जीवनस्पर्शी- शक्ति रुपेंण संस्थितां॥

 


अश्विन शुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्र सुरू झालं. "देवी भक्तांच्या घरी घट बसले. देवीसमोर नंदादीप उजळले. आता आयुध पूजा, सरस्वती पूजा होईल, नंतर विजयादशमीला मोठ्या आनंदाने सोन्याची देवाणघेवाण होईल. आधी नवरात्र साजरे करायचे म्हणजे शक्तीची उपासना करायची आणि मग विजय प्राप्त झाल्याचा आनंद विजयादशमीला साजरा करायचा किती उदात्त आणि उत्साहवर्धक परंपरा आहे आपली! या सणाच्या निमित्ताने सीमोल्लंघन करायचं.  

त्या करता काही घोड्यावर बसून गावाची वेस ओलांडायला नको तर आत्मपरीक्षण करून आपली प्रगती रोखणाऱ्या अवगुणांना ओलांडून पार जायचं हे सुद्धा सीमोल्लंघनच असतं. हे सीमोल्लंघन साधायचं असतं अखंड नंदादीपाच्या सात्विक प्रकाशात, शक्तीची म्हणजे देवीची उपासना करून.



आपल्या प्रत्येकाच्या जन्मामागे, जगण्यामागे एक शक्तिमान सूत्र कार्यरत आहे हे सहसा कोणी नाकारणार नाही. आपल्या शरीरात तर क्षणोक्षणी शक्तीचा प्रत्यय आपल्याला येत असतो आणि आपण सहजतेने त्याचा उल्लेख सुद्धा करत असतो. स्मरणशक्ती, पचनशक्ती, सहनशक्ती, रोगप्रतिकारशक्ती, चैतन्य शक्ती अशा अनेक रूपांनी ती आपल्या शरीरात अस्तित्वात असते. या विश्वरचनेत आपल्याकडून ती अनेक लहान मोठी कामे करून घेते.आणि आपल्याला तिच्या प्रचंड मोठ्या कार्यामधला एक सूक्ष्म भाग बनवते. निसर्गात सुद्धा प्रचंड शक्ती भरलेली आहे. पृथ्वीवरच्या विविधरूपी शक्तींना मानवी शक्तींची जोड मिळाली की आपण आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकतो याची अनेक उदाहरणे देता येतील. एकूण काय आपले अस्तित्व पूर्णपणे शक्तीवर आधारलेले आहे. आपल्यामधली चैतन्य शक्ती, प्राणशक्ती संपली की आपले या जगातले जगणे संपते.



ही शक्ती म्हणजेच हे चराचर निर्माण करणारी देवी. शक्ती हे तिचं प्रधानरुप आहे. तिला मूळमाया, आदिशक्ती, जगद्गजननी, विश्वमोहिनी, चण्डिका अशी अनेक नावे आहेत. तिची सहस्र नामावलीच सुप्रसिद्ध आहे. तिचे कार्य अनंत काळ चालते. तिची निर्माण शक्ती पदोपदी जाणवते. विश्वाच्या अणुरेणू मध्ये भरलेली विविधता बघून मानवी मन थक्क होते.आणि तिच्या सारखी निष्णात कलावंत तीच अशी ग्वाही, निसर्गाकडे बघून आपले मन देऊन टाकते. इतकी सामर्थ्यशाली असूनही ही दयास्वरूप देवी सर्व भुतांची मातृभावाने काळजी घेते. पृथ्वीवर जेव्हा असुर त्रास देऊ लागतात तेव्हा दुष्टांचे निर्दालन करण्याचे काम तीच करते. हे सर्व कार्य करताना ती परमात्म्याशी एकरूप झालेली असते. आपण शिव आणि शक्तीचा एकत्रित उल्लेख अनेक ठिकाणी वाचतो ऐकतो. कारण परमात्मा आणि शक्ती यांना वेगळे करता येत नाही. हे संपुर्ण विश्व परमात्म्याच्या संकल्पाने पण मूळ मायेच्या शक्तीने निर्माण झालेले आहे.

ऋग्वेदातल्या दहाव्या मंडलात ही आदिशक्ती स्वतः चे स्वरूप सांगताना म्हणते, "मीच इन्द्र, ब्रह्मा, अग्नी, वरुण, पृथ्वी, प्रजापती या सर्वांना धारण केलेले आहे. माझ्याच सामर्थ्याने आकाशाचे हे मंडल तयार झालेले आहे. माझ्याच आज्ञेने हे महासागर पसरलेले आहेत. माझ्याच आज्ञेनुसार अनंत ब्रह्मांड निर्माण होऊन ती पुन्हा माझ्यातच मिसळून जातात"

'वाक् अमृणी' या ऋग्वेदामधल्या प्रख्यात सुक्तात हे वर्णन आहे. उपनिषदांनी सुद्धा आदिमायेची थोरवी गायलेली आहे. भगवद्गीतेत हीचा उल्लेख माया आणि प्रकृती या नावाने अनेकदा आलेला आहे. शक्ती शिवाय मी शिव नसून शव आहे असे साक्षात शंकरांनी देखील म्हटले आहे असा या आदिशक्तीचा महिमा आहे. या विश्वाचे संचालन ती महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तीन रूपात करत असते.

