मने जिंकण्यासाठी...

गोड बोलणे हा एक विषय आहे. परंतु मी सुमारे ४० वर्षे मानवी साधन संस्थापन (Human Resource Management ) या क्षेत्रात काम करीत आहे. त्यामुळे हा लेख लिहिताना माझा HR मधला अनुभव मी डोळ्यांसमोर ठेवीत आहे. 
सर्वप्रथम  HR च्या संदर्भात गोड  बोलणे म्हणजे काय याचा विचार  करणे आवश्यक आहेगोड हा शब्द मुख्यत्वे खाण्याच्या पदार्थाबद्दल वापरला जातो. (तिखट, आंबट, खारट, वगैरे). मधुमेह नसल्यास सर्वसाधारणपणे गोडाचे पदार्थ सर्वांनाच प्रिय असतात. इतर चवींपेक्षा गोड ही तुलनात्मकदृष्ट्या अधिक आवडीची चव आहे. त्यामुळे गोड बोलणे  म्हणजे ऐकणाऱ्यांना आवडेल आणि आनंद होईल असे बोलणे असे मानायला हरकत नाही.

गोड बोलणे म्हणजे निदान ऐकणारी व्यक्ती दुखावली जाणार नाही याची खबरदारी बोलणाऱ्याला घेणे आवश्यक आहे. स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक बोलण्यामुळे ऐकणारा नाराज होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे बोलायचे झाल्यास diplomacy and  tact वापरणे,  हा गोड बोलण्याचाच एक प्रकार आहे. गोड बोलण्याची ही  ढोबळ व्याख्या बघितल्यानंतर, आता आपण गोड का बोलतो आणि त्यामागे आपला काय उद्देश असतो ते पाहू या. 

गोड बोलण्याचे मुख्यत्वे दोन उद्देश असू शकतात. एक म्हणजे गोड बोलून आपण ऐकणाऱ्या व्यक्तीबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करू शकतो. चांगले संबंध ठेवण्याची इच्छा असणे हा एक स्वभाव वैशिष्ट्याचा भाग आहे. दुसरे काही साध्य करण्याचा अंत:स्थ हेतू त्यात नसतो. 

या विरुद्ध गोड बोलणे हे बरेचदा मतलबी असू शकते . मनापासून गोड बोलण्याची इच्छा नसताना केवळ आपलं काम करून घेण्यासाठी गोड बोलणारे अनेक लोक आपण नेहमी बघतो. अर्थात, ज्यांना गोड बोलण्याची सवय नसते त्यांचे कृत्रिम गोड बोलणे ओळखायला वेळ लागत नाही. 


HRM या क्षेत्रामध्ये वर उल्लेखलेल्या पहिल्या प्रकाराचे स्थान जास्त मोठे आहे. गेल्या सुमारे १०-१५ वर्षांमध्ये (Employee Engagement)  कर्मचाऱ्यांना वाटणारी समाधानाची भावना या विषयाला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.  मनापासून गोड बोलल्यामुळे कर्मचाऱ्यांचे समाधान जरूर वृद्धिंगत होऊ शकते. 


कर्मचाऱ्यांची  समाधानाची भावना अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यापैकी तीन गोष्टी खाली देत आहे. 


१. चांगले काम केल्याबद्दल प्रशंसा किंवा शाबासकी. (Appreciation) 
शाबासकी  एक जवळजवळ मूलभूत अशी गरज आहे. एखादे काम उत्तम प्रकारे केल्यानंतर जर वरिष्ठांकडून प्रशंसेचे चार गोड शब्द ऐकायला मिळाले तर कामात हुरूप येतो. अशा पद्धतीने गोड बोलणे ही  एक कला आहे . पण सर्व वरिष्ठ या कलेमध्ये पारंगत नसतात. कधी कधी तर काही वरिष्ठ शाबासकी देण्याबाबत अत्यंत कंजूष असतात. त्यांची अशी समजूत असते की प्रशंसा केल्यामुळे कर्मचाऱ्याच्या डोक्यात वारे शिरेल आणि त्याच्या अपेक्षाही वाढून बसतील. योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे शाबासकी कशी द्यावी  याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम अनेक कंपन्यांनी सुरू केला आहे. 


२. काम करताना झालेल्या चुका सुधारण्याची आणि श्रेष्ठ कामगिरी दाखविण्याची  संधी मिळणे. 
प्रशंसेइतकाच निगेटिव्ह फ़ीडबॅक महत्त्वाचा असतो. संशोधनातून आणि अनुभवातून सिद्ध झाले आहे कि एखाद्याला न दुखावता जर फ़ीडबॅक दिला गेला तर तो कितीतरी जास्त प्रमाणात परिणामकारक ठरतो.  चुका दाखवून देणे व त्या सुधारण्यासाठी मदत करणे हे कौशल्य सर्व वरिष्ठांनी (managers) अंगी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. 


३. नव्या पद्धतीने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळणे. 
गेली काही वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये अतिशय वेगाने बदल घडत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतः मध्ये बदल घडवून आणण्याची आणि सतत  सुधारणा करीत राहण्याची निकड निर्माण झाली आहे. एका बाजूला अशी निकड तर दुसऱ्या बाजूला बदलताना होणारा स्वाभाविक विरोध याची सांगड घालण्याचे आव्हान प्रत्येक वरिष्ठापुढे  असते. 


बदलण्याची सक्ती केली तर त्याचा काही उपयोग होत नाही. याउलट, गोड बोलून, बदलण्याचा फायदा काय हे जर नीट समजावून दिले गेले तर बदलाला असलेला विरोध हळूहळू कमी होत जातो व बदल मान्य करण्याची मनाची तयारीही होते.


गोड बोलणे हे कम्युनिकेशन स्किलचा एक भाग आहे. गोड बोलण्याच्या कलेत पारंगत होण्यासाठी केवळ चांगले बोलता येणे पुरेसे नाही. आपल्या बोलण्यामुळे ऐकणाऱ्याला  छान वाटावे आणि त्याचा मूड पॉझिटिव्ह व्हावा यासाठी बोलण्याखेरीज किमान दोन गोष्टी आवश्यक आहेत. 


१. संवेदनशीलता (sensitivity and empathy)- दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे हे त्याने न सांगता अचूकपणे जाणण्याची कला असायला हवी. ही जाणीव ठेवून जो बोलतो तो ऐकणाऱ्या व्यक्तीबरोबर भावनिक सुसंवाद (emotional connect) साधू शकतो.


२. दुसरी गोष्ट म्हणजे ऐकणे (Listening)- नीट लक्ष देऊन दुसऱ्याचे बोलणे जो ऐकतो तोच जास्त प्रभावीपणे गोड बोलू शकतो. त्याशिवाय  'नीट ऐकणे' हा बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करण्याचा एक प्रमुख मार्ग आहे. 


मनापासून गोड बोलणाऱ्या  व्यक्ती माणसे आणि संबंध जोडतात. याउलट कटु शब्द वापरल्यामुळे संबंध तुटतात. आपले जीवन दिवसेंदिवस यांत्रिक होत चालले आहे . हा बदल अपरिहार्य आहे आणि या परिस्थितीत सर्वांनाच तणावमुक्त राहण्यासाठी मनापासून गोड  बोलण्याची कला आत्मसात करणे फार गरजेचे आहे.  


--- सुभाष देवरे

No comments:

Post a Comment