किस्से,कहाण्या दुसऱ्या महायुद्धाच्या - भाग ३


एका प्रसिद्ध लढाईचे सुप्त पैलू



दोस्त राष्ट्रांचे ६ जून १९४४ ला ऑपेरेशन 'ओव्हरलॉर्ड' द्वारे उत्तर फ्रान्सवरचे आक्रमण, ‘लाँगेस्ट डे ह्या नावाने लिहिलेल्या पुस्तकाच्या व त्याच नावाच्या फिल्ममुळे माझ्या पिढीच्या बऱ्याच लोकांना माहीत आहे. आजही हा सिनेमा यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्यामुळे त्या लढाईची जुजबी माहिती देऊन, मुख्यत्वे करून त्या युद्धाच्या काही सुप्त पैलूंवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न आहे.

दिनांक सहा जून १९४४ला दोस्त राष्ट्रांनी उत्तर फ्रान्सच्या किनाऱ्यावर पाच ठिकाणी आपले सैन्य उतरवले. पश्चिमेकडून पूर्वेकडे ह्या किनाऱ्यांना उटाह, ओमाहा, गोल्ड, जुनो आणि स्वोर्ड अशी सांकेतिक नावे दिली होती. आक्रमणाची एकूण व्याप्ती साधारण ५२ मैलांची होती. 



ओमाहा बिच 
आक्रमणाच्या आधी छत्रीधारी सैनिकांच्या द्वारे दळणवळण यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त करून तेवढा किनारा एकाकी केला होता. चोवीस तासांमध्ये 150,000 सैन्य व साधनसामुग्री उतरवून पुढच्या काही दिवसांमध्ये ह्या पाची ठिकणांना एकमेकांशी जोडून एक सलग मोर्चा प्रस्थापित केला व दोन महिन्यांच्या त पॅरिसला मुक्त करून जर्मनीकडे मुसंडी मारली.

वर सांगितल्याप्रमाणे जरी ह्या युद्धाचे बरेच तपशील सर्वसामान्यांना विदित असले तरी ह्या युद्धाच्या खालील बाबींना तेवढी प्रसिद्धी नाही मिळाली.

१. दोस्त राष्ट्रे उत्तर फ्रान्सवर पुढील काही दिवसांत आक्रमण करतील ह्याची जर्मनीला कल्पना होती, पण नेमके कोठे आणि कधी हे आक्रमण होईल ह्याचा सुगावा त्यांना लागला नाही. लाखो लोकांचा ह्या मोहिमेमध्ये सहभाग असूनसुद्धा संपूर्ण गुप्तता पाळण्यात दोस्त राष्ट्रे यशस्वी झाली.


२. जर्मनीच्या दोघा सेनापतींमध्ये हल्ल्याचा प्रतिकार कशा प्रकारे करावा ह्या बाबतीत एकवाक्यता नव्हती. रोमेलच्या मते हल्ला समुद्रकिनाऱ्यावरच परतवून लावावा आणि सरसेनापती रुंडस्टेडच्या मते शत्रुसैन्याला थोडे आत येऊ देऊन मग घेरावे.



३. हल्ल्याच्या आदल्या दिवशी जोराचे वादळ घोंघावत होते व समुद्रही खवळलेला होता. त्यामुळे पुढील काही दिवस आक्रमणाची शक्यता न वाटल्यामुळे रोमेल आपल्या परिवाराला भेटायला जर्मनीच्या एल्म ह्या गावी गेला होता व बरेचसे अधिकारी एका सभेसाठी आपापले मोर्चे सोडून गेले होते. अशा वेळी दोस्त सैन्याच्या मुख्य हवामानतत्ज्ञानी, हवामान चोवीस तासांत सुधारेल असे आत्मविश्वासपूर्वक सांगितले आणि त्याच्यावर भरवसा ठेवून दोस्तांच्या सरसेनापती जनरल आयसेनहॉवर ह्यांनी आक्रमण करण्याचा निर्णय घेतला.


४.ह्या युद्धाच्या तयारी आणि विजया दोस्तराष्ट्रांच्या कल्पनाशक्तीचा आणि तांत्रिक कुशलतेचा मोठ्ठा वाटा होता. शत्रूच्या रडार यंत्रणेला चकविण्यासाठी विमानातून अल्युमिनियमचे बारीक तुकडे टाकण्यात आले. पाण्यात तरंगू शकणारे रणगाडे तयार केले गेले.
दोन लोखंडी बंदरे तयार केली गेली आणि त्यांना पाण्यातून ओढत आणून समुद्रकिनाऱ्यावर स्थापित करून किनाऱ्यापर्यंत मोठी जहाजे आणण्याचा मार्ग मोकळा केला गेला. पेट्रोल आणि इतर तेल वाहून नेण्यासाठी पाण्याच्या खालून इंग्लंडपासून फ्रान्सच्या किनाऱ्यापर्यंत पाईपलाईन टाकली गेली. स्फोटके भरलेले काही पुतळे छत्रीधारी सैनिकां बरोबर उतरवले. अंधारात आपले सहकारी ओळखण्यासाठी प्रत्येक सैनिकाला लहान मुलांच्याकडे असते तशी टिक-टोकची कळ दिली होती.

५.दोस्तांचा हल्ला परतविण्यासाठी जर्मन सैन्याला रणगाड्यांची तातडीने आवश्यकता होती. अश्या रणगाड्यांच्या दोन पलटणी त्या परिसरात होत्या सुद्धा!  पण त्यांना आपल्याला विचारल्याशिवाय हलवायचे नाही अशी हिटलरची सक्त ताकीद होती. आणि झोपलेल्या हिटलरला उठविण्याचे धाडस करायला त्याच्या मुख्यालयातले सेनापती तयार नव्हते. अशा प्रकारे एका व्यक्तीच्या झोपेमुळे एका राष्ट्राने एक महत्त्वाचे युद्ध हरले.




इतिहास हा नेहमी जेत्याद्वारे लिहिला जातो असे म्हणतात. ऑपरेशन ओव्हरलॉर्डसुद्धा ह्याला अपवाद नाही. पण नुकतेच, ‘D-day through German eyes by Holger Eckhardt’ हे पुस्तक ऑडिओ बुकच्या स्वरूपात वाचण्यात आले. ह्या पुस्तकात ह्या लढाईत भाग घेतलेल्या जर्मनीच्या सर्वसाधारण सैनिकांच्या मुलाखती देण्यात आल्या आहेत. ह्या सैनिकांनी त्यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगांचे वर्णन केले आहे. त्या सर्वांमध्ये खालील बाबतीत एकवाक्यता आहे

१.आक्रमण पुढील काही दिवसांमध्ये होईल असे सगळ्यांना वाटत होते; पण त्याची वाट पाहणे फार कष्टदायक होते.
२. दोस्तराष्ट्रांजवळ साधनसामुग्रीची प्रचंड मुबलकता होती.
३. युद्धक्षेत्रावरील आकाशावर दोस्तराष्ट्रांचे एकछत्री स्वामित्व होते.
४. फ्रेंच नागरिकांची मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली.
५.आपण युरोपच्या एकात्मतेसाठी अँग्लो-अमेरिकन सैन्याशी लढतो आहे अशी सर्वसामान्य सैनिकांची भावना होती.




नॉर्मन्डीची लढाई ही जर्मनीच्या संपूर्ण पराभवाची सुरवात होती आणि त्यानंतर अवघ्या ११ महिन्यात ८ मे १९४५ रोजी दुसऱ्या महायुद्धाचा युरोपमध्ये शेवट झाला.


डॉ.दिलीप कानडे

kanadedilip@yahoo.com


1 comment: