लोहमार्गी कथा -चित्रहार


माझे नाव गणोबा, वय ५५ वर्षे. मी वलसाडच्या रेल्वे स्टेशनवर कॅन्टीन चालवतो. चालवतो म्हणजे सगळा कारभार बघतो. या काळात मी कित्येक प्रसंग, भानगडी, किस्से आणि भांडणं बघितली आहेत. त्यातल्या काही आठवणी कायमच्या मनात राहिल्या. त्यातलीच एक हकिकत इथे सांगतो आहे.

१९८५-१९८६ च्या दरम्यान टीव्ही नावाच्या जादूगाराने सगळ्या भारताला सम्मोहित केले होते. त्याआधी दैनंदिन मनोरंजन म्हणजे फक्त रेडिओ किंवा वाचन होते. नाटक आणि सिनेमा महिन्या दोन महिन्यातून एकदा बघितला जायचा. 

लोकं संध्याकाळी एकमेकांच्या घरी सहज भेटायला जात असत. सध्या ही पद्धत लोप पावली आहे. मनोरंजनाच्या व्यतिरिक्त टीव्हीने पुष्कळ सामाजिक बदल ही घडवले. लोक टीव्ही  बघण्यासाठी एकमेकांच्या घरात जमायची. पूर्ण आळीत, चाळीत, वाड्यात, किंवा गल्लीत एक टीव्ही पुरायचा. एका खोलीत १० बायकांना अर्धा तास गप्प बसवणं (चित्रहार पाहत) हे फक्त टीव्हीलाच जमलं. आमची गोष्ट त्याच काळातली आहे.

आमच्या रेल्वे कॉलोनीत पहिला टीव्ही आला स्टेशन मास्टर (SM) साहेबांच्या घरी EC कंपनीचा ब्लॅक अँड व्हाईट. तसे इंजिनियर आणखीन अन्य बडे अधिकाऱ्यांकडेसुद्धा टीव्ही होते, पण रेल्वे कॉलोनीतला सार्वजनिक टीव्ही स्टेशन मास्तरांचा होता. याच टीव्हीवर कपिल देवने १९८३ चा क्रिकेट वर्ल्ड-कप जिंकला होता. 

मास्तरांकडे सर्वांना टीव्ही बघायला जायची मोकळीक होती. रविवारी तर सकाळपासून सगळी मुलं त्यांच्या घरी जमायची. त्यांची फक्त ही अपेक्षा असायची की रात्री ८:३० नंतर लोकांनी आपापल्या घरी जावं. लोकंसुद्धा त्याला मान देऊन ८:३० नंतर तेथे थांबत नसत. चित्रहार, छायागीत, रविवारचा सिनेमा या कार्यक्रमांना सगळे त्यांच्याकडेच असायचे. स्टेशन मास्तरांच्या पत्नींना गर्दीमुळे थोडा त्रास होत असे पण त्याचे पुष्कळ फायदेही असल्याने त्या तक्रार करत नसत. घरी टीव्ही बघायला आलेली मुलं त्यांच्या घरची कामं ख़ुशीने करून देत असत. टीव्ही बघायला सगळ्या बायका त्यांच्या घरी जमायच्या म्हणून कॉलोनीतल्या सगळ्या घडामोडी त्यांना घरी बसल्या कळू लागल्या आणि महिला मंडळात त्यांचा रुबाब वाढला.
पण वाईट असो की चांगलाकाळ बदलतोच. काही दिवसांनी ASM (असिस्टंट स्टेशन मास्तर) कडेही तोच EC  कंपनीचा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला आणि सगळी गर्दी आता ASM  कडे वळायला लागली. ASM  ने ८:३० चं  बंधन ठेवलं  नव्हतं. श्री आणि श्रीमती SM ला गर्दी कमी झाल्याने बरे वाटलं होतं. आता ते घरी लोळून, गाणी म्हणत कसेही TV  बघायला मोकळे होते. पण ASM  च्या घरी जमलेल्या गर्दीमुळे SM साहेबांना थोडा मत्सर वाटू लागला. श्रीमती SM ची महिला मंडळातली मानाची जागा श्रीमती ASM नी पटकावल्यामुळे त्याही चिडचिड करायला लागल्या होत्यां.
"मेला टीव्ही घरात आल्यामुळे एवढं मिरवायला नको! आणखीन सगळ्या जमतात छायागीत कि चित्रहार बघायला. गाणी कसली ऐकतायेत, चकाट्या पिटायला अड्डा जमतो सगळा."

