नात्यांचे रेशमी बंध: भाग 2


अदिती आणि मंदारमधला दुरावा वाढत चालला होता. काही गोष्टी-काही चर्चा टाळण्यासाठी मंदार आता मध्यरात्रीपर्यंत ऑफिसमधेच काम करत बसायचा आणि 'मीटिंग आहे' असा बहाणा करून सकाळी लवकरच ऑफिसला निघून जायचा.
इकडे अदितीही ऑफिसमधून आल्यावर 'सास-बहू' सिरिअल्समध्ये स्वतःला गुंतवायचा प्रयत्न करत होती. दोघांमधला कायिक, वाचिक, मानसिक दुरावा वाढत चालला होता. अदितीला कळत होतं, मंदार घरी राहिला तर डॉक्टर्स, अपॉइन्टमेन्ट आणि ट्रीटमेंटची चर्चा होणार म्हणून मंदार घरी थांबत नाहीये. मंदारलाही कळत होतं, समोर टीव्ही सुरू असला तरी अदितीचं त्या सिरीयलकडे मुळीच लक्ष नाही आणि ती कसल्या तरी गाढ विचारात गुंतलीये. दोघांनाही जाणीव होती, एकमेकांच्या मानसिक ताणाची, दोघांनाही कळत होतं, आपण एकमेकांशी  बोलले पाहिजे... पण ते फक्त कळत होतं, वळत नव्हतं.
एक दिवशी शनिवारची सुट्टी आली, एकही मित्र फ्री नसल्यामुळे त्या दिवशी मंदारला घरी बसणं भाग पडलं. सकाळचा चहा-नाश्ता आटोपून मंदार आपला मोबाइल घेऊन बेडरूममध्ये लोळत पडला. कधी मोबाइलवर मेसेज चेक करत होता, तर कधी बेडरूममधल्या टीव्हीवर क्रिकेट सामना पाहत होता. काही वेळानंतर त्याला जाणवलं की घरात अदिती असूनही तिचा वावर त्याला जाणवत नव्हता. हळूच त्याने मागोवा घेतला, अदिती बाल्कनीमध्ये झोपाळ्यावर बसून कुठलंसं पुस्तक वाचत होती. थोडं जवळ गेल्यावर त्याला कळलं की पुस्तक तिच्या हातात आहे, पण शून्यात बघत ती काही तरी विचार करत आहे आणि हळूच दोन आसवांचे ओघळ तिच्या गालावरून ओघळले. ते पाहून मंदारलाही गहिवरून आलं आणि त्याचाही बांध फुटला. 


तो लगेच तिच्या बाजूला जाऊन बसला आणि तिचा हात हातात घेतला. बराच वेळ दोघंही काहीच बोलले नाही. जेव्हा मनातलं वादळ शमलं तेव्हा मंदार म्हणाला, "आपल्या भविष्याचा विचार करण्यात आपण आपले वर्तमान वाया घालवत आहोत. आपल्याला मूल होत नाहीये याचा अर्थ आपल्या जगण्याला काही अर्थ नाही असा होत नाही. मूल नसतानाही आपण आपलं आयुष्य आनंदात घालवू शकतो. आपण आपल्या आनंदाला एका कुंपणामध्ये बांधून ठेवलंय.त्या कुंपणापलीकडे आपण विचारच करत नाही. माझा आनंद तुला आनंदी बघण्यात आहे, तुझ्याशिवाय आपल्या घराला घरपण नाही आणि मला सुख-समाधान नाही. तुझ्याही आयुष्यात जर मी आणि माझा आनंद महत्त्वाचा असेल तर आज मला वचन दे, या पुढे आपण, आपला- आपल्या नात्याचा आणि आपल्या आनंदाचा जास्त विचार करू.अदितीलाही मंदारचं म्हणणं पटलं. तिलाही 'माझ्यामुळे मूल होत नाहीये, माझ्यात दोष आहे’, या अपराधी भावनेतून बाहेर पडायचं होतं. मंदार आपल्यावर अजूनही खूप प्रेम करतो हे ऐकून तिला खूप बरं वाटलं. त्या दिवशी दोघंही खूप खूष होते. दोघांनी खूप गप्पा मारल्या. दोघांनी स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं. 

