देवमूर्तींचा वृद्धाश्रम

बागेच्या कोपर्‍यातल्या त्या चौथऱ्याकडे फारसे लक्ष गेले नव्हते - कारणही नव्हते. साधारणपणे ३ बाय ४ बाय ४ चा एकविटी सिमेंटचा बॉक्स. पुढून उघडा. आतमध्ये दोन दगड. शेंदूर लावलेले. तळ्याभोवतीच्या शेतजमिनीत कधीकाळी कुण्या भाविकांच्या नवसाला पावल्यामुळे स्थापले गेलेले. आता बागेच्या कामात काम म्हणून हा चौथरा बांधला गेला असणार आणि त्या देवमूर्तींना उन्हापावसापासून खूप वर्षांनंतर आसरा मिळाला होता. चौथऱ्यावर त्या दिवशी एक गणेश मूर्ती दिसली आणि गम्मत वाटली. कुण्या परगावच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला घर सोडताना एखाद्या म्हातार्‍या थरथरत्या हातांनी दिलेली असणार, आणि बंगलोरमध्ये घर बदलताना नवे घर घेतल्यावर किंवा परदेशी जाण्याची संधी मिळाल्यावर अडचण झालेली, पण बालपणच्या संस्कारांमुळे टाकूनही न देववणारी मूर्ती! हा चौथरा एक उत्तम सोय किंवा पळवाट होती. मन:शांती देणारी! पण, सोय होती म्हणून त्या मूर्तीचे नशीब छान नव्हते. त्या मूर्तीची स्थापना चौथऱ्यावर झाली होती - आत नव्हे. बसायला जागा होती, पण उन्हापावसापासून, थंडीवाऱ्यापासून सुटका नव्हती. मी ती मूर्ती आतमध्ये ठेवली, पण दुसऱ्या दिवशी ती परत वरती आली होती. देवमूर्तीलाही कर्मभोगातून सुटका नव्हती. 

नंतर मग हळूहळू मूर्तींची संख्या वाढतच चालली. पहिल्या मूर्तीच्या आगमनाने इतरांची जणू भीडच चेपली. बरेचसे गणपती आले. तुरळक शंकर, बालाजी, गुरू नानकजींचा फोटो... मग एखाददोन महावीर, बुद्धही! चौथरा सर्वसमावेशक होता. ते सिद्ध करायला एक दिवस एक मदर मेरी आणि बालयेशूही दाखल झाले! पैगंबर मूर्तिपूजेविरुद्ध होते म्हणून - नाही तर तेही तिथे दाखल झाले असते. चौथऱ्याने मात्र सर्वांना सामावून घेतले. पण एक सामायिकता होती. सर्व मूर्ती उन्हापावसात होत्या. त्यापैकी कोणीच त्या खोलीच्या आत नव्हते. एखाद्या रईस जमीनदाराने आपल्या जुन्या वाड्याच्या दोनचार खोल्या धर्मार्थ खुल्या कराव्यात, तशी परिस्थिती होती. आसरा होता - आदर नव्हता. खोलीतले देव आणि खोलीबाहेरचेही, आपापली जागा पकडून होते. उतरत्या सूर्याची किरणे, बागेतल्या झाडांमधून त्या चौथऱ्यावर पडली की ते दृष्य एखाद्या पेन्शनर क्लबमधल्या  संध्याकाळचे दिसायचे! आणखीन एक दिवस मावळला याचं दु;खमिश्रित समाधान काही चेहेऱ्यांवर, कुणी हातात कप घेऊन मावळत्या सूर्याकडे बघत, गतायुष्याच्या अवलोकनात; कुठे चारदोन जण एकत्र बसून, हसत खिदळत; कुणाची टांगखिचाई करताहेत... 

रात्रीच्या अंधारात, या देवमूर्ती आपल्या गतवैभवाच्या आठवणी एकमेकांना सांगत असतील का? कधीकाळी, घरातल्या सणसमारंभात उत्सवमूर्तीचा मान यांना असणार! आणल्यापैकी उत्तमोत्तम फुले, पत्री, महानैवेद्याचे ताट याकडे त्या घरातल्या कर्त्या पुरुषाने आर्जवाने लक्ष दिले असेल! एक भीतीयुक्त दरारा बाळगणाऱ्या या मानकऱ्यावर, आज ही उपेक्षेची वेळ आली होती. सर्वसामान्य व्यक्तींना अनुभवाला येणारे हे चढउतार या मूर्तींनाही चुकले नव्हते!!

माणसांच्या वृद्धाश्रमातले रहिवासी आणि या देवमूर्ती - बरेचसे साम्य. पण माणसांचे वृद्ध थोडेसे लकीच! माणसांच्या वृद्धांना मृत्यूपर्यंतच्या प्रवासाची भीती. पण सगळ्या व्यापतापायातून कधी ना कधी सुटका होणार  ही आशा - नव्हे खात्रीच. पण कधीकाळी दैवत्वाचे प्रतिनिधित्व केल्यामुळे; देवमूर्तीना आलेले अमरपणा हा त्यांना कधीतरी वरदानाऐवजी शापही वाटून गेला असेल का

जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ - या म्हणीची ही जरा यातनांदायकच प्रचिती....


- अभिजित टोणगांवकर

No comments:

Post a Comment