"कल्ये बुध्यति मम जननी...” हि सरल
संस्कृत मधील मनोज्ञ गीतरचना. पहाटे
लवकर उठणे (कल्ये बुध्यति।), मुलांना
न्हाऊ - माखु घालणे (उष्ण जलेन
प्लावयति।), स्वयंपाक करून
त्यांना जेऊ घालणे (पात्रे भोजनं आनयति।, अन्नग्रासं वदने स्थापयति।), मुलांशी खेळणे, गोष्टी
सांगणे (कथां श्रावयति।) इत्यादी.. अश्या आईच्या दैनंदिन
कामांचे छोट्या मुलीने केलेले वर्णन हा खर तर या गीताचा सरळ शाब्दिक अर्थ.
पहिल्यांदा ऐकतानाच सोप्या
भाषेने, समर्पक संगीताने
मनाचा ठाव घेतला होता.
नंतर पुन्हा पुन्हा हे गीत ऐकताना वरील वाच्यार्थापलीकडील काहीतरी
जाणवले. एक अल्लड, खेळकर, उत्साही छोटुकली
शहरी गजबजाटापासून दूर निसर्गसान्निसध्यातील तिचं चिमुकलं विश्व, तिचं आणि आईचं घट्ट नातं, आईशिवाय निराळं
जगचं माहित नसलेली ती अचानक जेव्हा मातृसुखाला पारखी होते तेव्हा प्रथम गोंधळते.
"का माझ्या आईला बोलावलंस?”
म्हणून देवबाप्पाशी
भांडते सुद्धा. भूतकाळातील
आईच्या सुखद आठवणीत रमते. वास्तवाचं
भान आल्यावर क्षणिक शोकाकुल होते.
पण आईची शिकवण आचरण्यात आणण्याच्या निश्चयाने पुन्हा उभी राहते. अशी कथा आकारास आली.
कल्ये
बुध्यति मम जननी।
पश्च्यात् माम् अपि
बोधयति॥
(आई स्वतः
पहाटे उठते आणि नंतर मलाही उठवते.) ह्यात "लवकर
निजे लवकर उठे त्यासी आरोग्य धन संपत्ती भेटे" हा
संस्कार आहेच.
मात्र त्यापेक्षा हि, अनेक अनुभवांनी परिपक्व झालेली प्रौढवयीन आई लेकीला तिच्या आयुष्यातील प्रभातकाली (बालपणीच) सुसंस्कारांचा, सद्विचारांचा बोध करून
देत आहे.
शारीरिक सौंदर्यापेक्षाही वैचारिक
सौंदर्य, बौद्धिक प्रगल्भता, भावनिक कणखरतेचे
बाळकडू देत आहे. काळाची पाऊले
ओळखून लेकीने नवे तंत्रज्ञान आत्मसात करून प्रगतीची कास धरावी यासाठी प्रयत्नशील आहे
असा अधिक खोल अर्थ जाणवला.
आत्ता ह्या क्षणी हे सारं
आठवण्याच कारण म्हणजे आपला "कट्टा
संकल्प विशेषांक." 'कल्प्= कल्पना, स्वप्नं (दिवास्वप्न म्हटलं तर वावगं
ठरू नये.) पण सम्+कल्प्
= संकल्प' उपसर्ग आणि धातूचा मिलाफ
कल्पनेला तनामनाच्या एकाग्रतेचे अधिष्ठान देतो. ह्या अधिष्ठानाला अथक प्रयत्नांची साथ लाभली तर कल्पना नक्कीच सत्यात
उतरते, स्वप्ने पूर्ण
होतात.
डिसेंबर
महिन्याची सुरवात घेऊन येते
नवसंकल्पाची
उत्साही लाट
बरेचसे
अपूर्णच राहतात मात्र
काहींनाच
गवसते किनाऱ्याची वाट
चला तर मग ह्या चिमुकलीच्या
जिद्दीला सलाम करत तिच्या साथीने आपणही आपल्या संकल्पांना कृतीत आणण्याचा निश्चय
करूया.
जे जाणवलं, मनापासून भावलं ते
तुम्हा रसिकांपर्यंत नृत्यातून पोहोचवण्याचा हा प्रयत्न.
No comments:
Post a Comment