पहिलाच हल्ला असावा.
भारतीय सैन्याने आधुनिक काळात कमी पराक्रम गाजवलेला नाही.
पहिल्या महायुद्धातील पराक्रमाबद्दल विशेष बोलल्या जात नाही पण दिल्लीतील
"तीन मूर्ती चौक आणि भवन" त्याची आणि हैफाच्या युद्धाची साक्ष देत उभे
आहे ज्याची किंमत आपल्यापेक्षा इस्रायली लोकांना अधिक आहे. दुसऱ्या महायुद्धातील
आझाद हिंद सेनेचा पराक्रम, ६१ च्या युद्धात विना-सामग्री
केलेलं चीन सोबतचे युद्ध, ६५-६६ मध्ये त्यावेळच्या
अत्याधुनिक अमेरिकन पॅटन रणगाड्यांचा केलेला खात्मा, ७१ चे
बांगलादेश स्वतंत्र करण्याचे युद्ध, त्यातील इंदिरा गांधींचे
नेतृत्व आणि फील्ड मार्शल माणेकशॉ यांची अचूक युद्धनीती, ९९
चे कारगिल, कमी का घटना आहेत? यातील
कित्येक घटनांवर सिनेमे बनू शकतात किंवा पुस्तके लिहिली जाऊ शकतात.
पण
आपल्या समाजाला सैन्याला गृहीत धरण्याची सवय झाली आहे. सियाचीनच्या सैनिकांची गरम
कपड्यांची मागणी तेव्हाच पुरवण्यात आली जेव्हा संरक्षण मंत्र्यांनी मंत्रालयातील
बाबू लोकांना सियाचीनचा दौरा करून येण्याचा आदेश काढला. अगदी बांगलादेशचे युद्धही
म्हटले तर हा स्वातंत्र्योत्तर भारताचा एक अजोड विजय होता. किती सिनेमे निघाले ह्यावर?
पराभूत मानसिकतेत हजार वर्षे घालवल्यावर "आम्ही युद्ध
जिंकलो" असे म्हणायला, किंवा शांतीप्रिय वा अहिंसावादी
तत्वांबद्दल आपल्या मनात असलेल्या खुळचट कल्पनांमुळे आम्ही शत्रूवर हल्ला केला हे
सांगायला आम्हाला लाज वाटते की काय न कळे. त्यामुळेच युद्ध जिंकल्यावरही आमचे नेते
पराभूत मानसिकतेत किंवा पराभूताला काय वाटत असेल वगैरे मानसिकतेत तहाची बोलणी
करायला बसतात आणि रणांगणावर कमावलेले तहाच्या टेबलावर गमावतात. त्यामुळेच की काय
आमच्या सैन्याचा पराक्रम गायलाही आम्हाला कानकोंडे व्हावे? स्वतः
काही न करता मिळालेल्या फुकटच्या स्वातंत्र्याचा परिणाम आहे हा. स्वातंत्र्याची
खरी किंमत कळायची असेल तर एक वर्ष तरी सैन्याची नोकरी किंवा प्रशिक्षण हा एकमेव
मार्ग आहे, असो.
तर अश्या या परिस्थितीत सर्जिकल स्ट्राईक
करणे नव्हे तर आम्ही तो केला हे जगाला सांगणे ही एक नवलाची बाब होती. विशेष म्हणजे
त्यामुळे शांतीग्रस्त लोकांची एकही भीती खरी ठरली नाही. अरे, आमच्या घरी हल्ला केल्यावर आम्ही त्याचे उत्तर दिले, हे सांगायला कसली लाज? उलट हे सांगितले नाही तर
अख्ख्या देशाला "सॉफ्ट टार्गेट" बनवण्याची शत्रूची रणनिती यशस्वी होऊ
शकते. त्यामुळेच सर्जिकल स्ट्राईक हे उत्तरच नव्हे तर "तुम्ही आमच्या घरी
हल्ला केला तर आम्ही तुमच्या घरी घुसून तुम्हालाही मारू" हा संदेश लोकांच्या
मनात उतरला आणि त्याला लोकांनी डोक्यावर घेतले. युद्धशास्त्रीय, सैनिकी तसेच राजकीय चाली बदलण्याचे हे द्योतक आहे आणि त्यातूनच समाजाची
मानसिकताही बदलली जाऊ शकते. "उरी" सिनेमा संपल्यावर थिएटर्समध्ये "भारत माता की जय" चा झालेला
उत्स्फूर्त जयघोष हे त्याचेच प्रतीक आहे.
