इस मोड से जाते हैं



इस मोड से जाते हैं
इस मोड से जाते हैं,  कुछ सुस्त कदम रस्ते,
कुछ तेज कदम राहें...

गुलझार यांनी लिहिलेले हे गाणे! १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आंधी' सिनेमातील. खूप गाजलेला सिनेमा. त्यातील आशयासाठी, अभिनयासाठी आणि गाण्यांसाठीसुद्धा! हे गाणे मी अनेकदा ऐकलेय आणि पाहिलेय. अप्रतिम संगीत, आणि तितकेच सुंदर चित्रीकरण. संजीवकुमारच्या चाहत्यांना  त्याचा उमदा, खट्याळ चेहरा मोहवून जातो.
पण कधी कधी अनेकदा ऐकलेली गाणी खूप वर्षांनी उमजतात आपल्याला. आज सहज हे गाणे डोळे मिटून ऐकत होते आणि गुलझार यांच्या शायरीच्या परत प्रेमात पडले. या संपूर्ण गाण्यात रस्त्यांचे वर्णन केले आहे. कसे आहेत हे रस्ते?

          कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें...

वळण घेऊन येणारे हे कधी रस्ते असतात तर कधी राहें. प्रासादतुल्य घरे असोत, देखणी घरकुले असोत किंवा छोटे घरटे असो!  यांच्याकडे आपल्याला हे रस्तेच तर घेऊन जातात ना?

एखादा रस्ता वादळातून पार करावा असा, तर एखादा हळूच नजरेच्या टप्प्यात येऊन मनाला मोहवून जाणारा.

कधी रस्ता दुरून दिसतोय, जवळ येतोय असे वाटते, पण अचानक दिशा बदलून तो वळतो. एखादा रस्ता एकदम निर्मनुष्य. ज्याच्यावर जीवनाच्या, जगण्याच्या काहीच खुणा नाहीत असा. हा रस्ता कुठे जातोय, कुठून येतोय हेच कळत नाही.
वाट कशाही असल्या, मोठ्या, छोट्या, उंच-सखल, रुंद-अरुंद, कधी जिवंत, कधी आल्हाददायक, कधी मृतवत, कधी त्रासदायक, तरीही यापैकी मला तुझ्यापर्यंत घेऊन जाणारी एखादी वाट असेलच ना?

गाण्याचा अर्थ मनाला अगदी भिडला. आयुष्य जगण्याची खरी मजा आहे, जर आपल्यावर प्रेम करणारे कुणी असेल. कुठॆतरी, एखाद्या छोट्या घरकुलात वाट पाहणारे कुणी असेल.

तरुण असताना, जसे आपण बेभान होऊन चालत असतो, काहीतरी मिळवण्यासाठी, काही जिंकण्यासाठी. पण असे करताना, प्रत्येकानेच या प्रेमाच्या रस्त्याचाही शोध घेत राहायला हवा. खरे ना?

          इक राह तो वो होगी,
          तुम तक जो पहुचती है...  इस मोड से जाते है...



स्नेहा केतकर






No comments:

Post a Comment