फांदीला कळले नाही,
कोण तिला डोलावून गेले,
इवले पंख फडफडले
कोण हळूच उडून गेले
कळीला जाग आली,
कोण हलके गाऊन गेलं?
पाकळी पाकळी उमलली,
कोण असं स्पर्शून गेलं?
फांदीचे डोलणे असे,
फुलांचे फुलणे असे
रानांत रमले मन कसे
नादावलेले पक्षी जसे
एक छटा हलकीशी,
मंद हसत वर आली
आभाळाची निळी जाग
पाखरं बनून किलबिलून गेली
रंग रंग पसरले,
आभाळभर विखुरले,
सोन्याची किनार त्यात
कोण मस्त रेखून गेले
मांगल्याचे दोन थेंब ,
कोण त्यात शिंपून गेले ?
---- अलका देशपांडे
No comments:
Post a Comment