किस्से आणि कहाण्या दुसऱ्या महायुद्धाच्या - ४


द्वितीय महायुद्धात एका भारतीय डिव्हिजनची कामगिरी



भारतीय सैन्याच्या चवथ्या पायदळ डिव्हिजनने आपल्या कारकिर्दीत अतुलनीय शौर्य गाजवलेले आहे. त्याच्या आक्रमकतेने प्रभावित होऊन त्याला रेड ईगल डिव्हिजन असे टोपण नाव दिलेले आहे.

भारतीय डिव्हिजन
ह्या डिव्हिजनची स्थापना द्वितीय महायुद्धात १९३९ला झाली. उत्तर आफ्रिकेच्या समरात ह्या डिव्हिजनने नऊ मोहिमांमध्ये भाग घेतला होता, त्यातील सिद्दी बर्नीची लढाई विशेष उल्लेखनीय आहे.

डिसेम्बर १९४० मध्ये ही डिव्हिजन पाचव्या डिव्हिजनच्या मदतीसाठी सुदानला गेली व दोघांनी मिळून इटलीच्या दहा डिव्हिजन्सचा पराभव केला. केरेनच्या लढाईत ४/६ राजपुताना रायफल्सच्या सुभेदार रिचपाल रामला व्हिक्टोरिया क्रॉस हे सर्वोच्च शौर्य पदक मिळाले.

त्यानंतर ह्या डिव्हिजनला इटलीत पाठविण्यात आले. तेथे त्यांनी दोस्त राष्ट्रांच्या इटलीवरील मोहिमेत भाग घेतला. त्या युद्धातील मॉँट कॅसिनोची लढाई अत्यंत महत्त्वाची होती, कारण ती जिंकल्या शिवाय दोस्तांना रोम पादाक्रांत करणे शक्य नव्हते.

दुसऱ्या मॉँट कॅसिनो मोहिमेत ह्या डिव्हिजनला एका चंद्राकार मोर्चाने  दक्षिण -पश्चिमेकडून पॉईंट ५९३ जिंकायचे होते व तेथून दक्षिण-पूर्वेकडे वळून उभ्या कड्यावर चढून तेथील दफनभूमी काबीज करावयाची होती.
ब्रिटीश आर्मी इन इटली 

हे सगळे करण्याआधी न्यूझीलंड डिव्हिजनने कॅसिनो डोंगराचा पायथा काबीज करून आपल्या तोफांनी मदत करावी अशी योजना होती, पण त्यांना ते जमले नाही व चवथ्या भारतीय डिव्हिजनची अपरिमित हानी झाली. नंतर झालेल्या तिसऱ्या मोहिमेत पण ह्या डिव्हिजनचे अनेक सैनिक घायाळ झाले व बरेच मृत्यू पावले. शेवटी चवथ्या मोहिमेनंतर दोस्तांना ही लढाई जिंकता आली आणि ही डिव्हिजन उत्तर इटलीत गॉथिक लाईनवर तैनात करण्यात आली.

युद्धाच्या शेवटी डिसेंबर १९४४ मध्ये चवथ्या भारतीय डिव्हिजनला ग्रीसमध्ये पाठवण्यात आले.
दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेच्या वाळवंटात अनेक महत्त्वाच्या लढाया झाल्या. डेझर्ट फॉक्स असे टोपणनाव असलेल्या जर्मन सेनापती रोमेलचा मुकाबला करण्यासाठी दोस्त राष्ट्रांना प्रथम व्हेव्हल नंतर औचिनलेक आणि सरतेंशेवटी मॉंटगोमेरीची नेमणूक करावी लागली. मॉन्टिने आपल्या सैन्याचे नाव डेझर्ट रॅट असे ठेवले होते व चवथी पायदळ डिव्हिजन त्यांचा महत्त्वाचा आधार होती. 


Ghurkhas in Tunasia 16 March1943
लेखक चाँद दासच्या मते ह्या डिव्हिजनने एक लाख पन्नास हजार युद्धकैदी काबीज केले व स्वतःचे २५००० सैनिक गमावले. ह्या डिव्हिजनला १००० हून जास्त सन्मान व प्रशस्तिपत्रे मिळाली, ज्यांत चार व्हिक्टोरिया क्रॉस व तीन जॉर्ज क्रॉस होते. ते पुढे असेही म्हणतात की युद्धक्षमतेबरोबरच ही डिव्हिजन ह्यांतील सर्व सैनिकांत असलेल्या परस्पर सौहार्दासाठी पण कायम स्मरणात राहील.
ह्या डिव्हिजनबद्दल फिल्ड मार्शल व्हेव्हल लिहितात, 'ह्या डिव्हिजनची नोंद विश्व सामरिक इतिहासात, एक सर्वश्रेष्ठ सैन्यदल अशी केली जाईल.'

उपसंहार :
दैवगती कशी बदलते ह्याचे एक उदाहरण म्हणूनसुद्धा ह्या चवथ्या पायदळ डिव्हिजनकडे बघता येईल. १९६२ मध्ये ही डिव्हिजन भारत-चीन सीमेवर नेफामध्ये तैनात होती. साधनसामुग्रीच्या अपूर्णतेमुळे आणि सेनापतींच्या अकुशल नेतृत्वामुळे ह्या शूरवीर डिव्हिजनला पराभवाची नामुष्की पत्करावी लागली.

ता.क. : वरील सर्व माहिती व सोबतची छायाचित्रे Wikipedia वरून प्राप्त केली आहे.


दिलीप कानडे
kanadedilip@yahoo.com

1 comment:

  1. Best article. It looks like history professor has written this,but doctor you are fabulous.

    ReplyDelete