सदर: साडीबद्दल बरेच काही...

मागच्याच आठवड्याची गोष्ट आहे. नवरात्रीचा सण सुरू झाला आणि अचानक आज देवीला कोणत्या रंगाच्या साडीचा साज केला आहे ह्याची उत्सुकता मनात निर्माण झाली. ह्या उत्सुकतेसोबतच एक कुतूहल निर्माण झाले की साडी हा प्रकार अगदी बालपणापासून बघतोय, पण कुठून आली असेल साडी? कुणी केली असेल हिची निर्मितीखरंच, काय असेल हिचा इतिहास? या सगळ्या प्रश्नांनी मनात घर केले. या सगळ्यांचा परिपाक म्हणून असे ठरवले की आपणच या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा आणि जे थोडेसे ज्ञान मिळेल ते लेखावाटे इतरांपर्यंत पोहोचवावे.


साडी या शब्दाचा उगम संस्कृतमधील साती या शब्दापासून झाला आहे. साडीचा शोध कुणी, कधी आणि कसा लावला ह्याचे निश्चित उत्तर जरी ठाऊक नसले तरी ह्याचा उल्लेख ऋग्वेदात केलेला आढळतो. उत्खननात सापडलेल्या काही सिंध संस्कृतीकालीन मूर्त्यांना साडीप्रमाणे वस्त्रे नेसवलेली आढळलेली आहेत. सिंध संस्कृतीच्या काळापासून साडीचा उल्लेख आढळतो.

साडी हे भारतीय संस्कृतीचे आणि सभ्यतेचे एक प्रतीक असून भारतीय स्त्रीला लाभलेले एक वरदानच आहे, आणि आजही भारतीय स्त्रीने हा वारसा अतिशय प्रेमाने, अभिमानाने आणि आपुलकीने जपलेला आहे. 

साडी हे एकसलग वस्त्र असते. साडी हा असा पोशाख आहे ज्याला घालणाऱ्या स्त्रीच्या मापाची गरज भासत नाही.  साडी नेसताना स्त्रीची शरीरयष्टी विचारात घेण्याची गरज भासत नाही. साडी परिधान केल्याने कोणत्याही अंगाचे प्रदर्शन न होता स्त्रीचे सौन्दर्य अधिक खुलून येते. साडी हा भारतीय स्त्री आणि तिचे सौंदर्य यातील  एक अविभाज्य दुवा आहे.

मुस्लिम राजवटीपूर्वी भारतात शिवलेले कपडे अपवित्र मानले जात, मात्र, त्यानंतर सामाजिक विचारात परिवर्तन झाले व परकर आणि पोलके यांचा वापर प्रचलित झाला.
साडीच्या निर्मितीची एका आख्यायिका आहे. एखाद्या साडीच्या निर्मितीच्या आधी विणकर आपल्या मनात स्त्रीची एक आकृती तयार करतो आणि त्याप्रमाणे साडीचे विणकाम साकार करतो. प्रत्येक साडी ही विणकाराने साकारलेली एक कलाकृतीच असते आणि तिला आपली स्वतंत्र कथादेखील असते.

संपूर्ण भारतात साड्यांचे शंभरहून अधिक प्रकार उपलब्ध असून त्या नेसण्यातदेखील वैविध्य आढळते. भारताच्या भौगालिक विविधतेप्रमाणेच साड्यांमध्ये देखील विविधता बघायला मिळते. भारताच्या चार दिशांना साडीतील विविध प्रकार पाहायला मिळतात. 
उत्तर भारतात बनारसी, बांधणी, चिकणकोता हे काही प्रकार प्रसिद्ध आहेत.
पूर्वेला बालुचारी, कंठ तर पश्चिमेत बंधेज, पटोला, चांद असे काही प्रकार आहेत. 
दक्षिणेत कांचीपुरम, म्हैसूर हे मुख्य प्रकार आहेत. ह्या सर्व प्रकारांचे शंभरपेक्षा जास्त उपप्रकार आहेत. 
महाराष्ट्रात 'पैठणी' हा सर्वात प्रसिद्ध प्रकार आहे. पुढील लेखात आपण पैठणीबद्दल अधिक माहिती घेणार आहोत.

ह्या साड्यांच्या दुनियेत विणकरांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक साडी ही विणकाराने निर्माण केलेली कलाकृती असते. ही परंपरागत जपलेल्या कलाकौशल्याचे प्रतीक आहे. साडी हे कितीतरी लोकांचे रोजगाराचे साधन आहे. या एका घटकाने विणकारापासून ते तिला विकणारे व्यापारी ह्यांची एक शृंखलाच निर्माण केली आहे. साडी ही केवळ एक पोशाख नसून ते समाजातील लहान मोठ्या घटकांना जोडणारा एक दुवा आहे. भारतातील विणकरांची काही छायाचित्रे खालील प्रमाणे आहेत.





पूर्वीच्या स्त्रिया नऊवारी साडी नेसायच्या, मात्र आता सहावारी साडीचा वापर अधिक केला जातो. आजही भारतभर देवीला साडीचाच साज केला जातो. सणावारांना साडीचे महत्त्वदेखील कायम आहे. खाली काही साडी नेसलेल्या स्त्रियांची चित्रे दिली आहेत. या सगळ्या चित्रांवरून साडी या पोषाखाची परंपरा किती जुनी आहे याची कल्पना येते. 




















मैत्रिणींनो तुम्हालाही साडीच्या दुकानात गेल्यावर एकच प्रश्न पडत असेल की नेमका साडीच्या कुठल्या प्रकार घ्यावा. तो गोंधळ कमी करण्याचा माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी माझा एक प्रयत्न.
कट्ट्याच्या दर महिन्याच्या अंकात एका साडीच्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

1. पैठणी साडी :- महाराष्ट्रतील साड्यांची राणी म्हणजेच आपली सर्वात लाडकी 'पैठणी'. हिचे वैशिष्ट म्हणजे, सोन्याचे तारांनीं केलेले वीणकाम आणि मोराच्या नक्षीकाम. पैठण्या मुख्यतः पैठण पुणे, आणि येवला या शहरात तयार केल्या जातात. सविस्तार माहिती पुढच्या अंकात जरूर वाचुया.



2. बनारसी साडी :- ही साडी प्रसिद्ध आहे तिच्या रंगासाठी आणि टेक्सचर साठी. उत्तर भारतातील सर्वात प्रसिद्ध वधु पोशाख. भारतातील सर्वात प्रसिद्ध साड्यानंमध्ये या साडीचे स्थान सर्वात अव्वल आहे. ही साडी बनारस शहरात तयार केली जाते म्हणूनच या प्रकारचे नाव 'बनारसी साडी' पडले.



3. कांजीवरम साडी :- दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध साडी म्हणजेच कांजीवरम. कांजीवरम चे वैशिष्ट म्हणजे, साडीचे सुरेख रंग आणि अतिशय सुंदर टेम्पल बॉर्डर. तामिळनाडू मधील कांचीपुरम हे या साड्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.



4. संबलपुरी साडी :- ओरिसाच्या संबलपूर शहरात या साड्यांचे उत्पादन होते. या साड्या पूर्णपणे हातांनी विणलेल्या असतात. टस्सर सिल्क आणि कॉटन एकत्र करून बनवल्या जातात. ह्याच साड्यांना आपण इक्कत म्हणूनही  ओळखतो .
सौ. स्वाती ब्रह्मे 


No comments:

Post a Comment