झुंड




मोलकरणीच्या मुलांना, अभ्यासात मदत करायला आपण स्वतःहून पुढे येतो. आपल्या घरात टेबल खूर्चीवर बसवूनही त्यांचा अभ्यास घेतो. तळमळ जरी नसली तरी ह्या मुलांनी आयुष्यात पुढे यावं अशी आस्था बहुतेक पांढरपेशा वर्गाला असते.

      पण जेव्हा हीच मुलं, घराजवळच्या बागेत, लहान मुलांची घसरगुंडी किंवा 'see-saw' सारखी खेळणी दांडगाईने धसमुसळेपणाने वापरताना दिसतात, ज्या हिरवळीवरनं  चालायला मज्जाव आहे अशा भागांत मुद्दामच  लोळताना किंवा फुटबॅाल खेळताना दिसतात, एखाद्या काठी घेतलेल्या आजोबांना चालताना धक्का द्यायला कचरत नाहीत, तेव्हा आपली सटकते. आपल्या कपाळावर नापसंतीची आठी नी त्यांच्या नजरेत मग्रूर अरेरावी!! तुम्ही असं वागू शकत नाहीहे सांगायची हिंमत अंगाशी येऊ शकते हे सुज्ञ माणूस जाणून घेतो, आणि तिथून काढतां पाय घेतो. आपल्याला वैर वाढवायचं नसतं, तंटाबखेडा करायचा नसतो. असल्या रानटी मुलांच्या नादाला लागणं, परवडणारं नाही, असा विचार करणारी आपण सुशिक्षित माणसं!!

पण खरंच हा सूज्ञपणा आहे का? हा सुशक्षितपणा तरी आहे का? ह्यांना सुसंस्कृत बनवण्यासाठी आपण काही करू शकू का? आपण जे करतोय ते अगदीच तुटपुंजं आहे ही जाणीव, 'झुंड' सिनेमा पहाताना जन्म घेते. समाजातील ह्या स्तराला थोडंसं मार्गदर्शन, थोडीशी आपुलकी मिळाली की त्यांच्यात बदलाचे वारे वाहू शकतील हा संदेश सिनेमा देतो. त्यांना आपलंसं मात्र करायला हवे. नागराज मंजुळें यांनी दिग्दर्शित केलेल्या झुंड  सिनेमाच्या निमित्ताने अशा विचारांना चालना मिळते. 'झुंड' ला मराठी शब्द टोळकं!!  टोळकं ते टीम म्हणजेच सुसंघटित समूह अशी झोपडपट्टीतल्या मुलांची विजय सरांबरोबरची वाटचाल, अडीच तीन तास आपल्याला खिळवून ठेवते.

बेदरकारपणाचं, अंगाशी येऊ शकेल अशा धीटपणाचं बाळकडू प्यायलेली मुलं-मुली. गमवायला ह्यांच्याकडे मुळातच काही नाही. चांगलं काही पाहिलेलंच नाही. दारूबाज बाप नी कष्टाने संसाराचा गाडा ओढणारी आई. तिला मदत करण्यासाठी, घराला हातभार लावण्यासाठी बिनदिक्कत प्राणांची बाजी लावणारी, चोऱ्या करणारी, गुन्हे करणारी ही मुलं. अरे म्हटलं की का रे असा जबाब देणारी ही मुलं मनाने वाईट नसतात. त्यांना संधी हवी. दिशा हवी. पाठीशी ठामपणे उभं रहाणारं कुणीतरी हवं.

त्यांचा कायापालट होईपर्यंत पुन्हा गुन्हेगारीच्या दलदलीकडे ती ओढली जातील अशा घटनाही घडत रहातात. पोलीसांचा व समाजमान्य लोकांचा नकारात्मक खाक्या, मुलांच्या सुधारणेत अडचणीचा ठरतो. त्यावर मात करून, अरे ला का रे हेच उत्तर नकोय, माफी मागितलीस तर काहीच बिघडणार नाही. हा मध्यमवर्गीय संस्कार विजय बोराडे सर म्हणजेच अमिताभ ह्या टीमच्या म्होरक्याला, अंकुशला देताना आपण ऐकतो. बेदरकार डॅानचा आज्ञाधारक अंकुश होताना आपण पहातो. तोच ह्या सिनेमाचा टर्निंग पॅाइंट!!

खेळहे असं एक माध्यम आहे की ज्यातून शिस्तबद्ध समाज निर्माण होऊ शकेल. मागे पडलेल्या समाज घटकांना गुन्हेगारीपासून दूर न्यायला, समाजातली उच्चनीचतेची दरी दूर व्हायला त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. मंजुळेंनी धगधगतं वास्तव आपल्या समोर आणलं आहे पण कुठेही तद्दन फिल्मीपणा न आणता. जात, धर्म वगैरेंना ह्या गोष्टीत महत्व दिलेलं नाही हे विशेष!! आंबेडकर जयंती डीजे ने गाणी लावून नी नाचून साजरी होते, हे अपेक्षित नाही पण हाच विरंगुळाही आहे, एवढाच जाता जाता दिलेला संदेश. सुरूवातीला बिन चेहऱ्याची वाटणारी माणसं हळूहळू चेहरे धारण करतात नी आपल्याला समजायला लागतात. नजर भिडवून असंतोष व्यक्त करण्याची सवय उद्धट वाटली तरी ते तसं का हे कळायला लागतं.

लेखक, दिग्दर्शक, नागराज मंजुळेंनी भल्याभल्या दिग्गजांना मागे टाकलं. ह्या सिनेमात अमिताभ हवा होता का? ह्याचं उत्तर अर्थातच 'हो' असं येतं. नजरेने संवाद साधणारी सायली पाटील ही सिनेमाची हीरॅाईन छान लक्षात राहीली. अजय अतुल ह्यांचं संगीत विषयाला नी प्रसंगांना शोभेल असंच आहे. असा हा झुंडचा लेखाजोखा!!

चित्रपट रसिकांनी जरूर भेट द्यावी अशी ही 'झुंड'.

नेहा भदे




1 comment:

  1. अजून तरी हा सिनेमा पाहिलेला नाही पण आता परीक्षण वाचून पहावासा वाटतो आहे. परिक्षण छान केले आहे.

    ReplyDelete