SM
साहेब चतुर होते, त्यांना आपल्याकडे गर्दी नको होती, पण ASM चे महत्त्वही कमी करायचं होतं म्हणून त्यांनी एक युक्ती काढली. एक दिवशी ते कॅन्टीनमध्ये मिठाईचा पुडा घेऊन आले आणि घोषणा केली.
"मी नवीन रंगीत TV  घेतला आहे, गणोबा सगळ्यांना पेढे दे. आणि आता कोणा कडे टीव्ही बघायला जायचे हा प्रश्न लोकांना पडायच्या आधीच त्यांनी आणखीन एक घोषणा केली,
"माझा जुना ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही उद्यापासून कॅन्टीनमध्ये ठेवला जाईल, म्हणजे कोणाला टीव्ही बघायला कोणाच्या घरी जायची गरज पडणार नाही."

SM
साहेबांनी एका दगडात तीन पक्षी मारले. पहिला, माझ्यासारखा टीव्ही कॉलोनीत कोणाकडे नाही. दुसरा, ASM कडे गर्दी करायची आता गरज नाही; आणि तिसरा म्हणजे ASM  सारखा टीव्ही तर मी दानसुद्धा करू शकतो.
ASM आणि काही अरसिक लोकांनी टीव्ही कॅन्टीनमधे ठेवायला विरोध केला. त्यांच्या मते यामुळे लोकांचं लक्ष कामात लागणार नाही. कॅन्टीन मध्ये विक्री नीट होणार नाही, प्रवाशांना त्रास होईल. पण इतर सर्व टीव्ही  ठेवायच्या पक्षात असल्याने असं ठरलं की २ आठवडे टीव्ही कॅन्टीनमध्ये ठेवला जाईल. जर कॅन्टीन मध्ये गोंधळ झाला, प्रवाशांची तक्रार आली किंवा याने कॅन्टीनची विक्री कमी झाली तर टीव्ही कॅन्टीनमधून काढून घेण्यात येईल.
पण झाले याच्या विपरीत, लोकं आपली कामे पटकन उरकून टीव्ही बघायला यायला लागली. प्रवासी मंडळी टीव्ही बघायला कॅन्टीनमध्ये यायची आणि काही तरी खायलाही मागायची म्हणून कॅन्टीनची विक्री वाढली. गाडीची वाट पाहताना टीव्ही बघायची करमणूक झाली म्हणून कोणीही तक्रार केली नाही.


कॅन्टीनमध्ये टीव्ही आला आणि सगळं काही बदललं. पूर्वी ओसाड पडलेलं कॅन्टीन आता नेहमी लोकांनी गजबजलेलं राहू लागलं. प्लॅटफॉर्म रेल्वे कॉलोनीला लागून असल्याने ऑफ-ड्युटी पुरुष आणि मुलं तेथे यायची. बायका मात्र परत श्रीमती SM कडे रंगीत टीव्ही बघायला जमायच्या. गावाकडे शेत असलेले हमाल, गॅंगमन आणि इतर मंडळी "आमची माती आमची माणसे" बघायला यायची. तिकीट कलेक्टर जोशींचे वडील रिटायर्ड प्रोफेसर होते ते दुपारी UGC चे शैक्षणिक कार्यक्रम बघायला यायचे. पार्सल क्लार्क सुब्रमण्यम रात्री लुंगी नेसून १० वाजताच्या इंग्रज़ी बातम्या ऐकायला यायचे.
खरी गर्दी असायची चित्रहार आणि छायागीतच्या वेळेस, बुधवारी आणि शुक्रवारी. त्या वेळेस कुठल्याही गाडीची वेळ नसायची आणि सगळा स्टाफ हळू हळू तिथे गोळा व्हायचा.


पण खरी मजा झाली ती त्या बुधवारी. दयाशंकर आणि हजारी प्रसाद हे दोघं हमाल हिंदी सिनेमांचे दर्दी होते. दयाशंकर इलाहाबादचा असल्याने अमिताभ बच्चनचा फॅन होता. दर बुधवारी प्रत्येक गाण्यापूर्वी दयाशंकर म्हणायचा, "अगला गाना बच्चन का आएगा." पुढे पुढे सर्वांना या गोष्टीचा त्रास व्हायला लागला. हजारी प्रसाद हमाल जो दयाचा मित्र होता, त्याने दयाची मजा करायचे ठरवले.


