माझी माऊली मराठी

मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज, यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी २७ फेब्रुवारी या दिवशी जगभरातले मराठी भाषिक लोक मराठी भाषा दिवससाजरा करतात. त्या निमित्ताने...

अव्यक्त अस्फुट अमूर्त 
असं माझं सगळं काही
शब्दरूपात साकारणारी
माझी माऊली मराठी

माझ्या हृदयातील हुंकाराला
नादमधुर ध्वनिरूप देणारी
माझी माऊली मराठी

कुशीत शिरता जिच्या
माझ्या सुखदु:खाला 
गवसते त्यांची वाट 
माझी माऊली मराठी

अंगाईने जोजवणारी
भूपाळीने जागवणारी
माझी माऊली मराठी

ज्ञानेशाच्या ओवीतून
तुकयाच्या अभंगातून
भक्तिरूपाने बरसणारी
माझी माऊली मराठी

वेदनेची एक शिरशिरी
आणि ओठी येते फक्त
अग आई ग...’ 
बाळ लागलं तर नाही ना?’
म्हणते ती माझी माऊली मराठी

-- अलका देशपांडे




No comments:

Post a Comment