पाऊस धो धो कोसळत होता...खिडकीला लागलेल्या जाळीला असलेल्या शंकरपाळीसारख्या
डिझाईनवरून थेंब गळत होते. एका मागोमाग एक उड्या मारत खाली येतांना त्या थेंबाचा
नाजूक सर ओवला जात होता. खिडकीच्या खाली येऊन तो सर क्षणात ओघळून जात होता. तो
थेंबांचा खेळ बघतांना भान हरपून गेलं.
अचानक जाणवलं, धो-धो पावसाचे दिवस तर मागे पडले... ज्येष्ठातले धुळीचे थर स्वच्छ करून येणाऱ्या
वर्षा ऋतूच्या स्वागतासाठी सृष्टी लखलखीत करणाऱ्या गर्जत येणाऱ्या पावसाचे दिवस
सरले.... आषाढात अवघ्या प्राणिमात्रांची तहान शामाविणारा पाऊस धो-धो कोसळून गेला....श्रावणातला स्वच्छ निळा
घन बरसून, आषाढात गढूळलेल्या पाण्यालाही शांत स्वच्छ करून गेला. आता भाद्रपद
आलाय...आणि मग कॅलेंडरवर नजर टाकलीच...भाद्रपद- अश्विनात वेध लागतात ते हस्ताचे.
हस्त नक्षत्राचं महत्व तर काळाच्या ओघात कधीच मागे पडलंय. शेतकऱ्यांना विचारलंत
तर ते लगेच सांगतील, ‘पडतील हस्त तर शेती होईल मस्त!’ पावसाळ्याचे चार महिने पाऊस
पडून गेल्याने स्वच्छ झालेल्या ढगातून बरसणारे हस्त नदी-ओढे-तलावातलं पाणीही शुद्ध
करतात असं म्हटलं जातं. हस्त नक्षत्रावर पडणाऱ्या पावसाचं पाणी औषधी समजलं जातं.
ते पाणी जर काचेच्या भांड्यात धरून काचेच्या बाटलीत साठवून ठेवलं तर त्याला वर्षभर
देखील काहीही होत नाही. ज्यांना उन्हाळा बाधतो त्यांनी उन्हाळ्यात सकाळी उठून दोन
चमचे ते पाणी प्यायलं तर उन्हाळाही बाधत नाही.
हा विचार मनात आला आणि मन कधी भूतकाळात गेलं ते कळलंच नाही..... आजी हस्तातलं
पाणी धरायला आमच्याकडे काचेची पसरट भांडी देत असे. कोणतंही पागोळी, झाडातून गळलेलं
पाणी त्यात पडलं नाही पाहिजे असा दंडकच असे. पावसाचं पाणी थेट भांड्यात पडायला
हवं. असं जेमतेम वाटी/दोन वाटी पाणी साठत असेल. बाकी सगळी आमची पावसात धमाल सुरु असे.
आमचं कौलारू घर होतं. पावसाळ्यात कौलावरून पागोळ्या गळत असत. पागोळ्यानं अंगण
उधडू नये म्हणून तिथे दगड घातले जात. पागोळ्यांचे थेंब दगडावर पडून कारंज्यासारखे
तुषार होऊन वर उडतांना सुंदर नक्षी तयार होत असे. त्या नक्षीचे आकार बघणं आणि ते
तुषार हातात पकडण्याचा प्रयत्न करणं हा आमचा आवडता खेळ.
मग पुढे जागे अभावी हस्ताचं पाणी धरणं मागे पडलं पण थेंबांचा खेळ बघण्याचं वेड
मात्र कायम राहिलं. गॅलरीत उभं राहिलं की समोरच्या विजेच्या तारेवरून एका मागे एक
धावणारे थेंब.......पानांवरून गळून मातीत विलीन होणारे थेंब......अळवावरचा अलगद
निसटून जाणारा थेंब.....हाताच्या बोटावर घेतला असता हिऱ्यासारखा चमचमणारा
थेंब......दिव्याच्या प्रकाशात लख्खकन चमकून जाणारा थेंब.....दगडांच्या कपारीतून
पडू का नको असा विचार करत घरंगळत जाणारा थेंब......पाखरांनी पंख झटकताच फडफडत
उडणारे थेंब.....कारंज्याचे थुईथई नाचणारे थेंब.....पानाच्या टोकावरून गर्रकन
भिरकी घेत टपकणारा थेंब.....प्रत्येक टपकणाऱ्या थेंबाचं रूप जरी तेच असलं तरी
त्याचं सौंदर्य वेगळालं....कुठे हिऱ्यासारखं लखलखतं तर कुठे मोत्यासारखं टप्पोर
पांढरशुभ्र कुठे चांदीच्या साखळीसारखं
चमचमतं तर कुठे ओघळणाऱ्या मोत्याच्या सरीसारखं टपटपीत......
पाण्यावर नाचणाऱ्या थेंबांचं सौंदर्य तर आणखीनच वेगळं असतं. समुद्राच्या
पाण्यात पडणारे थेंब त्या अजस्त्र पाण्यात कुठे गायब होतात ते कळत देखील नाही. पण
शांत, निवांत तळ्याचं किंवा खळाळत्या नदीचं पाणी जणू त्या थेंबांची प्रतीक्षा करत
असावीत...आणि ते थेंब पाण्यात पडताच पाण्यावर आनंद प्रेमाचे तरंग उठतात आणि त्या
थेंब बावऱ्या नक्षीनं पाणी आनंदाने नाचू लागतं.
मनिषा सोमण
No comments:
Post a Comment