दिवाळीचं अभ्यंगस्नान ही एक खास चीज आहे . भल्या पहाटे साजरा होणारा स्नानाचा सोहळा! इतर सणांनाही आपण स्नान वगेरे करून शुचिर्भूत होतोच, पण दिवाळी ती दिवाळीच! सर्वात प्रथम पणती लावायची ती देवासमोर. घरातलया आईने, आजीने मुलांना पाटा वर बसवायचं, उभं कुंकू रेखून तबक घेऊन ओवाळायचं, हळद-तेलाचा हात मुलांचया अंगाखांद्यावरून फिरवायचा न उटणं लावून कढत कढत पाण्यानी न्हाऊ घालायचं; अंगात नवीन ऊर्जा यायलाच हवी. ही न्हायलेली मंडळी नवीन कपडे लेवून आई-आजीसमोर नि इतर वडिलधाऱ्यांसमोर आशीर्वादासाठी वाकतात, तेव्हा कुठे हा सोहळा संपन्न होतो.
दुसऱ्या कुठल्याही देशात अशा प्रकारचा स्नानसोहळा अस्तित्वात असेल असं वाटत नाही, ज्यात नात्यांचं कौतुक आहे . एरवीच्या दिवशी व इतर सणावारांनाही "जा रे अंघोळीला" किंवा "आटपा रे लवकर लवकर" म्हणून फर्मान काढून मोकळी होणारी आई आज वेगळीच भासते.
गणपतीतही "आरतीच्या वेळेपर्यंत मुलं आंघोळ करून हजर झाली तरी खूप झालं" अशी समाधानी वृत्ती दाखवणारी आई आज मात्र वेगळीच वागते. आज तिला मुलांना भल्या पहाटे उठवून स्नानाचा सोहळा साजरा करायचा असतो. काळानुसार बदलून गेलेली, नवनवीन गोष्टींचा अंगीकार करून घेतलेली practical वागणारी आई आज मात्र काळ अंमळ मागे नेण्याच्या प्रयत्नात असते.
वर्षं मागे सरतात. मुलं मोठी होतात. वयाने, ज्ञानाने, हाडापेराने, आकाराने त्यांनी आपल्या आईला कधीच मागे टाकलेलं असतं. आईचा हा खटाटोप थोडासा अनावश्यक वाटत असतो. कशाला हे सोपस्कार? लहान आहोत का आम्ही आता? पण आईसाठी हा केवळ उपचार नसतो. आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांसाठी आवर्जून करायला हवी अशी खास गोष्ट असते ती.
पाटाच्या भोवती सुरेख वेलबुट्टीची रांगोळी काढून नि पाटाखाली स्वस्तिक चिन्ह काढून शुभकार्याचा प्रारंभ सूचित होतो. पाटावर बसलेली लेक ही जणू राजकन्याच नि मुलगा म्हणजे राजकुमार! कुंकू लावायचं ते ठसठशीत उभं, कारण ते सौभाग्याचं प्रतीक. आचारविचारांमध्ये समन्वय राहावा, भावना काबूत राहाव्यात नि कधीही मुलांनी भावनांच्या आहारी जाऊ नये ह्यासाठी कपाळावर मधोमध कुंकवाचं स्थान.
निरंजनातल्या फुलवतीचा प्रकाश मुलांच्या चेहऱ्यावर पाडून मुलांबरोबरच्या आपल्या नात्याला ती उजाळा देते . हातातलं तबक नि निरांजन ही तर केवळ औपचारिकता; खरं ओवाळणं डोळ्यांमध्यल्या दोन स्निग्ध ज्योतींचं. पन्नाशीला आलेल्या मुलाच्याही हृदयाला आरपार भिडणारं! मग लहानग्यांची काय कथा?
सात्विक प्रकाशाने आपल्या मुलांचं आयुष्य उजळून निघावं, वाईट वासना जळून जाव्यात, दिव्यातल्या वातीप्रमाणे अहंकाराने जळून जावं नि पायरी पायरीने त्यांचा उत्कर्ष व्हावा ही आस मनात ठेऊन केलेली ही क्रिया.
