कोपनहेगनला रहायला येऊन आता एक वर्ष झालं. मागच्या सप्टेंबरमध्ये इथे आले
तेव्हा हवेत गारव्याची चाहूल लागलेली होती. जवळपास रोज पाऊसही पडत होता. कधी हलका
शिडकावा, कधी जोरदार धारा, तर कधी प्रचंड, सुसाट वाऱ्यामुळे गोठवणारा पावसाचा मारा. जमीन अजून हिरवी दिसत होती. फुलांचे
थोडेफार ताटवे विखुरलेले होते. झाडांच्या पानांचा हिरवा रंग बदलायला सुरुवात झाली
होती. आणि त्यातच माझी इथे बस्तान बसवायची धडपड !!!
डोळ्यांदेखतच हळूहळू पाने गळून सगळे वृक्ष निष्पर्ण झाले. गवत सुकून गेले, तर फुले दिसेनाशी झाली. सगळं कसं ओकं बोकं दिसायला
लागलं. थंडीचा कडाकाही चांगलाच वाढायला लागला. दिवस अगदी छोटा आणि रात्र मोठी
झाली. रात्रीचा अंधारही अगदी काळाकुट्ट. अजून कुठे शहराशी फारशी ओळख देखील झाली
नव्हती. आजूबाजूच्या वातावरणावर निराशाजनक ढग पसरायला लागलेत असं वाटायला लागलं.
कसं काय निभावणार इथे, अशी चिंता वाटायला लागली होती.
आणि काय गंमत, नाताळच्या दिव्यांनी सगळं शहर नटून निघालं. ठिकठिकाणी सुंदर रोषणाई आणि
ख्रिसमस मार्केट लागले. लोकांची गर्दी आणि उत्साह बघून माझ्या मनाची मरगळ पार
कुठल्या कुठे पळून गेली. "सेंट लुचीया डे" च्या रात्री रंगीबेरंगी
दिव्यांनी सजवलेल्या ५०० हून अधिक बोटींच्या ताफ्याची परेड घरासमोरच्या कॅनॅालमधून
जाताना बघणं हा एक नेत्रदीपक अनुभव होता. नवीन वर्षाची सुरुवात करताना फटाक्यांची
आतिषबाजी करण्यात डॅनिश लोकांचा हात कोणी धरू शकणार नाही. टाऊन हॉल समोरच्या भल्या
मोठ्या पटांगणात फटाके उडवायची जणू काही स्पर्धाच लागली होती. कित्येक तास सतत
फटाके उडत होते.
या रात्री फटाके फोडून इतका धूर करतात की त्यामुळे खराब झालेले पर्यावरण
वाचविण्यासाठीच वर्षभर सायकल चालवून या चुकीचे परिमार्जन डॅनिश लोक बहुतेक करत
असावे. काही महत्त्वाच्या रस्त्यांवरून तर दिवसाला रोज किती सायकली जातात हे
मोजण्याचे डिस्प्ले पण लावलेले आहेत.
आता अधून मधून बर्फ पडायला ही सुरुवात झाली होती. कधी छोटे तर कधी मोठे स्नो
फ्लेक्स, कधी पाऊस आणि बर्फ यांचा एकत्र वर्षाव. साधारण ५° ते -३° पर्यंत तापमान जायला लागलं आणि अंगावर कपड्यांचे थर चढवता चढवता नाकी नऊ यायला
लागले. अगदी कुठेही बाहेर जाऊ नये असं वाटायचं. बर्फाळलेल्या कालव्याच्या पाण्यात winter bathing करणाऱ्या लोकांना मनातल्या मनात
मी दंडवतच घालत असे.
एप्रिल पासून परत वातावरणातला बदल जाणवायला लागला. दिवस मोठा व्हायला लागला.
हवेतला उबदारपणा वाढला. सूर्याचे दर्शनही जास्त वेळ होऊ लागलं. झाडांना कोवळी
पालवी फुटायला लागली. चेरी ब्लॉसम आणि इतरही रंगीबेरंगी फुलांनी निसर्ग शहरात रंग
भरू लागला. आणि आता कुठे कोपनहेगन मधल्या विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यायला
माझा पाय घराबाहेर काढायची हिम्मत झाली. इथली अनेक प्रसिद्ध स्थळे बघत असताना
कोणीतरी मला विचारलं, "कोपनहिल ला भेट दिलीत का?"
