कविता- चंद्रकोर भाळीची...


आभाळीची चंद्रकोर 
भाळीची झाली
सौभाग्याच्या लेण्यांनी
भरली झोळी


काकणांची किणकीण
रूणझुणती पैंजणं
रेशमी वस्राचं सळसळणं
पुष्पगंधांचं हासणं

आशीर्वादाने डोंगर
चढता चढता
कंबर वाकली
नमस्कार करता करता

भरल्या मंडपी
रंगलेल्या पंक्ती
उखाण्याच्या ठेक्यावर
जिलब्यांची सक्ती

संपली भातुकली
माहेरची स्वप्नकळी
उंबरठ्यावर फुलली
सून साजिरी गोजिरी

लवंडून माप
सुख लुटले अमाप
भरे दोन्ही घरात
कौतुक आपोआप

चंद्रकोर  भाळीची, आभाळाची झाली ! 

-- मंगलाताई देशपांडे

No comments:

Post a Comment