लेख स्पर्धा: तृतीय क्रमांक

माझा स्वयंपाकघरातील अविस्मरणीय अनुभव
स्वयंपाकघरहा समस्त महिलावर्गाचा अत्यंत जिव्हाळयाचा विषय. शैशव, यौवन, वार्धक्य अशा आयुष्याच्या प्रत्येक वळणावरील सोबती. बालपणी भातुकली खेळलेली मुलगी सापडणे विरळाच. पुढे वाढत्या वयासह अभ्यास, छंद, मित्र - मैत्रिणी, करियर च्या फुलपंखी विश्र्वात काहीशी विस्मृतीतच गलेली ही मैत्री पुनश्र्च दृढ होते ती लग्नानंतर. मग नवरा, मुलं, पाहुणे-रावळे, नातवंड यांच्या आवडी - निवडी जपताना तेच आपल विश्र्व होऊन जातमाझी ही कथा काही वेगळी नाही आणि मुंबईकर म्हटल की शिक्षणनोकरी साठी दररोज लोकल प्रवास अपरिहार्य. त्यातच मी शास्त्रीय नृत्य शिकत असल्याने ते कार्यक्रम, रियाजअभ्यास यातच इतकी मग्न होते की चि.सौ.कां होईपर्यंत या दोस्ताशी संबंध फक्त जेवण्यापुरताच.

लग्नानंतर एकेक पदार्थ शिकताना मात्र स्वयंपाकघराशी नव्याने बंध जुळलेहळूहळू सवयीने रोजचा स्वयंपाक जमू लागला परंतु प्रत्येक वेळी चव निराळीच असे. आज फक्कड जमलेली भाजी उद्या करू जावी तरी घटकपदार्थमसाले तेच असूनही चवबदल निश्चित. हे कसे..? कोडे काही सुटेना. पहिल्यांदा केलेली खारट फोडणीची पोळीमुगाच्या खिचडीचा चुकलेला अंदाज, विविध देशांच्या नकाशेदार पोळ्या, त्याचबरोबर चविष्ट सूपनिरनिराळे लाडू, पराठेखमंग चिवडाचटकदार भेळपावभाजी, भोंडल्याचीहटकेखिरापत अशा आमच्या मैत्रीच्या अनेक कडू-गोड आठवणींचा ठेवा जपताना कोड्याचे उत्तर शोधणे ही सुरू होते.

सायीला विरजण लावून ताक करणेही अशीच एक मला साधलेली गोष्ट. बालपणी आजोबांना ताक करताना पाहिल होत. काम करताना घुसळणीच्या सुंदर पार्श्वसंगीतच्या साथीने ते अनेक श्लोककविता म्हणतज्या त्यांच्या मांडीवर डोक ठेऊन ऐकताना  मी तल्लीन व्हायचे आणि या मैफिलीची भैरवी म्हणजेसगळ तोंड माखुन घेत रवीला लागलेल लोणी चाटून खाण्यातला आनंद‘...अहाहा स्वर्गसुखचनाही म्हणायला कत्थक मध्ये कृष्ण लीला साकारताना ताक घुसळण्याचा अभिनय मी अनेकदा उत्तम साकारला आहेपण प्रत्यक्षात मात्र विरजण लावताना कधी प्रमाण जास्त कधी कमी असे हमखास होई. त्यामुळे दुसरे दिवशी ताक करताना अधिक वेळ रवी घुसळावी लागून हात भरून येत. अशा काही अयशस्वी प्रयत्नांमुळे म्हणा किंवा आजोबा, बाबासासरे अशी तगडी साथसंगत लाभल्याने ही असेल कदाचित पणये अपने बस की बात नहीअसाच ग्रह होता. अनेकदा विनंती करूनही सासरे एकच उत्तर देतअग त्यात काय शिकवायचय? करत रहा म्हणजे आपोआप येईल. केल्याने होत आहे रे“...मात्र एकदा शिकवलं, समजून सांगितलं की तंत्र आत्मसात करण पटकन जमतं असा माझा दृष्टीकोन. दोघेही आपापल्या मतांवर ठाम. माघार कोणी घ्यावी काही काळानंतर मी विनंती करणं थांबवलं पण इतकी साधी गोष्ट अजूनही आपल्याला जमू नये हे शल्य बोचत होतं. ते जमायलाच हव ही तळमळ दिवसेंदिवस वाढत होती. सासु - सासरे नसताना जरा नाखुशीनेच हे काम उरकण्याकडे माझा कल असायचापरंतु काही दिवसांपूर्वीच्या अनुभवाने माझा दृष्टीकोन पूर्ण बदललाच शिवाय बरेच दिवस अनुत्तरित राहिलेलं चव बदलाच कोडही सहज सुटलं.

