लेख स्पर्धा परीक्षकाचे मनोगत

बंगलोरच्या मित्रमंडळाने लेखन स्पर्धेच्या गुणांकनाकरता विचारले तेव्हा
आपण इतके विविध विषयांवर लिहिलेले प्रांजळ विचार वाचणार आहोत याचा मला
अंदाज नव्हता. पण सर्व लेख वाचून मराठी मनाच्या आजच्या मानसिक
स्थित्यंतराचा, प्रश्नांचा आणि त्यावर उत्तरे शोधण्याच्या प्रामाणिक
प्रयत्नांचा एक परीघ माझ्यासमोर आला. गुणांकन करताना लेखनविषय, भाषा,
सुसूत्रता या गोष्टी लेख वाचकांपर्यंत पोहोचण्याकरता महत्त्वाच्या असतात
हे निकष मनात होते. एखादा विचार मांडताना नाविन्य असेल तर ते वाचकाचे मन
जास्त गुंतवून ठेवते असे मला वाटते. त्या नाविन्याला धरून विषयाची मांडणी
योग्य असेल तर लेखन अधिक समृद्ध होते. व्यावसायिक लेखक नसताना असे
नाविन्य आणणे सहजशक्य नाही याची मला जाणीव आहे. पण नाविन्य नसेल तर मात्र
जे काही मांडतो आहोत ते जास्तीत जास्त सुसूत्रपणे, नेमके मांडण्याची
जबाबदारी अधिक वाढते.

हे सर्व विचारात घेऊन मी लेख वाचले. स्पर्धेतला एक लेख सर्वच निकषांवर
सुरुवातीपासून आघाडीवर होता आणि तोच या स्पर्धेचा विजेता आहे.
काही लेख सुरुवात उत्तम असूनही पुढील मांडणीमध्ये या निकषांपासून दूर
गेले हे मुद्दाम सांगावेसे वाटते. त्यामुळे अधिक दर्जेदार वाचनाची संधी
हुकली याचे वाईट वाटलेएखादे प्रोजेक्ट फेल जाते, एखादा पदार्थ फसतो,
एखादा सामना आपण हरतो; पण हारजीत यापेक्षा सहभाग महत्त्वाचा. सातत्याने ते
करत राहणे महत्त्वाचे. कालांतराने त्यात सफाई येते.

गुणांकन बाजूला ठेऊन लिहिण्याला प्रोत्साहन देणे हा प्रमुख मुद्दा आहे.
त्याकडे आपण लक्ष केंद्रित करू. वाचत राहा, विविध प्रकारे, वेगवेगळ्या
माध्यमातून व्यक्त होत राहा, हेच म्हणेन.

सर्वांचे मन:पूर्वक आभार!

- सोनाली जोशी


No comments:

Post a Comment