मग उचलायची सोन्याची अंगठी! सोनं हे वैभवाचं प्रतीक! मुलांचं आयुष्य वैभवात जावं, त्यांना कशाचीही कमतरता भासू नये ही कामना मनात ठेऊन आई मुलांना अंगठीने ओवाळते. त्यातून नकळत आशीर्वाद दिला जातो समृद्धीचा! थोर व्हा, यशस्वी व्हा, लक्ष्मी आपोआपच प्रसन्न होईल! मुलं कर्तबगार निघावीत ही तिची प्रामाणिक इच्छा!
ह्यानंतर सुपारी. सुपारी म्हटली की ती कडकच असणार. कडक म्हणजे ताकदवान. सहजासहजी न फुटणारी, कणखर, तसंच आयुष्य मुलांना मिळावं. लांब आयुष्याच्या वरदानासाठी सुपारीची योजना. ह्यानंतर येतो कापूस . पांढरा कापूस हा पांढऱ्या केसांचं प्रतीक. इवलासा कापूस मुलाच्या डोक्यावर ठेऊन आई म्हणते कापसासारखा म्हातारा हो! म्हणजेच औक्षवंत हो! दीर्घ आयुष्याचा संबंध उत्तम आरोग्याशी. निरोगी राहून मुलांनी आयुष्याचा आनंद लुटावा, कारण निकोप शरीर सर्व सुखांची गुरुकिल्लीच! मुलांच्या दीर्घ आयुरारोग्याचा आशीर्वाद ती ह्या कृतीतून देते. थोड्याशा अक्षता डोक्यावर टाकल्या जातात, देवाचाही आशीर्वाद, त्या जगन्नियंत्याची कृपा सदासर्वकाळ मुलांवर राहावी ह्यासाठी.
हळद तेलाने भरलेली वाटी हातात घेऊन आई मुलाला जणू सांगते, मी तुझी माय पण तुझ्या-माझ्यात द्वैत नाही .तुझ्यासाठी केव्हाही उभी नि केवळ सद्भावनाच जपणारी! हळदीचा संबंध शुद्धतेशी! हळद तेलाच्या मालिशने छोट्या मोठ्या जखमा शुद्ध राहतील, कांतिमान होशील, तेजस्वी होशील. मर्दनाने स्नायूंना बळकटी येईल . त्यात रक्ताभिसरण होऊन ते थेट तुझ्या काळजापर्यंत पोचेल. मन शुद्ध होईल नि मनाच्या जखमांवर हळुवार फुंकर बसेल.
मग रवानगी न्हाणीघरात. तिथे टॉवेल, पंचा, उटण्याची वाटी, बसायला पाट नि बादलीत कढत कढत पाणी तयार. मुलं लहान असताना त्यांच्या अंघोळीची तयारी आईच करून ठेवत असते. आजही तिने नेमकं तेच केलेलं असतं. आज तिच्याबरोबर तिची मुलंही त्या पूर्वीच्या विश्वात परत जातात. सुगंधी उटण्याचं मर्दन करून ऊन ऊन पाण्याने आईने घातलेली अंघोळ ह्यापरतं सुखावह ते काय? हे पाणी कधीही संपू नये असं वाटलं नाही तर तो माणूसच नव्हे. नवचैतन्य सळसळून उठायलाच हवं.
मुलं हे तिचं वैभव नि तिचा दागिना! त्यांना न्याहाळण्याचा, आंजारण्यागोंजारण्याचा तिचा प्रेमाचा हक्क. तो तिला मिळायलाच हवा. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर ही सर्व क्रिया म्हणजे अफलातून स्ट्रेस बस्टर. आईसाठी नि मुलांसाठीही. जगातल्या कुठल्याही स्पामध्ये कितीही पैसे मोजले तरी हा अनुभव मिळणार नाही हे नक्की.
No comments:
Post a Comment