पण
खरंच का सर्जिकल स्ट्राईक हे आम्ही पहिल्यांदा ऐकले? आमच्याच आर्मीने हे अनेकदा केले आहेत असं जाहीर झालं नसलं तरी सगळ्यांना
माहित आहे. पण इतिहासात बघायला गेलं तर आपणा मराठी लोकांना शिवाजी महाराजांचा
"गनिमी कावा" नवीन नाही. पण ते इतकं स्वाभाविक वाटतं की त्याचं विशेष
कौतुकही वाटत नाही. लहानपणी आपण इतिहासात शिवाजी महाराजांच्या गोष्टी वाचल्या
असतात, त्यावर उत्तरे लिहून इतिहासात गुणदेखील मिळवले असतात.
पण त्यांनी जे केले ते किती कठीण होते त्याची आपण कल्पना करत नाही. अफझलखान
भेटायला आला की तो मरणारच आहे हे आपल्याला ठाऊक असते, किंवा
शाइस्तेखानची बोटे कापल्याच जाणार आहेत किंवा औरंगजेबाच्या कैदेतून महाराज
पेटाऱ्यातून अलगद पसार होणार आणि स्वराज्यात येणार हे आपण गृहीतच धरले असते. पण ही
सर्व पश्चातबुद्धी. हे सर्व जेव्हा महाराजांनी आखले असेल ते खरेच इतके सोपे असेल
काय? नितीन चंद्रकांत देसाईंच्या "शिवछत्रपती"
सिरीयल मध्ये आग्र्याची कैद जेव्हा दाखवली तेव्हा कुठे जाणीव झाली की किती कठीण
होते ते. पुण्याच्या एक लक्ष मुघल सैनिकांच्या वेढ्यात १०० मावळ्यांनिशी
शाहिस्तेखानला मारण्यासाठी हल्ला करणे आणि यशस्वीरीत्या सिंहगडावर दाखल होणे इतके
सोपे का होते ते? अफझलखानचा वध असेल, सिद्दी
जौहरचा वेढा असेल, तानाजी मालुसरेंचा सिंहगड हल्ला असेल,
कोंडाजी फ़र्जन्दचा पन्हाळा घ्यायला ६० मावळ्यांची कमांडो तुकडी असेल
हे सर्व सर्जिकल स्ट्राईक होते.
प्रचंड तसेच सूक्ष्मपातळीवरची आखणी आणि तंतोतंत
वेगवान कृती, ह्या दोन गोष्टी गनिमी काव्याचा आत्मा. त्याचे
खरे प्रणेते होते एकही युद्ध न हरलेले शिवाजी महाराजांचे पिताश्री शहाजी महाराज
आणि शिवाजी महाराजांनी त्याचे जगाला पुन्हा पुन्हा दर्शन घडवले. बहुतेक सगळं “लीडिंग फ्रॉम द फ्रंट”! बरं,
प्रत्येक हल्ला हा वेगळ्या प्रकारचा, एकच
घोटलेली पद्धत नाही तर परिस्थितीचा आणि शत्रूचा अंदाज घेऊन चढाई करायची.
