!!! जय महाराष्ट्र !!!


महाराष्ट्रीय मी मला "मी मराठी" चा गर्व आहे,
आमच्या महाराष्ट्राकडे छत्रपती शिवराय व पेशव्यांसारखे महान पर्व आहे.
समर्थ रामदास, ज्ञानेश्वर, तुकाराम अशा कैक महासंतांची ही पुण्यभूमी,
एकाहूनी एक घडवले या भूमीने थोर असे असामी.. ||||

टिळक, सावरकर, वासुदेव बळवंत फडक्यांचा लाभला आम्हांस वारसा पवित्र,
ह्या महात्म्यांनी बदलून टाकले आपल्या हिंदुस्थानाचे दुर्दैवी पारतंत्री चित्र.
सामाजिक सुधारणांचे ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ही जाणले महत्व,
त्या आगरकर आंबेडकरांनी अर्पून टाकले समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले सर्वस्व.. ||||

राजकारणी जसे थोर मिळाले तसेच लाभले आम्हांस महान समाजकारणी,
विख्यात आहे "बाबा आमटे, शाहू, फुले, रानडे" ह्यांच्या योगदानाची कहाणी.
आमच्या अहिल्याबाई, रमाबाईंपासून थेट अगदी सिंधुताईपण इथल्या,
स्त्रियांचे अस्तित्व व अस्मितेसाठी त्या वेळोवेळी झटल्या.. ||||

कला, क्रीडा, साहित्यामध्ये देखील इथे महंतांचा सुकाळ,
केशवसुत, कुसुमाग्रज, ग.दि.मा. जणू रत्नमण्यांची माळ.
कंबरेखालच्या विनोदांनी कंबरेवरचे पोट धरायला लावून हसवणारे आपलेच अत्रे,
आपल्या दादासाहेब फाळक्यांनी दाखवली सर्वप्रथम जगाला चलच्चित्रे.. ||||

महाराष्टानेच दिले आम्हांस पु.लं. नावाचे चिरंतन व्यक्तित्व,
बाळकराम रुपी गडकरीदेखील आमच्या महाराष्ट्राचेच व्यक्तिमत्व.
सुधीर फडके, ह्रीदयनाथ हे सुद्धा महाराष्ट्राचेच देणे,
कोणी विसरू शकेल का कधी गानसम्राज्ञी लतादीदीचे गाणे.. ||||

सुनील आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या महाराष्ट्राचाच सचिन,
महाराष्ट्रच सतत पुरवत आलाय हिंदुस्थानाला रन मशीन.
अवघ्या विश्वाला मोहिनी घालणारी आपली महाराष्ट्रीय माधुरी,
दिलीप प्रभावळकर, नाना पाटेकर शिवाय फिल्मी दुनिया राहते अधुरी.. ||||

जागतिक पातळीवर नावाजलेले माशेलकर, काकोडकर हे महाराष्ट्राचे शास्त्रज्ञ,
व्यवसाय क्षेत्रातील किर्लोस्कर, केसकर हे इथलेच नावाजलेले तज्ञ.
भारताचे पहिले अर्थमंत्री सी.डी.देशमुख इथले,
प्रसिद्ध अर्थतज्ञ आपलेच गोपाळ कृष्ण गोखले.. ||||

हर एक क्षेत्र व्यापून टाकेल इतकी आमच्या महाराष्ट्राची व्याप्ती,
म्हणूनच जीवे भावे करतो ह्या महाराष्ट्राची भक्ती.
महाराष्ट्र दिनी आजच्या प्रतिज्ञा करू आपण सर्व,
महाराष्ट्रीय आपण बाळगू "मी मराठी" चा सार्थ गर्व.. ||||


-मोहित केळकर




No comments:

Post a Comment