दवंडी


१९८० च्या मे महिन्याचा एका रणरणत्या दुपारी इन्स्पेक्टर सुरेश देशमुख बाजीराव रोडवर फिरत होता. त्याला समोरून येणार एक इसम ओळखीचा वाटला.

"कोण? किशोर गुप्ते?

"क्या बात है सुरेश देशमुख, इथे कुठे?" किशोर आनंदाने म्हणाला. 

किशोर आणि सुरेश बालमित्र होते. कोल्हापूरला एकाच शाळेत आणि कॉलेजात शिकलेले, पण नंतर पुष्कळ वर्षांत काही संपर्क नव्हता. 

"चल रे, कुठे तरी बसून चहा ढोसू." सुरेश म्हणाला.

दोघं जवळ असणाऱ्या साधारण हॉटेलात चहा आणि मिसळ खात जुन्या आठवणी काढत बसले. हॉटेलात विशेष गर्दी नसल्याने जोरदार गप्पा चालल्या होत्या. 

"बरं, तू पुण्यातच असतोस का? आणि काम काय करतोस?" काही वेळाने किशोरने विचारलं. 

"मी पोलीस खात्यात आहे." 

"अरे म्हणजे तो पोलीस खात्यातला प्रसिद्ध, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि हुशार इन्स्पेक्टर सुरेश देशमुख म्हणजे आमचा बालमित्र का? वा!! बाकी तुझी लक्षणं लहानपणापासून तशीच होती. तेव्हापासूनच तू शिस्तबद्ध होतास."

"ते जाऊ दे रे, तू काय करतोस? कुठे असतोस

"मी साताऱ्याला बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे, पुण्याला पुष्कळ वेळा येणंजाणं होतं असतं."

"मग मला हे सांग की मागच्या आठवड्यात डेक्कनजवळच्या बंगल्यात तू त्या बाईचा खून का केलास?" 

हे ऐकून किशोर तीनताड उडाला. पण लगेच सावरला आणि चेहऱ्यावर मिस्कील स्मित करत म्हणाला, "ती सरळ तिजोरीची किल्ली मला देईना म्हणून नाइलाजाने तिला मारावं लागलं. पण मानलं तुला, उगीच नाही तुला हुशार ऑफिसर म्हणत पोलीस खात्यात. तुला कसं कळलं की हा खून मीच केला आहे?" 

"तुला आठवतं, ५ वर्षांपूर्वी आपण भेटलो होतो तेव्हा मी तुला मारुतीचं चित्र असलेला ताईत दिला होता, त्याच्या पाठीमागे माझं नावसुद्धा कोरलं होतं. मला तो मारुतीचं चित्र असलेला ताईत त्या बाईच्या बिछान्याखाली सापडला."

"अरे त्याचा धागा सैल झालाच होता. ते नेमकं तेव्हाच पडलं असेल. मीसुद्धा थोडा हलगर्जीपणा करायला लागतो आहे, पुढच्या वेळेस सावधगिरी बाळगली पाहिजे." किशोर आपल्या खिशात हात घालत उर्मटपणाने म्हणाला. 

"चलाखी दाखवायची काही गरज नाही." सुरेश पिस्तूल रोखून उभा राहिला. "माझ्या बरोबर मुकाट्याने चौकीत चल." 

"सुरेश शांत हो. माझ्याजवळ कुठलंही हत्यार नाही आणि मी माझ्या इतक्या जुन्या आणि जिवलग मित्राला इजा करणार नाही. आणि मला तशी गरजही लागणार नाही." किशोर निर्लज्जपणाने हसत हसत बोलला. 

"मैत्री गेली खड्यात! अरे त्या म्हाताऱ्या बाईचा तू खून केला आहेस, अशा माणसाचा मी कधीही मित्र होऊ शकत नाही, सरळ चौकीत चल." 

"सुरेश, तू मला अटक करूच शकत नाहीस. आठवतं, तुझ्या वडिलांचं घर गहाण होतं, रस्त्यावर आला असता तुम्ही. तेव्हा तू माझ्याकडे आला होतास आणि मी काही न विचारता तुला २५ हजार रुपये दिले होते. आजपर्यंत मी तुला त्याबद्दल काही विचारलंही नाही. मी तेव्हा पैसे नसते दिले तर तू शिकू शकला असतास? इथपर्यंत पोहोचला असतात? हां, पण तुझ्याजागी मी असतो तर मी सगळं विसरून अपराध्याला अटक केली असती. पण तू काही मी नव्हे. तू तत्त्व पाळणारा निष्ठावान पुरुष आहेस. मला माझे २५ हजार परत न करता जर तू अटक केलीस तर तुझ्या जिवाला नेहमीची रुखरुख राहणार. तुझ्या मनावरचं हे ओझं कधीही हलकं होणार नाही. आणि ज्या अर्थी तू प्रामाणिक ऑफिसर आहे त्या अर्थी तुझ्याकडे एवढे पैसे असणे शक्य नाही. किती मिळतात रे तुला महिन्याचे? आठशे? हा हा हा हा!" किशोर अगदी सहजपणे म्हणाला. 

