नकोस भावना पुसू...

काळ किती झपाट्यानं बदलतोय... आयुष्य किती वेगवान झालंय आजकाल. घड्याळ तर सतत कसली ना कसली वेळ झाल्याची आठवण द्यायला टपलेलंच!!! वर, घरातल्या सगळ्यांनाच आपापली डेडलाईन गाठण्याची भयंकर घाई. या लहान मोठ्या डेडलाईन्स गाठण्याच्या घाईत कधीतरी आयुष्याच्या “final डेडलाईनला” सामोरं जायला लागणार आहे याचा विसरच पडतो आपल्याला. 

एखाद्या क्षणी ही जाणीव होते मग वाटतं, काय अर्थ आहे, या सगळ्या धावतपळत एखाद्या लाईनच्या भोज्याला स्पर्श करण्याच्या, “आयुष्य” नावाच्या खेळाला? सुख आणि दु:ख काय फक्त या शर्यतीतल्या जिंकण्या-हरण्याशी निगडीत!!!... इतर साऱ्या भावना पुसल्या गेल्यासारखं...!

नाही... असं नसतं. याला “जगणं” म्हणू शकत नाही आपण. ही तर नुसतीच धावपळ.
आपण वेळ दिला पाहिजे... स्वत:ला. रमलं पाहिजे आवडत्या गोष्टींमध्ये, माणसांमध्ये, जागांमधे... मधून मधून आयुष्याला थोडा ठेहेराव दिला पाहिजे. Challenges ना सामोरे जाताना दमछाक झाली तर थोडं थांबून खोल श्वास घेतला पाहिजे. आपल्या मित्रांमधली, कवितांमधली, चित्रांमधली भावनिक गुंफण अनुभवली कि आयुष्याचंच एक छान गाणं होत जातं... जे आपल्या नंतरही आपल्यामागे रहातं... सुहृदांना ऐकू येतं.

ऋतू बदलतात... दिवस पालटतात... काळ उलटत असतो, निसर्गाच्या भव्य पुस्तकाची पानं... पानागणिक नवी कथा, नवी कविता, नवे सूर, नवी जीवनगाणी उमटत जातात... सूर तरी किती!!! दिवसांचे, रात्रींचे, सुखांचे, दु:खांचे, नव्या बहराचे, कधी गोठवणारे बर्फाळ तर कधी नव्यानव्या सुरुवातीचे कोवळे आणि उबदार!!! आपण असतो किंवा नसतो पण त्याने काय फरक पडतो?... खरंच... त्याने काही फरक पडत नाही. गवतात बागडणाऱ्या फुलपाखरांच्या पंखांवर, तळ्यातल्या पाण्यावर, छोट्याछोट्या तरंगागणिक घडत्या मोडत्या उन्हाच्या सोनेरी नक्षीवर आणि निरभ्र निळ्या आभाळासारख्या मखमली मनांवर, अनामिक अक्षय आनंदाचं एक भावविभोर तरल गाणं उमटतच रहाणार... सतत...

म्हणूनच तुमच्यासाठी शांता शेळके यांची ही कविता... मी compose केलेली आणि माझा मित्र ओंकार याने गायलेली...

“असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे”
गीत : शांता शेळके
संगीत : प्रवरा संदीप
गायक : ओंकार संगोराम.
Arranging : शुभोदीप रॉय


प्रवरा संदीप

No comments:

Post a Comment