त्या दिवशी ताक घुसळायला सुरवात करतानाच एक फोन आला. ‘आर्ट ऑफ लिविंगच्याआश्रमात नवरात्रीनिमित्त  ‘कथा कनेक्टसंस्थेतर्फे सादर होणार असलेल्या कार्यक्रमात देवी दुर्गा ही भूमिका साकारू शकेन का अशी विचारणा झाली ज्यासाठी अर्थातच मी तत्काळ संमती दिली. मात्र ताक करता करता एकीकडे विचारही सुरू झाला की तालानुरूप पदन्यास करीत entry, नृत्यप्रस्तुती होईपर्यंत देवीस्वरुपात स्थिर रहाणे मग exit इतकीच भूमिका होती. एक वेळ अवघड तालावर अचूक सम साधणे ही गोष्ट सुलभ परंतु केवळ दोन practice sessions मध्ये फक्त सात्विक अभिनयाच्या (हावभाव) माध्यमातून देवीस्वरूप समूर्त साकार करणे तसे अवघडच. वेशभूषा (आहार्य अभिनय), मुकूट, हातात त्रिशुळ घेऊन मी देवी दिसेनही पण रंगमंचावर प्रवेश केल्यानंतर नेमक्या भावाभिव्यक्ती साठी मन स्थिर होण महत्वाचं अन्यथा तो फक्त देवीचा आभास ठरेल. मग हा मानसिक ठेहराव साधण्याठी काय कराव?
सोपे आहे की- अहो ताक चांगलं होण्यासाठी एकत्रित साठवलेल्या सायीला जस योग्य प्रमाणात विरजण लागणे महत्वाचे तसच सृष्टीच्या कल्याणासाठी सुष्ट - दुष्टांमधील समतोल जपणही आवश्यक. हे समीकरण बिघडल की दुष्टांच्या प्राबल्याने सज्जनांवरील अत्याचार वाढीस लागतात. जसा महिषासुरतुझा वध केवळ स्त्री च्या हातूनच होईलया ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झाला होता.

स्वच्छ धुतलेल्या रवीच्या सहाय्याने (गंमत पहा हा रवी शब्द ही स्त्रीलिंगीच की) साईचे मर्दन करीत ताक घुसळताना त्यावरील दाब कमी - जास्त करायचा. आश्यकतेनुसार सहाय्यक म्हणून पाणी घालायचंताक होत आलं की लोणी छान एकत्र होईपर्यंत आणखी थोडा वेळ रवी हलक्या हाताने फिरवायची आणि शेवटी लोण्याचा गोळा अलगद काढून घ्यायचा. जशी ताक, लोणी, दही ही सारीच मूळ दुधाची अधिक पौष्टिक रूपे तसेदेवी दुर्गाहे आदिशक्ती पार्वतीचेच संहार - रक्षणात्मक अजेय रूप. महिषासुराच्या अत्याचाराने त्रस्त प्राणिमात्रांच्या रक्षणासाठी एकत्रित आलेल्या त्रिदेवांच्या तेजातून प्रकट झालेली ही रणचंडी. इतर देवांनीही सहाय्यभूत अशी स्व-शक्ती तिच्या ठायी प्रतिष्ठित केली आणि मग या अष्टभुजेने महिषासुराचे मर्दन करीत मुक्तीरुपी नवनीत सर्वांना बहल केले. “जय महादुर्गे माता भवानी असुरमर्दिनी दयानिधे माँ“ असा सर्वानींच तिचा जयजयकार केलामनोमन मी ही त्या श्रीचरणांशी नतमस्तक झाले. असीम शांतीची भावना तना - मनाला व्यापून राहिली.

विचारांच्या त्या तंद्रीत किती वेळ गेला कुणास ठाऊक..पण भानावर आले तेव्हा अत्यंत सहजतेने हळूवार फिरणारी रवी आणि त्या भोवती छान लोणी जमून आलेले दृष्टीस पडले. डोळ्यांतून नकळत वाहणाऱ्या आनंदाश्रूंत पूर्वीच्या अपयशी प्रयत्नांचे शल्य विरघळून गेले. अखेर जमले तर.. “आनंदाचे डोही आनंद तरंग“ अशी स्थिती झाली. हात आपोआप जोडले गेले.ह्याच आत्मिक आनंदाच्या प्राप्तीसाठी वारकरी नित्यनेमाने त्या विटेवरील सावळ्या रूपाच्या दर्शनाला जात असतील नाही का? काही गोष्टी गुरुमुखातून अथवा पुस्तकातून नाही तर स्वानुभवाने शिकाव्या लागतात हेच खरं.

कार्य साफल्यासाठी केवळ माहितीचा पाया (theoretical base) पक्का असून उपयोग नाही तर तना मनाची तद्रूपताही तितकीच महत्वाची. “मी करतोह्या अहंभावाची जागा तो ईश्वर माझ्याकडून करवून घेतोया दास्यभावाने घेतली की हे तादात्म्य साधणे सुलभ होतेताक करण्याची पद्धत मला मुखोद्गत होती मात्र कृती करताना एकाग्रतेअभावी कार्यसिद्धी होत नव्हतीज्या क्षणी ती साधली तो क्षण साक्षात्कारी अनुभवाने कृतार्थ झाला, अविस्मरणीय ठरला.

आपल्या प्रिय जनांच्या हृदयाचा मार्ग पोटातून जातो हे जितकं सत्य, त्याचबरोबर अन्न शिजवण्याच्या कृतीलाही असे ईश्वरी अधिष्ठान लाभले तर त्या अन्नब्रह्माची चव कायम राहिलच पण त्या च्या सेवनाने मनःशांती सुद्धा लाभेल हे निश्चितहेच या सर्व विचारमंथनातून हाती आलेले नवनीत.

 - मानसी काळेले-फडके
       

No comments:

Post a Comment