झाडली घरे घेऊन झाडू
भाजली पीठे वळण्या लाडू
घेऊन सोऱ्या चकल्या पाडू
आली दिवाळी
रांगोळी अंगणात काढू
प्रभातस्नाने कलुषित सोडू
फराळ फक्कड नंतर झोडू
आली दिवाळी
भोजन हलके उदरी सोडू
वामकुक्षी मग अमंळ काढू
नववस्त्रांची सन्दुक काढू
आली दिवाळी
रांग दिव्याची दारी मांडू
कंदील नाजूक त्यावर बांधू
छान फटाके कईक फोडू
आली दिवाळी
अंधारा यमसदनी धाडू
दुर्दैवाचे पहाड तोडू
प्रकाशासावे संगत जोडू
आली दिवाळी
-- श्री. आनंद गोगटे
No comments:
Post a Comment