सुरेशच्या हातातलं पिस्तूल गळून पडलं. किशोरने सांगितलेलं सगळंच खरं होतं. आणि सुरेश मनातल्या मनात जळफळण्याशिवाय काहीही करू शकत नव्हता. शिवाय एका गुन्हेगाराला अटक न करता पळून जायची संधी दिल्याबद्दल तो पोलीस खातं सोडण्याचाही विचार करायला लागला होता. 

"कमआॅन सुरेश, अरे जाऊ दे. इतका विचार नको करू. आजचा दिवस तू पोलीस इन्स्पेक्टर नाही असं समज. उद्या मी पुण्याहून हलणार आहे, मग आपली बहुतेक कधीच भेट होणार नाही. म्हणून आजचा दिवस आपण एन्जॉय करू. मी त्या बाईचा खून केला हे विसरून जा आणि उद्यापासून परत आपल्या कामाला लाग. तुला त्रास द्यायची माझी पण इच्छा नाही."

हॉटेलात थोडेफार गिऱ्हाईक "खून" "पोलीस" हे शब्द ऐकून त्यांच्या कडे पाहायला लागले होते. 

"किशोर, तुला भीती वाटत नाही? इथे इतके लोकं आहेत, कोणी पोलिसांकडे किंवा प्रेसकडे गेलं तर?

"हाहाहा! पोलीस तर माझ्यासमोरच बसला आहे आणि प्रेस, वर्तमानपत्र? ते महामूर्ख लोकं आहेत. त्यांना फक्त काही तरी थ्रिलिंग हवं असतं, अक्कल काडीचीसुद्धा नसते. कोणी दुय्यम दर्जाचे खुनाच्या कादंबऱ्या लिहिणारे लेखक असल्या खरमरीत बातम्या लिहितात, त्यात कल्पना जास्त आणि तथ्य कमी असतं." 

"नाही, पण सगळीच वर्तमानपत्रं तशी नसतात. पुणे हेराल्डर नावाचं दैनिक घे. त्यात पुष्कळ प्रामाणिक आणि हुशार लोकं आहेत. मी स्वतः त्यांच्याबरोबर काही केसेसमध्ये काम केलं आहे. मला त्यांची पुष्कळ मदतही झाली आहे."

"पुणे हेराल्डर होय!! तेच ना जे या खुनाच्या तपासाबद्द्ल रोज काही ना काही लिहीताहेत?" किशोरच्या चेहऱ्यावर आता विजयाचा अहंकार दिसत होता. "चल तुला मजा दाखवतो."
असं म्हणत किशोर सुरेशला घेऊन हॉटेलच्या काउंटरपाशी आला आणि काउंटरवरच्या माणसाला म्हणाला,
"फोन करण्याचे किती पैसे?"
"१ रुपया."
"मी ५ रुपये देईन, पण मला काही खाजगी बोलायचं आहे, तुम्ही थोडं बाहेर थांबा."

काउंटरवरच्या माणसानी गल्ल्याला कुलूप लावलं आणि विडी शिलगवत थोडं लांब गेला.

"तुला माहिती आहे पुणे हेराल्डचा नंबर?" किशोरने विचारले. सुरेशकडे नंबर होता. किशोर ने तो फिरवला आणि बोलायला लागला.

