चाफ्याच्या झाडा...



"चाफ्याच्या झाडा" ही पद्मा गोळे यांची कविता. का कुणास ठाऊक, पण चाफ्याचं झाड हे कवी बी सारख्या जुन्या ते आजचे नवकवी, यांचे सर्वांचे एक आवडते रूपक. मुख्यत्वेकरून एका अल्लड मुलीचा सखा, नवयुवतीचा प्रियकर आणि प्रौढ स्त्रीचा जोडीदार, म्हणून हे चाफ्याचे रूपक पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येत असते. 'चाफ्याच्या झाडा" ह्या कवितेच्या कवितावाचनाच्या दोन दृकश्राव्यफिती (व्हिडीओ क्लिप्स) काही दिवसांपासून सोशल मीडिया वर फिरताहेत. त्यापैकी एक कवितावाचन केलं आहे, पुलंच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांनी. (पु.ल. गेल्यानंतर २००१ मध्ये पुलंचं नाव महाराष्ट्र कला साहित्य अकादमीला देण्याचे ठरले. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून आणि आपलाही खारीचा वाटा म्हणून सुनीताबाईंनी एक काव्यवाचनाचा २ तासांचा कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमात त्यांच्या व पुलंच्या आवडीच्या कवितांचे वाचन करून ती दृकश्राव्यफित अकादमीला भेट म्हणून दिली.) तर दुसरं कवितावाचन केलं ते स्पृहा जोशी ह्या आजच्या गुणी अभिनेत्री तसेच कवयित्रीने. ('एका लग्नाची दुसरी गोष्ट' ह्या सीरियलमध्ये सतत कविता गुणगुणणाऱ्या आणि कवितेच्याच जगात वावरणाऱ्या अल्लड मुलीची भूमिका करणारी स्पृहा ही खरंच कवयित्री असेल हे तेव्हा माहीतच नव्हते.) एकाच कवितेच्या ह्या दोन कवितावाचनात दोन पिढ्यांचं अंतर दिसतं खरं. पण हे अंतर पिढीचं असण्यापेक्षा त्यांच्यामधील वयांचं  आणि त्या वयांतील भावनांचं आणि अनुभवांचं असावं.  एकच कविता एका तिशीतल्या तरुणीला तसेच सत्तरीतल्या प्रौढेला कसा वेगवेगळा अनुभव देऊन जाते, हे ह्या दोन व्हिडीओ क्लिप्समध्ये ह्या दोन्ही प्रस्तुतकर्त्यांनी आपल्या भावमुद्रांनी आणि शब्दांमध्ये प्राण ओतणाऱ्या आपल्या प्रतिभेने समर्थपणे दाखवून दिले आहे. त्यात अभिनय आहेच पण त्यापेक्षाही 'ये हृदयीचे ते हृदयी' पोचवणेही आहे. खरं तर त्या दोघी काय भावना पोचवत आहेत, ह्याचे वर्णन शब्दांनी बांधणे अशक्य आहे. तरीही हा अशक्यपणा लक्षात ठेवून आणि मान्य करूनही त्यातील जाणवलेला भावार्थ (कवी बींच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेला सोबत घेऊन) व्यक्त करण्याचा हा एक छोटासा आणि अत्यंत नम्र प्रयत्न !

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा,
का बरं आलास आज स्वप्नात ?
तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं ?
दुःख नाही उरलं माझ्या मनात !


स्पृहा जोशी म्हणतेय,

"चाफ्याच्या झाडा, माझ्या सख्या, कालच आपलं ठरलं ना रे तरीही का आलास स्वप्नात? हो, आपण काल भांडलो, पण मिटलं ना भांडण, मग दुःख  कुठलं उरलंय  आता? परवाचीच गोष्ट ना, आपण आंब्याच्या वनी गेलेलो, गळ्यात गळे मिळवून मैनेसवे गाणी म्हटलीत ना ? पण आता मोठे झालो आपण ! हं, आता आपली भांडणे कालसारखी क्षणात मिटत नाहीत हे खरे, पण काही वेळाने चूक समजल्यावर तरी मिटतात ना ? मग का आलास पुन्हा स्वप्नात भांडायला आणि चिडवायला? आपल्याला आता यावरूनच पुन्हा भांडायचं आहे का?”

फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा,
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात !
केसांत राखडी, पायांत फुगडी,
मी वेडी भाबडी तुझ्या मनात !