महाराजांच्या आधी आपण जे पारतंत्र्यात पडलो त्याचे कारण आपला तोच खुळचट नैतिकतेला
धरून राहण्याचा हट्ट. आम्ही रात्री युद्ध करणार नाही, शत्रूला
बेसावध गाठणार नाही, त्याला पाठ दाखवणार नाही हे सर्व आपला
शत्रूही ह्या अटी पाळणार असेल तर ठीक, नाहीतर आपणच स्वतःच्या
अटी पाळत बसायचे आणि शत्रू तुम्हाला पकडून मारायला मोकळा. हेच ७०० वर्ष झाले त्यानंतर कुठे शहाजी महाराज
आणि शिवाजी महाराजांनी हा मंत्र दिला की शत्रूला विधिनिषेध नसेल तर आपणही बाळगू
नये. हे कळायला ७०० वर्षे लागावीत? आणि अजूनही कळलं आहे का
आम्हाला? हीच गोष्ट सर्जिकल स्ट्राईकने शिकवली, आम्ही ती वागवायला चुकणार नाही ह्याची जाहीर कबुली सरकारने दिली, आणि सामान्य जनतेने मनापासून मान्यता दिली, यात खरे
उरीच्या सर्जिकल स्ट्राईकचे तसेच "उरी" सिनेमाच्या यशाचे रहस्य दडले
आहे.
हे
सारे विचार कागदावर उतरवायचे असे ठरवले आणि पुलवामाच्या भ्याड हल्ल्याची बातमी आली
ज्यात आपले ४६ सैनिक हुतात्मा झालेत. पुन्हा तेच!! शत्रू कुठलाही विधिनिषेध बाळगत
नाही,
तो अतिरेकी व्हिडीओ मध्ये म्हणतोय की हे युद्ध आहे आणि आमच्यातील
काही लोक "वाट चुकलेला युवक" म्हणून त्याची भलामण करतात? त्याने असे का केले त्याचे समर्थन शोधतात? आणि
आम्ही ह्याला महत्व देतो? कठीण आहे.
दुसरीकडे सर्जिकल स्ट्राईक करा म्हणून दबाव आणणे सुरू आहे.
प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर द्यायचे का? आजची परिस्थिती
पाहून उत्तर देणे भाग आहे. शत्रू सावध असणार सर्जिकल स्ट्राईकसाठी. दुसरं उत्तर
शोधू देत की सैन्याला आणि सरकारला. कदाचित यावेळेस पाकिस्तानात दडून बसलेल्या
अफझलखानचे मुंडके किंवा शाईस्तेखानची बोटे कापायची असतील तर? किंवा "वाट चुकलेले युवक" तिकडेही असतीलच की. प्रश्न “जशास तसे” योग्य का अयोग्य हा नाही, पण ज्याला जी भाषा समजते त्या भाषेत उत्तर देण्याचा आहे.
आज पुलवामा हल्ला
होऊन तीन दिवस झालेत आणि काय भूमिका सैन्य घेणार ते स्पष्ट नाही जे योग्यही आहे.
सैन्याला हवे तसे आणि हवे तिथे उत्तर देण्याची पूर्ण स्वायत्तत्ता आहे असे
पंतप्रधानांनी नुकतेच जाहीर केले आहे आणि सैन्याने काय कसे करावे ह्याचे
वातानुकूलित खोलीत बसून आपण आणि मीडियाने का ज्ञान पाजळावे? आपले
बहुतेक सैन्य अधिकारी सिंहगडाच्या
पायथ्याशी असलेल्या खडकवासलाच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजे NDA मध्ये शिकलेले आहेत.
आता त्यांना तिथे
“शिवाजी महाराजांची युद्धनीती” असा काही विषय असतो की नाही ते माहित नाही, पण सिंहगडाच्या कुशीत असल्यावर
तो विषय असलाच पाहिजे अशी खात्री आहे. कुठ्ल्यावेळी काय
करावे हे आपल्या सैन्याला चांगलेच ठाऊक आहे आणि आता त्याचेही स्वातंत्र्य आमच्या
सरकारने त्यांना दिल्यामुळे आपण प्रार्थना करावी पण काळजी करण्याची किंवा वादविवाद
करण्याची गरज नाही.