देवी महालक्ष्मी परमेश्वरी शक्तीचे अपरिमित निर्माण ऐश्वर्य प्रकट करत असते.

देवी महासरस्वती त्या शक्तीचे विलक्षण ज्ञान आणि ऐश्वर्य प्रकाशात आणते.

देवी महाकाली त्याच शक्तीचे जबरदस्त विध्वंस घडवून आणण्याचे सामर्थ्य सहज दाखवून देते.

हे विश्व चालवताना आदि शक्तीची जी अनेक गुणवैशिष्ट्ये जाणवतात ती सगळी सुद्धा देवी स्वरूपाची म्हणजे स्त्री वाचक आहेत.

शक्ती, युक्ती, बुद्धी, निद्रा, क्षुधा, क्षमा, नियती, कांती, चेतना, लक्ष्मी, तृष्णा, वृत्ति, जाति, माता, स्मृती, दया, लज्जा, भ्रांती, छाया, तुष्टी, श्रद्धा, भक्ती, क्षांती अशा अनेक गुण विशेषांसह ती जगात कार्यरत असते.

अशा या शक्ती रूपिणी जगनमाऊलीचे कार्य आणि स्वरूप तिच्यापुढे फार लहान असणाऱ्या मानवाला केवळ अनाकलनीय आहे. पण ही जगन्माता पराकोटीची भक्तवत्सल आहे. म्हणून मानवी अवतारात आलेले भगवंत सुद्धा तिला शरण गेलेले आहेत. आपल्या संस्कृतीतले महान योगी, ऋषी,,मुनी,,संत, पंत, पंडित त्याचप्रमाणे राजे महाराजेही तिला शरण असल्याचे दाखले आपल्याकडे आहेत.

©सीमा ढाणके 

महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकडून जगदंबेची पूजा करून घेतलेली आहे. सीतेच्या वियोगाने दुःखी झालेल्या प्रभू रामचंद्रानी नवरात्रात सप्तशतीचे पाठ विधिवत केल्याचा उल्लेख रामायणात आढळतो. रामायण लिहिणाऱ्या महर्षी वाल्मीकींच्या जिव्हेवर ती प्रथम प्रकट झाली आणि मग रामायणाची रचना झाली. महाभारत रचणाऱ्या महर्षी व्यासांनीही पुष्कर तीर्थावर १०० वर्षे सरस्वतीची उपासना केली होती. महर्षी पतंजली यांनी सुद्धा सरस्वतीची उपासना केली होती. आपल्या संतांनी तिचे महात्म्य जाणलेले होतेच. कोणत्याही पवित्र ग्रंथाच्या प्रारंभी गणेशाबरोबरच शारदा देवीला वंदन केले जाते. ज्ञानेश्वर माऊलीं, एकनाथ, रामदासस्वामी यांच्या स्मरणात सदैव जगदंबेचा वास होता.

समर्थ रामदासांनी अनेक ठिकाणी मारुती स्थापन केले तशी देवीची मंदिरेही बांधली आहेत. समर्थानी त्यांची कुलदेवता असलेल्या तुळजाभवानीवर नऊ स्तोत्र आणि काही आरती वाङ्मय लिहिले आहे. राजा शिवछत्रपती हे सुद्धा तुळजाभवानीचे परम भक्त होते. साक्षात देवीच त्यांच्या साथीला तलवार रूपात भवानी नावाने राहिली होती. कसोटीच्या कोणत्याही प्रसंगात महाराज जगदंब जगदंब असे आदि शक्तीचेच स्मरण करत असत. महाकवी कालिदास देखील देवीचा निस्सीम भक्त होता. देवीच्या कृपेनेच त्याने अजरामर साहित्य निर्माण केले.

आदि शक्तीच्या कृपेशिवाय जगात काहीही साध्य होऊ शकत नाही आणि तिची कृपा झाली तर प्रतिभावंत संपूर्ण जगाला वंदनीय ठरतो. अतुलनीय यश ही जशी तिची कृपा असते तसे आपले अस्तित्व ही सुद्धा या महाशक्तीची कृपा असते. हा नवरात्राचा सण म्हणजे तिला अनन्य भावाने शरण जाऊन तिची मनोभावे प्रार्थना करण्याचा सण.

आपल्या देशात हा सण सर्वत्र साजरा केला जातो. अश्विन महिन्यात या दिवसांत केलेली देवीची उपासना विशेष प्रभावी असते. आपणही या नवरात्रीच्या निमित्ताने त्या सर्वमंगल करणाऱ्या देवीला, प्रकृतीला,शक्तीला शरण जाऊन तिचे माहात्म्य नवीन पिढ्यांपर्यंत पोचवूया!

 

शर्मिला पटवर्धन फाटक




No comments:

Post a Comment