लहानपणी आपण खूप खेळलो केतकीच्या बनी. आठवतंय तुला, त्या गंधाळ वनात नागराजासोबत खेळतांना तू आणि मी देहभानच विसरून गेलो होतो. त्याचा अर्थ आत्ता कुठे उमगतोय. पानांच्या तारुण्याचा हिरवा आणि ते तारुण्य वागवणाऱ्या निर्मळ सुमनांचा पांढरा रंग आता कुठे मनामनात आणि कणाकणात रुजतोय. झिम-पोरी-झिम म्हणत घातलेल्या फुगड्यांचा अर्थही समजतोय आता. मातीचा राखडी रंग डोक्यात मिरवणारी मी आणि उडून फुगड्या घालणारी मी, तुझ्या मनात आहे हे माहितेय मला. आणि तू माझ्या मनात आहेसच हे काय मी बोलून दाखवायला हवे का? मग 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' हे अट्टाहासाने खरं करायला स्वप्नात येण्याची काही गरज होती का राजा? आता आजचा दिवस तुझ्या आठवणीत जाणारच माझा, याबद्दल आता चिडवू नकोस म्हणजे झाले.

चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा
नको ना रे पाणी डोळ्यात आणू !
ओळखीच्या सुरात, ओळखीच्या तालात,
हातग्याचीं गाणी नको ना म्हणू !

हे विश्वाचे अंगण आपल्याला आंदण म्हणून मिळाले आहे, हे उमजलंय ना तुला? आपण दोघेच येथे शुद्ध रसपान करणार आहोत, मग का रे पाणी डोळ्यात आणतोस? द्वैताच्या ओळखीच्या सुरांत ती जुनी ओळखीची गाणी का म्हणतोस? नको ना म्हणूस.  ती गाणी अजून आठवण करून देतात की आपले द्वैत मागे पडले आहे थोडेसे, पण आपले अद्वैत तरी कुठे झाले आहे अजून? पण आता त्या द्वैताकडे नाही जावेसे वाटत. 


तुझ्याच आळ्यात, एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात खेळलेय ना?
जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात फिरलेय ना?

कालच आपण तुझ्याच आळ्यात आपल्या मैत्राचे द्वैत उलगडले होते ना? कधी रुसव्याच्या तळ्यात तर कधी आनंदाच्या मळ्यात खेळलोय ना आपण ! कधी आकाशात झुललोय तर कधी मातीत लोळलोय ! तो आनंद आणि तो रुसवा आता कुठे आहे, काही कळत नाहीये. आणि ते आकाश तरी कुठे आहे ? जणू सगळ्या दिशा आटून गेल्या आहेत आणि मातीत रुजलेले आपण दोघे आकाशात झोके घेतांना एकरूप झालो आहोत ! अद्वैत, अद्वैत म्हणतात ते हेच तर नव्हे?”




चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा
पानांत मनांत खुपतंय ना?
काहीतरी चुकतंय ! कुठंतरी दुखतंय !
तुलाही कळतंय ! कळतंय ना?

आपण असे एकरूप झालो आहोत, हे खरंच अद्वैत आहे का रे? नाही, थोडेसे द्वैत शिल्लक आहे कदाचित. काहीतरी चुकतंय, कुठंतरी दुखतंय, काय असावं बरं  हे? एकरूप झालोय आपण पण आपले अस्तित्व अजून कायम आहे, हेच तर खुपत नसेल ना? की ते अद्वैत अजून गाठले नाही, हे दुखत असेल? की ते दुखणं बाकी काही नसून आपण एकमेकांना काहीतरी बोललो त्याचा राग आला,  हे असेल का? राग आहे म्हणजे तो राग येऊ देणारा अहंकारही अजून सूक्ष्मरूपाने का होईना शिल्लक आहे म्हणायचे.  हेच तर आपल्याला खुपत नाही आहे ना? आणि हा अहंकार असल्यामुळेच अद्वैत पूर्ण कळले नसावे का आपल्याला? कळतंय ना रे तुला मी काय म्हणतेय ते?”

चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलंय ना !
कुठं नाही बोलायचं, मनात ठेवायचं  
फुलांनी ओंजळ भरलीय ना !
फुलांनी ओंजळ भरलीय ना !

पण हे काहीही असले तरी त्याचे दुःख करायचे नाही, त्याची उणीव जाणवू द्यायची नाही, सगळं हसून साजरं करायचं हे ठरलंय ना आपलं? आपण ते अद्वैत अजून गाठू जरी शकत नसलो, तरीही त्याचा विषाद चेहऱ्यावर नाही दाखवायचा, ठरलंय ना आपलं ? आणि ते न जमलेले द्वैत/अद्वैताचे गणित तुला आणि मला ठाऊक असले, तरीही आज आपल्या सोबतीच्या क्षणांच्या फुलांनी आपली ओंजळ भरली आहे ना? आहे ना भरली ? मग सोड ना रे ते क्षुल्लक दुःख / वैषम्य ! काल तर आपलाच होता, आज तर आहेच आणि उद्यापण आपलाच असणार आहे ना? विषयांचे किडे होण्यापेक्षा आणि राग, लोभ, दुःख यांच्या आहारी जाण्यापेक्षा आपण शुद्ध आनंदाचे रसपान करू या. मला माहिती आहे, नव्हे खात्रीच आहे की उरलेला तो अहंकार, ते द्वैत, कधीतरी गळून पडून अद्वैताचे ते हवे असणारे अमृतकण आपल्याला मिळणारच आहेत !



चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा,
का बरं आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं?
दुःख नाही उरलं माझ्या मनात !



सुनीताबाई म्हणतात,

"चाफ्याच्या झाडा, का बरं आलास रे स्वप्नात? आपला आयुष्यभराचा सहवास ना? लहानपणी आंब्याच्या वनी खेळलो, केतकीच्या बनी बागडलो, रुसलो आणि क्षणात विसरून खेळलोदेखील. थोडे मोठे झाल्यावर भांडणे दररोजची झालीत झालीत आता प्रत्येक भांडण मिटायलाही वेळ जास्त लागायचा. यातूनच हळूहळू खऱ्या अर्थाने आपण एकमेकांना ओळखू लागलो. आणि मग द्वैतातून अद्वैताकडे कधी गेलो ते कळलेच नाही. ते अद्वैत गाठले, एकरूप झालो आणि तू अचानक निघून गेलास. द्वैतात दोघे असतातच, पण अद्वैतदेखील दोघे असतील तरच होते. त्या आपल्या दोघांतील तू अद्वैतातून देखील निघून गेलास. त्याचं दुःख नाहीये आता मनात. पण भिवविणाऱ्या संध्याछाया बघतांना आपलंच ठरलं होतं ना, की एकजण आधी गेला तरीही दुसऱ्याने दुःख नाही करायचे म्हणून. नाहीच केले मी दुःख. पण मी दुःख गिळून उभे राहिले तर का आलास स्वप्नात? आता तुझा विरह नाही तर तुझे धूसर अस्तित्वच अधिक दुःख देते मला. तू भेटायला आलास म्हणजे तू अजून विरहाचे दुःख नाही गिळले का रे? "


फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा,
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात !
केसांत राखडी, पण पायांत फुगडी,
मी वेडी भाबडी तुझ्या मनात !

आठवताहेत मला ते दिवस, तारुण्याने रसरसलेल्या हिरव्या पानांचे आणि मुक्त स्वछंदी बहरलेल्या पांढऱ्या फुलांचे. आपण कधीचेच त्या रंगांनी रंगलो ते कुठे समजले आपल्याला? पण ते रंगणे वरवरचे, कायेचेच होते का? असेलही कदाचित. नंतर ते रंग मनातही उतरले आणि आपले मनही आपल्या नकळत रंगून गेले. काया तर आता बदलली पण ते मनाचे रंगणे अजूनही थांबलेले नाही. कायेशिवायही ते रंग अजूनच खुलताहेत, गहिरे होताहेत, असे का वाटावे मला? कधीकाळी मी मातीच्या राखाडी रंगानी माखलेल्या केसांनी तुझ्याशी फुगडी खेळले होते, हे आपण कधीच विसरलो नाही. ती वेडी, भाबडी मी अजूनही आहे का रे तुझ्या मनात? आपले अद्वैत झाले, तू फुलून आलास, साऱ्या दिशा आटून गेल्या आणि कोण मी आणि कोण तू, असा प्रश्नही पडला आपल्याला. पण त्या भाबडेपणासाठी, ती प्रतिमा जपण्यासाठी तरी जायचं का रे द्वैतात आपण पुन्हा ? खूप दिवसात भांडणच नाही केले बघ तुझ्यासोबत, त्या भांडणासाठी तरी जाऊ या ना द्वैतात ! त्या द्वैतातील ती अल्लड, अवखळ मी आठवते आहे ना रे तुला?”

चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा
नको ना रे पाणी डोळ्यात आणू !
ओळखीच्या सुरात, ओळखीच्या तालात,
हातग्याचीं गाणी नको म्हणू !

तुझ्या चाळ्यात, एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना !
जसं काही घोड्यावर, तुझ्याच फांद्यांवर आभाळात हिंडलोय ना !

