संक्रांतीला गजानन महाराजांच्या देवळात जायचं ठरवलं. लेक, सून दोघी जणी सणाची तयारी करायला घरात होत्या, तेव्हा चहा घेऊन निघायचं ठरवलं. नवीन
साडी, सण म्हणून दोन दागिने अंगावर घालून निघाले. आणि निघणार तेवढ्यात पतिराजांना
कधी नव्हे तो माझा कळवळा आला. म्हणाले, देऊळ थोडं लांब आहे, येताजाता
रिक्षाच कर. मी मान डोलावली आणि निघाले. मी पायी जायचं
ठरवलं होतं. देवळात गेले, दर्शन झाले; मग जवळच रहाणाऱ्या जाऊबाईंकडे जायचं ठरवलं. एरवीला जमत नाही, अनायासे सणही
आहे. तिळगुळाची देवाण-घेवाण करू; त्यांच्याकडेही सणाची गडबड असणार. आता
देवळापासून त्यांचं घर जवळच आहे, पण एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे
वळावं लागतं. मी विचारांच्या तंद्रीत असणार. कुठलंतरी चुकीचं वळण घेतलं. काहीतरी बिनसलंच.
मी तर चालतच होते, आणि घर काही येईना! 'अजुनी चालतेच वाट...' अशी माझी अवस्था. रस्ता मोठा प्रशस्त. मोठमोठाले बंगले. हा नक्कीच जाऊबाईंच्या
घराचा भाग नव्हता. आता ऊन चढू लागलेलं. माणसांची वर्दळ नाही. आणि मी आपली
वेड्यासारखी चालतेच आहे. बरं लगेचच जाऊन यायचं म्हणून मोबाईल पण बरोबर नव्हता! आणि एखाद्या घरात शिरून फोन करावा हे
काही सुचलं नाही. अंगावर दागिने होते, त्याची आता भीती वाटू लागली. घर
सापडेना म्हणून घाबरून गेले. आपल्याच भागात आपण रस्ता चुकतो याची लाज आणि खंत वाटत
होती. त्यात, आपण चकव्यात तर सापडलो नाही ना ह्या कल्पनेने दरदरून घाम फुटला. मुळात
घाबरट स्वभाव - त्याला साजेशाच गोष्टी घडत गेल्या. चकव्यात सापडलेला माणूस म्हणे आहे तिथेच फिरत
राहतो. त्याला जिथे जायचं असतं तिथे जाता येत नाही. चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी त्याची स्थिती होते. काय
काय वाचलेलं, ऐकलेलं होतं; ते आठवून जीव घाबरला होता.
खरं म्हणजे चकवा वगैरे काही नसतं, रस्ता चुकायचा आणि म्हणायचं की
चकव्यात सापडले. पण माझा धीर सुटत चालला हे मात्र खरं. तेवढ्यात एक रिक्षा
येताना दिसली. जवळ आल्यावर हात केला पण ती रिकामी नव्हती! रिक्षा निघून गेल्यावर
डोळ्यात पाणीच यायचं बाकी राहिलं होतं. काय करावं हेच सुचेना. अगदी देवाचं नाव
घ्यावं हेसुद्धा. पण देवाला माझी आठवण असावी. आतल्या प्रवाशाला सोडून तो
रिक्षावाला परत माघारी आला. मी पटकन रिक्षात बसले. घराचा पत्ता सांगितला. गजानन
महाराजांचे मनोमन आभार मानले. बहुधा मी दर्शन श्रद्धेने, भक्तिभावाने घेतलं
असणार. म्हणूनच गजानन महाराजांनी त्या रिक्षावाल्याला परत येण्याची आज्ञा दिली
असणार.
असो. मी घरी परत आले. पण या गोंधळात खूप वेळ गेला होता. त्यात मी रिक्षाने
येणार जाणार अशीच घरच्यांची समजूत. जाऊबाईंकडे जाऊन येण्याच्या माझ्या प्लॅनची
कुणालाच कल्पना नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी मला फारच उशीर झाला होता. आता
त्यासाठी काहीतरी ऐकून घ्यावे लागणार याची मानसिक तयारी करतच मी घरात शिरले.
काळजीपोटी, प्रेमापोटी असली तरी ती बोलणीच असणार होती.
मी घरात आले. साडी बदलली, हातपाय धुतले. घर स्वतःच्याच तालावर
चालू होतं. हे शांतपणे पेपर वाचत होते. नातवंडं TV पुढे दंगा घालत होती. वर्षा - मुलगी -
तिळगुळाची तयारी करत होती. सुजाता - माझी सून - गुळाच्या पोळीचा गूळ बघत होती. मला
म्हणाली - "आलात का? ब्रेकफास्ट करणार का थोड्या वेळात जेवायलाच बसणार ? " भूक तर लागली
होती पण काही खावंसं वाटेना! सकाळी देव दर्शनाला गेलेली मी, जेवायच्या
वेळेला आले तरी कुणालाच काही वाटत नव्हतं. काही काळजी नाही. यायला उशीर झाला
म्हणून काही चौकशी नाही. प्रत्येक जण आपापल्या कामात इतका गुंग? मी काय - आले
आणि गेले. तासात यायचं ते तीन तासात आले. "बराच उशीर झाला - उन्हाची वेळ झाली..." एवढेच काय ते शब्द मला अपेक्षित होते. मला वाईट वाटलं. माझी काळजी वाटेल हा
विचार फुसका होता तर. माझा भ्रमनिरास झाला. गोष्ट तशी छोटी होती. पण तरी मनाला
लागलीच.
चकवा मला घराबाहेर नाही तर घरातच लागला होता आणि रस्त्यातल्या चकव्यापेक्षा
तो काकणभर जास्तच क्लेशदायक होता!!
-- अंजली टोणगांवकर
No comments:
Post a Comment