महायोगी श्री अरविंद
(भाग २)
सशस्त्र क्रांती घडावी, असे त्यांना मनोमन वाटे.
त्या वेळी अरविंदांच्या भावाने बारिंद्रने एक संस्था स्थापन केली.
कामाच्या व्यापामुळे ते आजारी पडले. नाना तऱ्हेचे वैद्य, डॉक्टर झाले; पण, कोणाचादेखील उपयोग झाला नाही. त्या वेळी एक नागा बैरागी
आला व त्याने भावाला मंत्राने बरे केले. त्या वेळी अरविदांना
आश्चर्य वाटले. जे काही आहे ते परमेश्वराचेच आहे, अशी त्यांची भावना होऊ लागली.
माणूस संसारात कसा पडतो, हे संसारात पडेपर्यंत समजत
नाही. अरविंदाचे लग्न झाले. पण,
संसारातील अरविंदांच्या वागणुकीमुळे पत्नी निराश होत असे. आपल्या मन:स्थितीचे वर्णन ते १९०५ मध्ये पत्राद्वारे पत्नीला करतात. त्यात
ते म्हणतात, ‘सध्या माझे मन तीन प्रकारच्या वेडांनी ग्रासले आहे.
मी जे जतन केले आहे, ते सर्व परमेश्वराचेच आहे.
ही भाविकाची भूमिका मी घेतली आहे. माझे जीवनसुद्धा
मी वाटून टाकणार आहे. हे माझे पहिले वेड आहे. दुसरे वेड असे की, परमेश्वराचे अस्तित्व बहुतेक जण मानतात.
रामकृष्ण ह्यांच्यासारखा संन्याशी कलकत्त्याच्या पदवीधराला माहिती करून
देऊ शकतो ह्याचे रहस्य काय आहे, ते मी पाहणार आहे. परमेश्वरप्राप्तीसाठी मी प्रयत्न करणार आहे. तिसरे वेड
म्हणजे, भारतभूमी माझी पूजनीय वंदनीय देवता आहे. हिच्यासाठी सारे जीवन मी वेचणार आहे. निर्वाहापुरते ठेवून
बाकी सर्व गोष्टीचा त्याग करणार आहे. तेव्हा ह्या वेड्याची वेडी
म्हणून तू माझ्याबरोबर येणार, की वेडा म्हणून अंतरावरच राहणार?’ पत्नी म्हणाली, “मला हा भार सहन होणार नाही.” त्यावर
अरविंद म्हणतात, “सर्व भार परमेश्वरावर टाक. आपणास स्वाभिमानी जीवन जगता आले पाहिजे.”
सुरत येथे १९०७ मध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. जहाल व मवाळ गटात वाद सुरू झाला. विशेष
म्हणजे, अरविंद आणि लोकमान्य टिळक ह्यांची मिरवणूक निघाली.
अरविंद देशभक्त ह्या नात्याने व्याख्याने देऊ लागले, राजकारणाबरोबर योगसाधना करता येईल काय?, ह्या प्रश्नाची
उत्तरे शोधू लागले. त्यांना ह्याचा प्रत्यय येऊ लागला.
मायभूमीची सेवा ही खरी योगसाधना होय. ह्या वेळी
ग्वाल्हेरचे श्री. लेले ह्यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले.
ब्रह्मानंदस्वामींची गाठ घेतली. त्यांनी अरविंदांना
आशीर्वाद दिला. त्यांच्या राजकारणाला विलक्षण गती मिळाली.
एकदा भगिनी निवेदितासुद्धा अरविंदाना भेटण्यास आल्या. स्वामी विवेकानंदाच्या मृत्यूनंतर त्यासुद्धा राजकारणात ओढल्या गेल्या.
कोणतीही क्रांती सौम्य नसते. बंगालमध्ये
हलकल्लोळ माजला. प्रसंग स्वाभिमानाला धक्का देणारा होता व चीड
आणणारा होता. एका लहान मुलाने चौकात ‘वंदे
मातरम्’ म्हटले म्हणून पोलिसांनी त्याला चाबकाने फटके लगावले,
म्हणून बंगाली जनता खवळली. जनतेस प्रक्षुब्ध करण्यामागे
अरविंदांचा हात असावा, असा सरकारला संशय आला. माणिकतोला बॉम्ब खटल्यात त्यांना आरोपी म्हणून अलिपूरच्या तुरुंगात ठेवण्यात
आले. त्यांच्या खोलीची झडती घेण्यात आली. त्या झडतीत पुडी सापडली. चौकशीअंती अरविंद म्हणाले,
“दक्षिणेश्वरीला कालिमातेच्या दर्शनास गेलेल्या एका भाविकाने मला आणून
दिलेली ही अंगाऱ्याची पुडी आहे.” त्या वेळी आपले सगळे प्रयत्न
मातीत गेल्याचे चौकशी अधिकाऱ्यांना वाटू लागले. अरविंदाना हद्दपार केले पाहिजे, असे ब्रिटिशांना
वाटू लागले. म्हणून खोटा आरोप ठेवून त्यांना अटक केली.
त्यांच्या सुटकेसाठी पैसे नव्हते. त्या वेळी भगिनी
सरोजनीने पत्रक काढून आर्थिक साहाय्याची याचना करताच अनेकांनी
मदत केली. विशेष म्हणजे, एका भिकाऱ्याने आपल्याला मिळालेला
एक रुपया मदत म्हणून दिला.
अलिपूरच्या तुरुंगात असताना एकलव्याच्या एकाग्रतेने अरविंद अभ्यास करत होते. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना दर्शन दिले. तुझा परमार्थाचा आविष्कार पाहून मी येथे आलो आहे. सलग
तीन महिने वासुदेवाने त्यांना दर्शन दिले. हे स्वत: अरविंदांनीच लिहून ठेवले आहे. भगवान श्रीकृष्णाला अरविंद
पूर्णपणे शरण गेले.
क्रांतिकारकांसाठी वकिली करणार कोण? पण,
त्या वेळी देशबंधू चितरंजनदास ह्यांनी वकिली करण्याचे मान्य केले.
खटल्यापूर्वी एक-दोन दिवस अगोदर भगवान श्रीकृष्ण
अरविंदाच्या स्वप्नात आले होते, असे म्हणतात. चितरंजनदास यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्यासाठी आला,
असे त्यांना वाटू लागले. मी तुझ्या मागे आहे.
भक्तासाठी मी माझ्या आज्ञा सोडल्या आहेत - असा त्यांना अज्ञातपणे आवाज
ऐकू आला. न्यायाधीश लिज क्राफ्ट् होते. त्यांना अरविंद आरोपी असल्याचे कळताच आश्चर्य वाटले. कारण, आय.सी.एस. ला दोघे वर्गमित्र होते. नॉर्टन
हे सरकारी वकील म्हणून काम पाहणार होते. जिकडे नॉर्टन,
तिकडे विजय, असा त्यांचा दबदबा होता. ते म्हणाले, “संशयित वस्तू कोठे सापडली हे माहिती नाही.
पण, सापडली म्हणून त्यांची आहे. म्हणून त्यांना हद्दपार केले पाहिजे.” ह्यानंतर आरोपीचे
वकील चितरंजनबाबू म्हणाले, “महाराज, ज्यांना
तुम्ही आरोपी म्हणता आहात, ते आरोपी नाहीत. मायभूमीबद्दल अभिमान बाळगणाऱ्यांना आरोपी म्हणता येत नाही.” ह्यानंतर न्यायाधीश म्हणाले, “मला ह्यावरून
असे वाटते की, अरविंद हे पूर्णपणे निर्दोष आहेत.” हा निकाल ऐकताच सरकारी वकील नॉर्टन अक्षरश: बेशुद्धच
पडले. अरविंदांना एकसारखा अज्ञातपणे आवाज ऐकू येत होता.
तो स्वामी विवेकानंदाचा आहे, अशी अरविंदांची खात्री
होती.
अरविंदांचे जीवनदर्शन दिव्य, व्यापक,
अनेकांनी अभ्यासावे असे तेजस्वी आहे. मुलाने आय.
सी. एस. म्हणून भारतात यावे,
अशी वडिलांची इच्छा होती. पण, एक देशभक्त म्हणून त्यांनी भरतखंडावर पाय ठेवला. लहानपणी
त्यांना अनेक अनुभव येत असत. कधी कधी त्याच्या मनात प्रसन्नतेची
वलये उमटत असत. मोठेपणी त्यांची विचारशक्ती वाढली. एकदा बडोद्याला असताना फिरावयास गेले. त्या वेळी त्यांच्या
गाडीवर ट्रक आदळून अपघात झाला. त्या वेळीच अरविंद मृत्युमुखी
पडले असते. पण, एका अज्ञात शक्तीने त्यांना
दूर फेकले. ह्यात परमेश्वराचे अंग आहे, अशी त्यांची खात्री पटली. वेदांत व उपनिषदे ह्यात उल्लेख
आहे, असे त्यांना समजताच त्यांनी त्या विषयाचा अभ्यास सुरू केला.
प्रयोगादाखल त्यांनी तीन महिने आध्यात्मिक अभ्यास केला व त्यांना पारमार्थिक
अनुभव येऊ लागला. तसे ते म्हणू लागले की, ग्रंथात लिहिलेल्या प्रत्येक अक्षराचा अनुभव येऊ लागला. ज्याला अनुभव येऊ शकतो, तो त्या मार्गाचा वारकरी होऊन
जातो.
सन १९०४ मध्ये मार्गदर्शनानुसार प्राणायामाचा अभ्यास
त्यांनी सुरू केला. समाधीच्या दिशेने जायचे असेल
तर, प्राणायामाच्या प्रक्रियेचा अभ्यास सुरू केला पाहिजे.
त्यापासून जे काही फायदे झाले, ते त्यांनी वैज्ञानिकांच्या
बुद्धीने सांगितले. त्यामुळे त्यांना केवळ वीस-वीस तास ध्यान करावे असे वाटू लागले, नव्हे तर त्यांनी
ते केले. हे उद्गार कोणा अंधश्रद्धाळू माणसाचे नाहीत.
जेव्हा अरविंदांची ब्रह्मानंदस्वामीशी नर्मदा तीरी भेट झाली.
त्या वेळी कालीमातेने त्यांना दर्शन दिले. किती
रूपाने परमेश्वराने भक्ताला चकित करावे? असे त्यांना वाटू लागले.
तुरुंगात असताना एकदा ते ध्यानस्थ झाले व योगसामर्थ्यावर ते अधांतरी योग साधना
करू लागले. तरंगणारा कैदी पाहून जेलरसाहेबाची बोबडी
वळली व म्हणाला, “इथले कैदी तरंगू लागले आहेत. अशा तरंगणाऱ्या कैद्याच्या संरक्षणास
मला ठेवू नका.” त्याच कारावासात परमेश्वराने त्यांना
अनेकदा अनेक रूपाने दर्शन दिले. त्यांना प्रत्येक अणुरेणूत भगवान
दिसू लागला. त्यांना आश्चर्य वाटू लागले. एकदा म्हणाले, “इतक्या असंख्य परमेश्वराचा अर्थ काय?”
अमरावती येथे गेले असता त्यांना विचारण्यात आले. “तुम्हाला भगवान दिसले आहेत काय?” त्यावर अरविंद म्हणाले,
“होय, मला भगवान श्रीकृष्णांनी दर्शन दिले आहे.”
अशा अवस्थेत विवेकानंद त्यांच्या सहवासात असतात. अरविंद नेहमी म्हणत असत, हा अज्ञात आवाज स्वामी विवेकानंदाचाच
आहे.
उत्तरपाडा येथील सनातन धर्म परिषदेत त्यांनी प्रथमच तुरुंगात
आलेल्या अनुभवांची जाहीर वाच्यता केली. आपल्या
भाषणात ते म्हणाले, “आज माझी भूमिका बदलली आहे. परमेश्वराने सांगितलेले कार्य मला केलेच पाहिजे. ह्या
देशाचे तारण व्हावे असे जर आपणास वाटत असेल, तर प्रथम आपण भारतीय
झाले पाहिजे. सनातन धर्माचा अभ्यास केला पाहिजे. आज आपणास असे वाटते की, धर्म शब्द न उच्चारणे
म्हणजे पुरोगामी होय. पण पुन्हा एकदा धर्मास शरण जा, त्याला डोळसपणे पाहा; म्हणजे तुम्ही आज आहात त्याहीपेक्षा
अधिक पुरोगामी व्हाल.”
अरविंदांच्या या जाहीर भूमिकेचे देशभर तीव्र पडसाद उमटले. त्यांचे मित्र अरविंदांचा निषेध करू लागले. त्यांना अरविंदांचा मार्ग पसंत नव्हता. कुठलाही
उदात्त विचार सामान्य माणसाला पेलत नाही, ह्यातच त्याचे सामान्यत्व दिसून येते. लोक अरविंदांचा निषेध करू लागले. इतकेच
नव्हे तर, त्यांना हद्दपार करण्यासाठी उत्सुक झाले. पण ‘तू येथून जावे’ असा अज्ञात
आवाज मिळाल्याने चंदननगर येथे दीड महिना राहून ते अखेर पाँडिचेरीला गेले. लोक म्हणाले, “हा आपणास भिऊन गेला.” पण, हा सामर्थ्यसंपन्न माणूस भिणे अशक्यच आहे.
देशभक्त अरविंद पाँडिचेरीस येणार, हे समजताच तेथील
लोकांनी त्यांचे स्वागत केले. शंकर चेट्टी ह्यांच्या घरी ते राहू
लागले. लोकांनासुद्धा एक प्रकारचा आगळा उत्साह वाटत असे.
एके दिवशी त्यांच्याजवळ चार पैसेही नव्हते. तरीही त्यांच्या कार्यक्रमात काहीही बदल घडू शकला नाही.
ते नेहमी म्हणत, माझे चरित्र कोणीही लिहिण्याचा
प्रयत्न करू नये. माझे चरित्र लिहिणे फार अवघड आहे. पुढे पुढे ते ध्यानधारणेचा अभ्यास करू लागले. अरविंद
शास्त्रज्ञांच्या भूमिकेतून सर्व गोष्टी करत असत. प्रत्येक अनुभवाचे
पृथक्करण करत असत. प्रत्येक अनुभव बुद्धीच्या निकषावर तावून-सुलाखून, निरखून मगच तो स्वीकारत. कोणतीही गोष्ट अंधपणाने स्वीकारणे त्यांना मान्य नसे.
मदर रिचर्ड ह्यांनी सांगितले, झाडात
रस असून त्याचे अभिसरण होते व त्यांनी ते सिद्ध करून दाखविले. त्यांनासुद्धा भगवंतानी भाग्यवंत केले होते. त्या गुरूच्या
शोधात पाँडिचेरीस आल्या होत्या. तेथे येण्यापूर्वी त्यांना साक्षात्कार
झाला होता. त्यांनी अरविंदांचे गुरुत्व स्वीकारण्यापूर्वी त्यांना
प्रश्न विचारले व नंतर त्यांचे गुरुत्व स्वत: स्वखुशीने
घेतले. अंतर्मुख होण्याची शक्ती फक्त माणसालाच आहे. इतर प्राणी पराङ्मुख होऊ शकतात. पण, त्याना अंतर्मुख होता येणार नाही. परमेश्वराचा आवाज येतो
व मार्ग स्पष्ट होतो.
१९१४ मध्ये त्यांना सांगण्यात आले - आपण एवढे बुद्धिमान; पण त्याचा इतरांना
उपयोग व्हावा असे वाटत असल्यास, आपण एखादे वर्तमानपत्र काढून
आपले विचार जनतेसमोर मांडावेत. त्यांनी ‘आर्य’ मासिक सुरू केले. योगाच्या
मार्गाने जाताना त्यांना अनेक प्रकारच्या अनुभूती येऊ लागल्या. परंतु, योगसाधना व तपश्चर्या ह्याच्या बळावर अरविंद ह्यांनी
मानवजातीचे उन्नयन व्हावे, सर्वांची उंची वाढली पाहिजे
ही अपेक्षा केली. त्यासाठी योगाचे प्रयोजनसुद्धा
त्यांनी केले.
मानवाचे मानसिक उन्नयन घडावे, असे त्यांना
वाटू लागले. हा विचार तसा गंभीर आहे. परंतु,
ह्या मानवजातीचे उन्नयन घडविण्यापूर्वी त्यांनी विचार केला की,
ही मानवजात प्रथम निर्माण कशी झाली? माणसाची ही
सर्व ज्ञानेंद्रिये कवटीतच का? त्याचे स्नेहसंमेलन येथेच का?
नंतर, त्यांची विचारशक्ती विवेक करू लागली आणि
विवेकातून त्याच्या प्रश्नांचा विकास होऊ लागला. पूर्वी अमिबापासून जलचर, सरपटणारे प्राणी व सरपटण्याच्या समांतर क्रियेने सर्व ज्ञानेंद्रिये
कवटीत आली, हा डार्विनचा सिद्धांतसुद्धा योगिराज अरविंदांना मान्य
नव्हता. जगात बदल घडत आहे; पण कसा होतो,
ते मात्र समजू शकत नाही हेच त्या घटनेचे वैशिष्ट्य आहे.
त्यापुढे होऊन अरविंद म्हणाले की, मागे
जा, भूतकाळाचे सिंहावलोकन करा, ही ब्रह्म
आणि माया आहे. की, एका सच्चिदानंदाची उत्क्रांती
आहे. त्यापूर्वी ते ब्रह्म आणि माया ह्याचा विचार करू लागले.
जग ही माया आहे, तो ब्रह्म चराचराला व्यापून उरला
आहे. ते ब्रह्म निद्रिस्त आहे, जे मुळात
नाही ते शून्यातूनसुद्धा निर्माण होऊ शकणार नाही. त्याचे आविष्कार
कसे झाले ह्याचा विचार करू लागले. ब्रह्माला शब्दात पकडता येत
नाही. नंतर कालांतराने ब्रह्माने स्वत:ला
मर्यादा घालून घेतली. संकोचाची प्रक्रिया सुरू झाली. जन्माआधी अंधार व मृत्यूनंतर अंधार अशा दोन अव्यक्तांमध्ये मानव हा व्यक्तरूपाने
जीवन जगत आहे. व्यक्तीच्या ठायी असणारी ज्योत त्यास ‘individual aspect of reality’ असे ते म्हणतात. आकाश हे अणुमय आहे.
त्यातूनच ह्या सृष्टीची निर्मिती सुरू झाली. सृष्टी
निर्मितीचे आविष्कार असे- ह्युमन माइन्ड, सुपर माइन्ड, ओव्हर माइन्ड आणि अखेर जडत्व होय.
जे जडत्व आहे ते ब्रह्म आहे. त्याचे टोक हे विशिष्ट
स्थान आहे. ते अविनाशी आहे. पतितेची प्रक्रिया
घडू लागली. जडाच्या ठायीसुद्धा सच्चिदानंदाचा आविष्कार आहे.
डोंगरसुद्धा सजीव होऊ शकतात, असा उल्लेख जैन धर्मीयांच्या
ग्रंथात आहे. लाईफसुद्धा जडत्वातून निर्माण होते. जडत्वातून एकेक जीवश्रेणी उत्पन्न होऊ लागली होती, हे
तत्त्व. अशा असंख्य जीवश्रेण्या आहेत. योग
साधनेच्या बळावर अरविंद कोणत्याही जीवश्रेणीत जाऊ शकत होते व सर्व जीवश्रेणीत मानवश्रेणी
ही सर्वश्रेष्ठ आहे. मानवी मनाचे सामर्थ्य मर्यादित आहे.
वस्तुत: तुमच्या-माझ्यात
असणारा परमात्मा एक आहे. माणूस मरतो कारण तो मर्त्य आहे.
त्याला आपल्या क्षणभंगूर जीवनात दु:खे भोगावी लागतात.
तसे पाहिल्यास सुखाचे व दु:खाचे पारडे समानच असते.
पण, दु:खाप्रमाणे सुखाचे
चटके बसत नाहीत, म्हणून सुख जाणवत नाही. तरीसुद्धा आपण आपल्या मनाची उन्नती केली तर, दु:खे दूर अंतरावर राहतील. मनाच्या वरची पायरी म्हणजे सुपर
माइन्ड व त्याची उन्नती म्हणजे ओव्हर माइन्ड. ही अवस्था योगी
अरविंदांनी गृहीत धरली. हेच उत्क्रांतीचे वैशिष्ट्य आहे.
जेव्हा लाईफ निर्माण झाले त्या वेळी माइन्ड त्याच्या बरोबर येऊ लागले.
ह्या प्रक्रियेला ‘हायटिंग ऑफ कॉन्सशन्स’
असे म्हणतात. आजचा नर हा कालचा वानर होता,
तर तो उद्याचा महामानव आहे. हा उत्क्रांतीतील सर्वांत
कळस होय. प्रत्येक मानव हा महापुरुष आहे. अरविंद म्हणतात, “तुम्ही जरी केले नाही तरी ते घडणार
आहे. पण ते लवकर घडावे अशी माझी इच्छा आहे, त्यासाठी मनाची कवाडे उघडली पाहिजेत. मनाच्या विषयावर
दंड थोपटून त्यावर विजय मिळविला पाहिजे. शरणागती हवी,
पण अंधश्रद्धेचा भाग त्यात नको. मनाची दारे सताड
उघडी ठेवून शरण जाणे आवश्यक आहे. नंतर आमचे वर जाणे हे असेंड
होय, तर परमेश्वराचे आपल्या स्थानापासून खाली येणे ह्याला डिसेन्ड
असे म्हणतात. ज्या ठिकाणी दोघांची गाठ पडेल, त्या वेळी मात्र मानवास महामानव म्हणणे यथार्थ होईल. त्याच वेळी खऱ्या अर्थाने जीवन दिव्य होईल. त्यासाठी माइन्ड आवश्यक आहे. पण तेच अपुरे
आहे. प्रथम सुपर माइन्ड होणे जरूर आहे. पण ते घडेल का?”
त्यांना १९२६ मध्ये ओव्हर माइन्डचा अनुभव आला. त्यामुळे त्यांच्या मनाला समाधान होत आहे असे ते म्हणत.
कायापालट झाला, असे वाटू लागले. मी अंतरावरच राहून सुपर माइन्डचा अभ्यास करणार आहे असे अरविंद बोलू लागले.
हा मार्ग आपण न स्वीकारता देशासाठी काही तरी कार्य करावे, असे लोक म्हणू लागले. आज आपणासारख्या आय.सी.एस. पदवीधराची भारताला गरज आहे,
असे म्हणू लागले. इतकेच नव्हे तर लोकमान्य टिळक,
वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी ह्यांनीसुद्धा विनंती
केली. ह्यातून रवींद्रनाथ टागोरसुद्धा सुटले नाहीत. आपल्या ध्येयापासून न ढळता ते म्हणाले, “मानवजातीच्या
उन्नयनतेचा अभ्यास मी करणार आहे, त्याशिवाय मी मुळीच येऊ शकणार
नाही. जेव्हा दिव्य सामर्थ्य येईल तेव्हा येथील शक्ती
बदलून जातील. हा बदल घडणारच आहे. ते घडणे आवश्यक आहे.”
१५ ऑगस्ट १८७२ ही त्यांची जन्मतारीख आहे. ते नेहमी म्हणत,
“माझ्या जीवनात १५ ऑगस्टला फार महत्त्व आहे. विशेष म्हणजे त्याच तारखेला भारत स्वतंत्र झाला. आज जरी भारताचे तुकडे झाले असले तरी पुढे अखंड भारत होणार आहे. कारण, भूगोलाने बांधलेला व इतिहासाने सांधलेला हा भारत
अखंड राहणार, ह्यात शंका नाही.”
अरविंदांच्या पश्चात मदर रिचर्ड म्हणजे, माताजींनी
वेदाचा मार्ग स्वीकारला. अखेर ५ डिसेंबर १९५० रोजी अरविंदांनी महासमाधी घेतली. अनेक डॉक्टर आले, पण उपयोग झाला नाही.
माताजींना शोक आवरला नाही. पण, त्यांची खात्री होती, ही महासमाधी आहे. पार्थिवाचे दहन करण्यास त्यांनी नकार दिला. चार-पाच दिवस झाले, देह अद्याप टवटवीत होता. डॉक्टर म्हणाले, “व्यापार संपला आहे. ही महासमाधी नसून शुद्ध महानिर्वाण आहे. आपण पार्थिवाचे
दहन करावे.” त्यावर माताजी म्हणाल्या, “जोपर्यंत त्यांच्या भोवती ती तेजस्वी निळी वलये आहेत तोपर्यंत मी मुळीच दहन
करू देणार नाही.” डॉक्टर म्हणाले, “कुठे
आहे ते वलय? अन् तेजस्वी असूनही मला का दिसत नाहीत?” त्यावर माताजी म्हणाल्या, “आपणाला पण दिसतील,
पण....” असे म्हणून माताजींनी डॉक्टरांच्या मस्तकावर
हात ठेवला आणि आश्चर्य असे की, त्या डॉक्टरांना ती तेजस्वी निळी
वलये दिसू लागली. ते पाहून एफआरसीएस झालेले ङॉक्टर नतमस्तक होऊन
म्हणाले,“आजपर्यंत शास्त्रात मला अनेक गोष्टी अनुभवाला आल्या,
पण माझ्या आयुष्यात अशा प्रकारचा अनुभव मिळाला नाही, तो मी प्रत्यक्ष पाहिला. मी ह्या ठिकाणी एवढेच सांगू
इच्छितो की, महायोगी श्री अरविंद ह्यांच्याच शास्त्राचे अनुकरण
सर्व जगाने करावे.”
श्रीराम ढवळीकर
No comments:
Post a Comment