"कोण बोलतं आहे?... उप-संपादक? संपादकांना फोन दे... मी कोण? तुझा बाप. ...हां संपादक साहेब, नमस्कार! तुम्हाला त्या डेक्कनवरच्या बंगल्यात झालेल्या खुनाबद्दल माहिती द्यायची होती. त्याचं असं आहे कि तो खून मीच केला आहे. हाहाहाहा... तुम्हाला काय वाटतं, मी खरं बोलतो आहे की उगाच थट्टा करतो आहे? थट्टा? हाहाहाहा... बरं तर ऐका.  त्या बाईने त्या दिवशी जो गाउन घातला होता त्याच तिसरं बटण तुटलेलं आहे... तुम्ही विचारा पोलिसांना... माझं नाव? हाहाहाहा... अहो मी एक कोवळा तरुण आहे आणि माझं नाव मला गुप्त ठेवायचं आहे... हाहाहा... बरं, लावा तुम्ही तपास... "

असं म्हणत किशोरने फोन ठेवला.
"बघितलास हा महामूर्ख? त्याने फोनवर हात ठेऊन हळूच कोणाला तरी सांगितलं की फोन ट्रेस कर. त्याला मी माझं नाव पण सांगितलं, "तरुण" म्हणजे किशोर आणि नाव गुप्त आहे म्हणजे गुप्ते. तुला काय वाटतं की तो यावरून काही करू शकतो? हाहाहा!"

नंतर बिल येईपर्यंत किशोर आपल्या पराक्रमाच्या कथा सांगत होता. सुरेश चेहरा पाडून सगळं ऐकत होता. बिलाचे पैसे किशोरनेच दिले. दोघे हॉटेलच्या बाहेर पडत होते तेव्हा किशोरला परत काही तरी सुचलं.
"अरे त्या संपादकाची बोबडीच वळली रे! हाहाहा. चल परत त्याच्याशी बोलतो." असं म्हणत किशोर परत काउंटरवर गेला. काउंटरपाशी कोणी नव्हतं. त्याने लगेच पुणे हेराल्डरचा नंबर फिरवला.
"हां, संपादक साहेब... कसे आहात? हो हो, मी तोच तरुण. काय कळलं का, मी कोण आहे ते... हो हो, मी पुण्यातच आहे. माझा तपास लावू शकता?... हो? ... हाहाहा? अहो तुम्ही सिनेमाचे रिव्यू लिहा, कारण तुम्हाला तेवढीच अक्कल आहे. हाहाहाहाहा. पकडून दाखवा मला... आणि हां, तुम्ही सच्चे खिलाडी असाल तर उद्याच्या पेपरमध्ये माझ्या फोनबद्दल जरूर लिहा बरं... चला ठेवतो." असं म्हणत किशोरने फोन जवळ ५ ची नोट ठेवली. सुरेशला ते बघून आश्चर्य वाटलं.

"अरे, मला काय चोर लुच्चा समजला का, फोनचे पैसे न देता जायला? हाहाहाहाहा."

नंतर सगळी संध्याकाळ सुरेश आणि किशोर बरोबरच होते. किशोर सुरेशला महागड्या हॉटेलात घेऊन गेला, जिथे तो उतरला होता. तिथे कॅबरे, उच्च मद्य आणि आलिशान जेवणाची मेजवानी दिली. रात्र फार झाली होती, म्हणून किशोरने सुरेशची झोपायची सोय आपल्या खोलीतच करून घेतली. सुरेश मनाने पूर्णपणे हरला होता. त्याचं लक्ष कशातही नव्हतं.
"काही तरी तर मार्ग असेल.... खुनी माझ्या नाकावर टिच्चून माझ्या डोळ्यासमोर हसत हसत वावरतो आहे आणि मी काहीच करू शकत नाही." सुरेश पूर्ण रात्र याच विचारात जागाच होता.

सकाळ झाली. दिवस उजाडायला लागला. पेपरवाले, दूधवाले, भाजीवाले सगळ्यांच्या आवाजाने पुणे शहर हळू हळू जागं होत होतं. पुणे हेराल्डरचा अंक किशोरच्या खोलीच्या दारात पडला. किशोर झोपलाच होता. सुरेशने पेपर उचलला, तोच त्याच्या चेहऱ्यावर कालपासून हरवलेली स्मिताची रेषा प्रकट झाली.

"काय झालं रे, काय म्हणतं आहे तुझं पुणे हेराल्ड?" किशोरने बिछान्यातूनच विचारलं.

"तूच वाच." पेपर किशोरच्या अंगावर भिरकावत सुरेश म्हणाला.

ठळक मथळा होता-

"डेक्कनवरच्या खुनाचा गुन्हेगार पुण्यातच... त्याचा सुगावा देणाऱ्याला २५०००/- रुपये इनाम, पुणे हेराल्डर कडून."
किशोरने वर बघितलं सुरेश हातात पिस्तूल घेऊन उभा होता.

(ओ हेनरीच्या “clarion call” वर आधारित)

                             सचिन गोडबोले 



No comments:

Post a Comment