दुसऱ्या दिवशीपासून अदितीने योगासनांचा क्लास जॉईन केला, ती सकाळी पाच वाजता क्लासला जाऊ लागली. मंदार खूप आळशी, त्यामुळे त्याला सकाळचा क्लास जॉईन कर म्हणणं, व्यर्थ होतं. क्लासवरून आल्यावर अदिती बाल्कनीतल्या कुंड्यांना पाणी घालून चहानाश्त्याची तयारी करायची. मंदार उठल्यावर आधी अदिती त्याच्याकडून सूर्यनमस्कार, भुजंगासन, कपालभाती असे पोटाचा घेर कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठीची काही महत्त्वाची योगासनं करून घ्यायची आणि मगच त्याला चहा नाश्ता द्यायची. तिच्या ह्या वागण्यामुळे मंदार तिला चिडवत म्हणाला, "इसका बदला मै जरूर लूंगा." आणि बदला घेण्यासाठी मंदारने जवळच्या जिममध्ये दोघांची अ‍ॅडमिशन घेतली. अदिती मंदारला 'घरचं जेवण आवडतंम्हणून रोज दुपारचा डब्बा घरूनच देऊ लागली. जेवणात घरच्या साजूक तुपाचा समावेश झाला, सलाडचा समावेश झाला नि संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये ऑफिसच्या समोसा-कचोरीऐवजी फळांचा समावेश झाला. संध्याकाळी दोघं मिळून जिमला जाऊ लागली. आणि रात्रीचं जेवण जरा पचायला हलकंच घेऊ लागली. 


आठवडाभराने, मंदारने बेडरूममधला टीव्ही आणि लॅपटॉपचं कनेक्शन काढून टाकलं. त्या टीव्हीची जागा एका बुक शेल्फने घेतली, त्यात अदितीला आवडतात त्या मराठी कादंबऱ्यांचा साठा आणि मंदारला आवडणाऱ्या शेरलॉक होम्सच्या गोष्टी - सगळं होतं. जेवणानंतर दोघं दररोज थोडा वेळ पुस्तकं वाचून प्रसन्न मनाने झोपायला जाऊ लागले. शनिवारचा दिवस म्हणजे भटकंतीचा. त्या दिवशी दोघं ट्रेकिंगला जाऊ लागले. डोंगरदऱ्या किल्ले - इतिहासात फिरून येऊ लागले. दोघंही स्वतःचे छंद जोपासू लागले. दिवस अगदी मस्त चालले होते. सगळा मित्र परिवार - नातेवाईक "आयुष्य जगावं तर ते अदिती-मंदारसारखं" असं म्हणू लागले. त्यातही कोणी जर अदितीला "कधी देणार गुडन्यूजअसं विचारलंच तर अदिती म्हणायची, "सध्या आयुष्य बिनधास्त जगत आहे, गुड न्युजसाठी अजून जरा वेळ आहे."
आता दोघंही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप stable झाले होते, खूप आनंदी आणि समाधानी होते. त्यांच्यासाठी एकमेकांचा आनंद-समाधान हे जास्त महत्त्वाचं होतं. 
एका शनिवारी दोघं नंदी हिल्सला  जाण्याच्या तयारीत होते, आणि अचानक अदितीला भोवळ आली. मंदार जवळच उभा होता म्हणून त्याने लगेच तिला आधार दिला. बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल करून दोघं डॉक्टरकडे गेले. जवळपास सहा महिन्यांनंतर आज दोघं डॉक्टरच्या केबिनमध्ये होते.सगळं सुरळीत चाललं असताना अदितीला काही मोठा आजार तर झाला नसेल नाअसा विचार मंदारच्या डोक्यात सुरू होता. डॉक्टरांनी अदितीला पाळीची तारीख विचारली, तेव्हा अदितीच्या लक्षात आलं की पाळी येऊन जवळपास दोन महिने झालेत. दररोजच्या भरगच्च रुटीनमुळे हे अदितीच्या लक्षातच आलं नव्हतं. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली तेव्हा पाच आठवड्यांचा गर्भ अदितीच्या पोटात होता. अचानक मिळालेल्या या सुखद धक्क्यामुळे अदिती-मंदारच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले.
त्या आनंदाश्रूंसोबत दोघांना एक गोष्ट उमगली, होणारं अपत्य हे त्या  दोघांच्या निस्सीम प्रेमाचं प्रतीक आहे. जोवर ते सामाजिक दडपणाखाली होते तोवर त्यांना हे सुख मिळालं नाही, पण जेव्हा ते एकमेकांच्या अतोनात प्रेमात पडले तेव्हा हे सुख देवाने अलगद त्यांच्या ओंजळीत टाकलं.




नात्यांचे रेशमी बंध: भाग १ 

https://mitramandal-katta.blogspot.com/p/natyanchereshamubandh.html



डॉ. स्वप्नाली धांदर



3 comments: