डॉ. प्रकाश बाबा आमटे - मानवंदना

दुःख उधळण्यास  आता आसवांना वेळ  नाही

घोर रात्री श्वापदांच्या  माजलेले रान होते
पांगळ्यांना पत्थरांचे ते खडे आव्हान होते
त्या तिथे वळणावरी पण एक वेगळा क्षण आला
एकटे एकत्र आले आणि हा जत्था निघाला
वेदनेच्या गर्द रानी गर्जलीं आनंद द्वाही
दुःख उधळण्यास  आता आसवांना वेळ नाही
(गर्वाचे गीत - बाबा आमटे)

१९७३ साली हेमलकशातील परिस्थिती वरील ओळींपेक्षा फार वेगळी नव्हती. पाणी, वीज, आरोग्यसेवा या  सारख्या मूलभूत गरजांपासून शेकडो कोस लांब असा गौड आदिवासींचा तो भारत होताप्रगतीपथावरील इंडिया शी कोणतेही नाते नसलेला! त्याला ओळख दिली ती डॉ प्रकाश आमटे यांच्या सर्जनशीलकार्याने. 'लोकबिरादरी प्रकल्प' आणि त्या माध्यमातून निघालेले शाळा, हॉस्पिटल, अनाथालय, प्राणी सेवालय ही त्याचीच रचनात्मक फलिते. हा प्रवास खचितच सोपा नव्हता.

'प्रकाशवाटा' या पुस्तकातून किंवा 'डॉ. प्रकाश  बाबा आमटे' या सिनेमातून आपण तो पहिला आहे.
डॉ. आमटे यांना आपण व्यक्ती म्हणून आपण जाणतोच. पण माझ्या मते ती केवळ एक व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती आहे. 'स्टेटस को' ला प्रश्न विचारणारी, आव्हान देणारी, असंतोषाला विधायक मार्गाचे अधिष्ठान  देणारी,  बदल घडवायचा असेल तर स्वतः पहिले पाऊल टाकणारी. प्रश्नावर तात्पुरती मलम पट्टी  करता सभोवतालच्या परिसरातून उत्तरे शोधणारी- sustainable ecosystem तयार करणारी.


डी. लिट. बद्दल डॉ. आमटेंचे मित्रमंडळ बंगळुरूतर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!



पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, मॅगेसेसे आणि आता डी. लिट. ही त्या प्रकाशवाटेवरची देखणी फुले. पण वाट अजून चालतोच आहे. त्या वाटेला अभिवादन करताना आपण ही आपला खारीचा का होईना पण वाटा उचलायला तयार व्हावे. वैयक्तिक प्रश्नांच्या थोडे पलीकडे बघावे आणि जमलेच तर थोडे अंतर्मुख व्हावे.

असे पुरस्कार या वाटेवर चालू इच्छिणाऱ्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतील. हजारो हात पुढे येतील आणि बाबा आमटेंचे स्वप्न  प्रत्यक्षात येईल. मग म्हणता येईल : दुःख उधळण्यास  आता आसवांना वेळ  नाही.

--  गांधार धाराशिवकर

No comments:

Post a Comment