देवीतत्त्व


दिवाळीतला मला खूप आवडणारा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन! खरं तर हा अमावस्येचा दिवस. पण दिवाळीच्या दिव्यांमुळे लखलखणारा! घरात, घराबाहेर प्रकाशाच्या साम्राज्यात आहोत असं वाटायला लावणारा! या लखलखत्या वातावरणात लक्ष्मी आपल्या घरी येते. घराला धान्याचे, धनाचे वरदान देते.आपण तिची पूजा करतो आणि पुढच्या वर्षासाठी सुख-संपत्तीचे वरदान मागतो. 

लहान असतानाही तिन्हीसांजेच्या आधी घर आवरून ठेवण्याची, केर काढून स्वच्छ करण्याची सवय होती. संध्याकाळी लक्ष्मी घराघरांत जाते आणि जे घर स्वच्छ, आवरलेले, प्रसन्न असते तिथे ती थांबते, अशी समजूत होती. माझा या गोष्टीवर मनापासून विश्वास होता. खरोखरच लक्ष्मी अदृश्यपणे येते असे मला वाटायचे.
लहानपण सरले आणि विज्ञानाच्या निकषांवर प्रत्येक गोष्ट तपासून पहायची सवय लागली. पण अजूनही संध्याकाळी घराची आवरासावर नकळत हातून होतेच. या देवीदेवतांचे असे हे आपल्या मनाशी नाते जोडलेले आहे.

महाराष्ट्रात महालक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती या आपण पुजतो. नवरात्रात लक्ष्मी आणि सरस्वती पुजतो. गौरी-गणपतीत पार्वतीचे लाडाकोडाने स्वागत करतो. या तिन्ही देवी ज्ञान, समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक मानल्या जातात. देवीची ही तिन्ही रूपे  स्वयंपूर्ण आहेत. कोणत्याही देवांशी त्या म्हटलं तर निगडीत आहेत, म्हटलं तर स्वतंत्र आहेत.

एक निरीक्षण म्हणून जाणवलेली गोष्ट अशी की, अनेक देवींची देवळेही स्वतंत्र आहेत. म्हणजे, महालक्ष्मी ही विष्णूची पत्नी, पण तिचे देऊळ कोल्हापुरात आहे. तिच्या पतीचे देऊळ तिरुपतीला आहे. त्याच्या दुसऱ्या पत्नीचे, पद्मावतीचे देऊळही पायथ्याशी आहे. कन्याकुमारी, अंबेजोगाई ही पार्वतीची मंदिरे आहेत. त्यांचे विवाह शंकराशी होणार होते, पण काही कारणाने ते झाले नाहीत. या स्थानाजवळच शंकराची देवळेही आहेत. तुळजाभवानीचे  मंदिरही फक्त तिचेच आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व भारतात हेच चित्र पहावयास मिळते. पंढरपूरला देवळाच्या आवारातच रखुमाईचे वेगळे छोटे देऊळ आहे. ती विठ्ठ्लासोबत उभी नाही. या गोष्टीचे मला आश्चर्य वाटले.

पुराणातून याबद्दल अनेक कथा आहेतच. पण स्वतःची शक्ती जपणारी, त्या शक्तीची जाणीव असणारी आणि त्या शक्तीचा मान राखणारी देवी मला खचितच जवळची वाटली. आज दिवाळीच्या वेळी म्हणूनच अंधाराकडून उजेडाकडे नेणारी, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारी, तुमच्या स्वतःतच संपत्ती कमावण्याची आणि राखण्याची शक्ती आहे , त्यावर विश्वास ठेवा असे सांगणारी ही देवी मला वंदनीय वाटते.


                                                                                                         --- स्नेहा केतकर

No comments:

Post a Comment