तू स्वप्नात आलास आणि डोळ्यात पाणी आल्यासारखे वाटले बघ ! पण ते पाणी माझ्या डोळ्यांचे की तुझ्या रे? आपल्या इतक्या वर्षांच्या सोबतीत आपण बरेच खेळ मांडले, खेळले आणि मोडलेदेखील. त्यालाच संसार म्हणायचे का ठाऊक नाही. पण आता त्या अर्धवट खेळलेल्या, खेळून चुकलेल्या, लुटुपुटीच्या संसाराची गाणी नको गाऊस. त्या सुरांनी मी वेगळ्याच हिंडोळ्यांवर झोके घेते बघ. आणि मग खाली पहिले की त्या अधांतरी अवस्थेत एकदम जाणीव होते ती तू नसल्याची. त्यापेक्षा नको ना म्हणूस ती गाणी. कमी का खेळलोय, कमी का गायलोय आपण?  जमिनीवरच नव्हे तर आकाशातही हिंडलोय ना ! चांदण्यांनी खचाखच भरलेल्या आकाशातील चान्दणेही सोबतच खुडलेय ना? आणि त्याच वेळी आकाशातच आपल्याला आपल्याच नव्हे तर आपल्या आणि आकाशाच्याही अद्वैताची जाणीव झाली होती, हे विसरला नाही ना तू?” 


चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा
पानांत, मनांत, खुपतंय ना?
काहीतरी चुकतंय ! कुठंतरी दुखतंय !
तुलाही कळतंय ! कळतंय ना ? कळतंय ना? 
कळतंय ना? कळतंय ना !

पण राजा, काहीतरी खुपतंय, कुठेतरी दुखतंय ते कळतंय ना तुला? आपण दोघांनी मिळून अद्वैत गाठल्यावर त्या दोघांतील तू निघून गेलास. आता माझ्यासाठी हे द्वैतही नाही आणि अद्वैतही नाही, हे कळलंय का तुला? द्वैतामध्ये आपण वेगवेगळे तरी होतो आणि आपले स्वतंत्र अस्तित्व होते. पण अद्वैतामध्ये म्हणायला आपण एक आहोत, नव्हे आहोतच, पण तू निघून गेल्यामुळे आपण विभक्त झालो आहोत. अद्वैत गाठून मी स्वतःला हरवून टाकलं, पण आता त्या अद्वैतात तूच नाहीस म्हटल्यावर हरवलेली मी शोधू तरी कुठे स्वतःला आणि कशी? तो स्वच नाही राहिला रे आता. खरं सत्य हे द्वैत आणि अद्वैताच्याही पलीकडे असतं, हे कळलंय मला आता. आणि खरं सांगायचं तर तेच खुपतंय, तेच दुखतंय. तुलाही खुपतंय ना? तुला कळतंय ना? कळतंय ना? एकदा तरी हो म्हण ना रे.  

चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलंय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं!
फुलांनी ओंजळ भरलीय ना?
फुलांनी ओंजळ भरलीय ना !

पण हे खुपणं, हे दुखणं, नाही जाणार आता. आपलं आधीच ठरलंय ना, की हे दुःख कोणालाही न जाणवू देता आपल्याला हसून सजवायचं आहे ते. तसेही हे दुःख कुठे बोलणार, काय बोलणार आणि कोणाशी? द्वैतामध्ये तो रुसवा राहू शकतो. आता अद्वैतात कुठला रुसवा आणि कुठली तक्रार? आणि आपण दोघे एकाच आहोत तर ती  तक्रार करायची तरी कोणापाशी? जाऊ देत, आपली आठवणींच्या फुलांची ओंजळ तर भरलीय ना? उद्या नवीन आठवणींची नवीन फुले त्यात भर नाही घालणार तर न घालू देत. पण जी भरलेली ओंजळ आहे, त्या फुलांचा गंध तर दरवळतो आहे ना? प्रत्येक श्वासात आणि त्यातून प्राणात तो गंध पसरतो आहे ना? अधिक गडद आणि गहिरा होतो आहे ना? आज तुझे रूप आणि स्पर्श नसले तरीही रंग आणि गंध हीच खूण आहे तुझ्या अस्तित्वाची. आता तरी तू स्वप्नात नको येऊस ना. त्या आठवणींच्या फुलांच्या रूप, रस, गंधाचंच आता एक अद्वैत झालंय आणि एकटी मी त्या आठवणींच्या अद्वैतात मिसळून गेली आहे."

ते चाफ्याचे झाड आपले पु.ल. आणि सुनीताबाईंचे तसेच जिवलगांचे 'भाई' असतील, आणि ती अल्लड मुलगी, अवखळ नवतरुणी व संयत प्रौढा पुलंची 'सुनीता', आमच्या सुनीताबाई असतील, तर फक्त चाफ्याच्या झाडाकडे बघणाऱ्यांना ते चाफ्याच्या झाडाचे आणि त्या अल्लड मुलीचे अद्वैत कसे उमजणार?

संदर्भ :
१. स्पृहा जोशींचे कवितावाचन
२. सुनीताबाईंचे कवितावाचन (Kavitanjali Part 2) - https://www.youtube.com/watch?v=x2eVgD72Pbk  starting at 22:25

                               रवींद्र केसकर


No comments:

Post a Comment