ऋणानुबंध

५ एप्रिल २०१८ या दिवशी घाटे काका अनंतात विलीन झाले आणि माझा बंगलोरमधील एक पितृतुल्य व्यक्तीशी ऋणानुबंध संपला. माझी आणि त्यांची ओळख आम्ही १९८७ साली इंदिरानगरला रहायला आलो तेव्हा झाली. घाटे काकू साताऱ्याच्या आणि मीही साताऱ्याची म्हणून आमची ओळख झाली. पण माझी मैत्री घंटेकाकांशी जास्त झाली. खरे तर ते जवळपास माझ्या वडिलांच्या वयाचे पण आमचे ऋणानुबंध मैत्रीचेच जास्त राहिले.

ते संगीतप्रेमी आणि मी कानसेन हा आमच्यामधील पहिला सामान धागा. त्यांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारल्यामुळे त्यांच्या आईने संगीताचे शिक्षण घेऊन, संगीत शिक्षिकेची नोकरी करून, त्यांना व त्यांच्या बहिणीला लहानाचे मोठे केले. त्यामुळे आपोआप घाटेकाकांना संगीताची आवड निर्माण झाली. त्यांनी एकदा त्यांच्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ पंडित संजीव अभ्यंकरांच्या गायनाचा कार्यक्रम सुरसिंगर तर्फे चौडाय्या हॉलमध्ये सर्वांसाठी मोफत आयोजित केला होता.

त्यांच्या विषयी मला कायमच आदर वाटायचा करम ते, मला प्रत्यक्षात भेटलेली पहिली व्यक्ती कि ज्यांनी खरोखरच रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करून शिक्षण घेतले व स्वतः च्या हुशारीवर इंजिनीरिंगची पदवी मिळवून भारतीय हवाई दलातून विंग कमांडर च्या हुद्द्यावरून रिटायर झाले व त्याचा त्यांना अभिमान होता. ते त्यांचे नाव नेहमी विंग कमांडर घाटे असे सांगायचे.

आमच्यातील दुसरा सामान धागा म्हणजे शेयर मार्केट मधील गुंतवणूक. १९९० मध्ये मी 'सिवन सेक्युरिटीज' मध्ये financial and equity research analyst म्हणून रुजू झाले. त्यामुळे माझा शेयर मार्केटशी संबंध आला व त्यांनी पहिल्यापासून शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक केली होती त्यामुळे त्या संबंधीहि ते माझ्याशी बोलायचे. त्यांची कुठल्या कुठल्या बँकेत खाती आहेत, कुठल्या बँकेत मुदत ठेवली आहेत हे सर्व मला सांगायचे. कारण त्यांना काळजी वाटायची कि त्यांचे काही बरे वाईट झाले तर घाटेकाकुंना यातली काहीच माहिती नाही.

आमच्यातील तिसरा धागा म्हणजे एकमेकांना मदत मागणे व मदत करणे. एक प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. १९९५ मध्ये माझ्या मुलीचे अँपेंडिक्स चे ऑपरेशन अचानक करावे लागले. ती त्यावेळी दहावीत असल्यामुळें लेप्रोस्कोपीने करायचे ठरले. त्यामुळे २४ तासात डिस्चार्ज मिळणार होता. मी घरातून निघतांना ऑपरेशन करावे लागेल हि कल्पना नसल्यामुळे फक्त डॉक्टरांकडं तपासायला नेण्यापुरतेच पैसे बरोबर घेतले होते. नेहमीप्रमाणे मिस्टर जोशी ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते. संध्याकाळी हॉस्पिटलची सर्व बिले भरल्याशिवाय डिस्चार्ज मिळणे शक्य नव्हते. त्यावेळी माझ्याकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हि नव्हते. मग मी घाटे काकांना आणि एक दोन मैत्रीणीना फोन केला. घाटे काका व माझी मैत्रीण शिल्पा चित्रे असे दोघेजण पैसे घेऊन हॉस्पिटल मध्ये आले व मी हॉस्पिटल चे बिल चुकते करून मुलीला घरी घेऊन येऊ शकले.

असे संगीतप्रेमी, स्पष्टवक्ते, रोज इकॉनॉमिक्स टाइम्स वाचणारे, मित्रमंडळाला मी मागितला कि देणगी चेक देणारे, रोज सकाळी फिरायला जाऊन आरोग्याची काळज़ी घेणारे, वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत ड्रायविंग करणारे, सर्वांना मदत करणारे, तत्वाचे पक्के घाटेकाका गेले २-३ वर्षे विस्मृतीच्या आजाराने त्रस्त होते. ते व घटकाकू दोघांना हि हा आजार झाल्यामुळे ते एकमेकांना पण ओळखू शकत नव्हते. त्यामुळे मला फार वाईट वाटायचे. त्यांच्या मृत्यूनेच त्यांची यातून सुटका केली.

त्यांना शतषा: प्रणाम.
-    मनोरमा जोशी




No comments:

Post a Comment