गरुडाचे पंख असणारे "व्हेअर इगल्स डेअर" मनात
कोरलेले निधड्या छातीचे वीर आहेत आमच्या सैन्यात. फक्त
आपल्यामध्ये जे बुद्धिभ्रम करणारे बुद्धिवादी किंवा विश्लेषक पत्रकार/वकील आहेत
त्यांना पूर्ण अनुल्लेखित करू या आणि त्यांना समजू देत की त्यांना किंवा त्यांच्या
कोल्हेकुईला काहीही महत्व नाही. सैन्याला हवा आहे फक्त आपला पाठिंबा तो एका आवाजात देऊ या. तो जयघोष, आपल्या भावना आपल्याच शब्दात व्यक्त करताना कोण काय म्हणेल याचीपण आपण लाज
बाळगणार आहोत का?
शिवाजी महाराज की जय ! भारत माता की जय !!!! जय हिंद !!!
रवींद्र केसकर,
१७ फेब्रुवारी २०१९
ता. क. - मागील अंकात "उरी" सिनेमाचे
परीक्षण लिहिताना वरील विचार त्याला पुरवणी म्हणून जोडले होते, पण विस्तारभयास्तव वेगळा लेख
म्हणून ते कट्टाच्या पुढील अंकात द्यायचे ठरवले. हे लिहिले होते पुलवामा
हल्ल्याच्या दोन दिवस नंतर. एव्हाना झेलम मधून बरेच पाणी वाहून गेले आहे. यावेळी
मागल्या वेळेसारखा सैन्याने जमिनी सर्जिकल स्ट्राईक न करता हवाई दलामार्फत एअर
स्ट्राईक केला आणि १९७१ नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्या. एका ठिकाणी
जमलेल्या अनेक दहशतवाद्यांचा आणि जमिनीखाली असलेल्या त्यांच्या कंट्रोल रूमचा
अत्यंत शक्तिशाली व अचूक अश्या स्पाईस-२००० या इस्रायली बॉम्बने २६
फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीचा मुहूर्त साधून खात्मा करण्यात
आला.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी झालेला एफ-१६ चा हल्ला मिग आणि सुखोई विमानांनी
परतवून लावला, तसेच ४० वर्षे जुन्या मिगचा वापर करून विंग
कमांडर अभिनंदनने एफ-१६ पाडले. अभिनंदनची युद्ध अटक आणि २ दिवसात (बहुधा
आंतरराष्ट्रीय दबावामुळे) झालेली सुटका यातच बऱ्याच लोकांना युद्ध जिंकल्याचा आनंद
झाला. पाकिस्तान सीमा थंडावून सजग मात्र झाली.
मात्र म्यानमार बॉर्डर वर त्याच
वेळी भारतीय तसेच म्यानमार सैन्याने एकत्रितपणे मोठी कारवाई करून चीनचा पाठिंबा
असलेल्या १०० हून अधिक अतिरेक्यांना कंठस्नान घातले, याची
वाच्यता मात्र कमी झाली. थोडक्यात, भारतीय संरक्षणविषयक धोरण
जाणीवपूर्वक शांतिदूतांच्या "शांतिनीती"कडून शिवाजी महाराजांच्या
"शिवनीती"कडे वाटचाल करते आहे. हवं तिथे बाहेरून आंतरराष्ट्रीय राजकारणी
दबाव वापरणे आणि हवं तिथे सैनिकी शक्ती वापरणे, हे शिवधोरण
आता नवीन "नॉर्मल" होऊ घातलं आहे. आध्यात्मिकरित्या "शिवोहम"
म्हणून स्वतःला ओळखायचे हे जरी ह्या भूमीचे सर्व मानवजातीसाठीचे सर्वोच्च स्वप्न
असले तरी त्यासाठी लागणारे पोषक वातावरण अबाधित ठेवण्यासाठी बाह्यदृष्ट्या
"शिवनीती"ला पर्याय नाही. शांतीचा मार्ग हा सत्य आणि सौंदर्याचा आहे खरा,
पण त्याला शिवाची जोड दिली नाही, तर
"सत्यं शिवम सुंदरम" हे प्रगट होऊन मूळ धरू शकत नाही, हेही तितकेच खरे!
No comments:
Post a Comment