हे ऐकून मी तर अगदी चक्रावूनच गेले. कारण हे शहर इतकं सपाट आहे की नावाला
सुद्धा साधा road hump इथे नाही. माहिती काढल्यावर कळलं की 'कोपनहिल' ही मानवनिर्मित टेकडी आहे. शहरातला सगळा कचरा जिथे रिसायकल केला जातो अशी ही
एक उंच इमारत आहे. या इमारतीचा दर्शनी भाग स्टीलचा बनलेला आहे. तर मागचा भाग ही एक
मानवनिर्मित टेकडी आहे, ज्यावर तुम्ही चढून जाऊ शकता. टेकडीवरून शहराचे आणि समुद्राचे विहंगम दृश्य
दिसते. टेकडीच्या गवतावरून स्केटिंग करत खाली येण्याचीही सोय आहे.
पुढच्या महिन्यांमध्ये सूर्याचे दर्शन तर भरपूर वेळ व्हायला लागले. कॅनॅालमधून
असंख्य बोटी फिरू लागल्या. उन्हाचा आस्वाद घ्यायला हार्बर बीच तुडुंब भरू लागले.
पर्यटकही खूप वाढले. आम्हीही कोपनहेगन शहर सोडून डेन्मार्क मधल्या काही बाकीच्या स्थळांना
भेटी देण्यासाठी निघालो.
त्यातच १ जुलैला "Tour de France
" या जगप्रसिद्ध सायकल शर्यतीची
यावर्षीची सुरुवात कोपनहेगन पासून होणार असे फलक साऱ्या शहरात झळकले. सगळं शहर तर्हेतर्हेच्या
पिवळ्या फुलांनी सुशोभित केलं गेलं. शर्यतीचे रस्ते आखले गेले. मोठे मोठे टीव्ही
स्क्रीन सर्वत्र लागले. शर्यतीच्या दिवशी सकाळपासून खूप गर्दी उसळली होती. एकंदर ८
टीमचे मिळून १७६ सायकल स्वारांचा यात समावेश होता. धावण्याच्या शर्यतीत जसे सगळे
एकदम धावायला सुरुवात करतात तसेच सायकल शर्यतीत करत असावे असा माझा समज होता. पण
इथे तरी तसं नव्हतं. दर २ मिनिटांच्या अंतराने एक एक सायकल स्वार निघत होता. आधी
एक मोटर सायकल, त्यामागे सायकल स्वार, नंतर अनेक स्पेअर सायकली ठेवलेली कार आणि त्यानंतर शेवटी पोलीस कार असा ताफाच
जात होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमलेले सर्व लोक खूप जल्लोष करत होते. ओरडून, ओरडून सर्व प्रतिस्पर्धींना उत्साहीत करत होते.
अनायसे जमून आलेल्या या संधीची पुरेपूर मजा घेतली मी.
इथल्या चारही ऋतूंचा वेगवेगळा आनंद घेत वर्ष कसं संपत आलं ते कळलं सुद्धा
नाही. आत्तापर्यंतच्या माझ्या इथला वास्तव्याचा अनुभव, त्यातल्या अडीअडचणी, चांगल्या वाईट गोष्टी, शहराची, लोकांची वैशिष्ट्यं, इथली सुंदर प्रेक्षणीय स्थळ याबद्दल मी जसं जमेल तसं लिहिण्याचा प्रयत्न केला
आहे. सर्व वाचकांना यातून आनंद मिळाला असेल अशी अपेक्षा करते आणि निरोप घेते.
यावर्षीच्या जागतिक राहणीमानता निर्देशांकात दुसरा क्रमांक मिळालेल्या
कोपनहेगनला जरूर भेट द्या आणि आलात तर मला नक्की भेटायला या!!
नीना वैशंपायन
छान लिहिलय नीना सगळं वर्णन . नक्की भेट द्यायला पाहिजे कोपेनहेगेनला
ReplyDeleteनेहा कुलकर्णी
ReplyDelete