पुढच्या बुधवारी पहिल्या गाण्यापूर्वी दया परत  म्हणाला, "अगला गाना बच्चन का आएगा."  हे ऐकताच हजारी म्हणाला, "दया बहुत सुन लिया तेरा। अब अगर पहला गाना अमिताभ का नहीं आया तो तू मुझे चाय पिलायेगा."
"हां पक्का!!दया उत्साहाच्या भरात म्हणाला.  
पण पाहिलं गाणं  "तू गंगा की मौज़ मैं जमुना का धारा" होतं  आणि हजारी पैज जिंकला.
दुसऱ्या गाण्यापूर्वी दया परत ओरडला, "अगला गाना पक्का अमिताभ का आएगा!"
हज़ारी त्याला खिजवत म्हणाला, "नहीं आया तो मुझे सुबह का नाश्ता करवाना पड़ेगा."
'चल ठीक है!" दया म्हणाला. 
पुढचं गाणं "ज़िन्दगी एक सफर है सुहाना" होता. दया परत हरला .
आता दयाला कळलं की हजारी त्याचा फायदा घेत आहे. मग तो हजारीला म्हणाला, 
"हज़ारी, अब तू बता, अगला गाना कौनसा होगा।"
"मेरेको नहीं मालूम." मिस्कीलपणे हसत हज़ारी म्हणाला. 
"ऐसे नहीं चलेगा, तेरे को भी अंदाज़ा लगाना पड़ेगा, वरना चाय नाश्ता भूल जा।"
"नहीं ऐसे नहीं!! शर्त तो ऐसी नहीं लगी थी दया, हमने तुझे कहां बोला था की तू अगला गाना किसका आएगा ये बता।"


लोकांना हा आरडाओरडा आवडला नाही आणि सगळ्यांनी त्या दोघांना शांत बसायची किंवा बाहेर जाऊन भांडायची ताकीद दिली. 
आणि पुढचं गाणं अमिताभच आलं "रोते हुए जाते हैं सब।"
"मैं जीत गया!" दया ओरडायला लागला. 
हज़ारी म्हणाला, "नहीं, ऐसा थोड़े ही होता है. तूने इस बार कहा बोला था की  अगला गाना अमिताभ का होगा।"


त्या दोघांची बाचाबाची सुरू झाली आणि लोकांनी त्यांना कॅन्टीनच्या बाहेर काढलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी दया आणि हजारी माझ्याकडे आले आणि मला त्यांच्या भांडणाचा निकाल लावायला सांगितले. मी हजारीला समजावले की  दया हरला आहे हे खरं असलं तरी शर्यत दोन्हीकडून लागली पाहिजे. यावर हजारी म्हणालाकी पुढच्या बुधवारी चित्रहारमध्ये १ गाणं तरी राजेश खन्नाचं असेल आणि नसलं तर मी दयाला २ रुपये देईन. हजारी राजेश खन्नाचा फॅन आहे हे तेव्हा मला कळलं.


दयाने अमिताभचं गाणं न आल्यास हजारीस २ रुपये देणं कबूल केलं. पण हजारीचा दयावर विश्वास नव्हता. शेवटी हे ठरलं की दोघांनी माझ्याकडे २-२ रुपये द्यायचे आणि जो जिंकेल त्याला मी पैसे देणार.


पुढच्या बुधवारी "मेरे सपनो की रानी" गाणं आलं आणि मी हजारीला ४ रुपये दिले. तिथे हजर असलेल्या सगळ्या स्टाफने याबद्दल चौकशी केली आणि पुढे यावर पुष्कळ गप्पा झाल्या. 


पुढच्या बुधवारी चित्रहार सुरू होण्याआधी  माझ्याकडे १० हिरोंची नावं आणि २० रुपये होते. ६ लोकांचा अंदाज बरोबर ठरला आणि मला १२ रुपये द्यावे लागले, ८ रुपये माझ्या खिशात गेले. 


२-३ आठवडे असेच गेले आणि मग मला समजलं की माझ्या नकळत मी या रेल्वे प्लॅटफॉर्मवर चित्रहारच्या गाण्यांचा सट्टा चालवायला लागलो होतो. 
कॅन्टीनच्या काउंटर वर १ कार्डबोर्डचा विटे एवढा बॉक्स ठेवला गेला. त्यावर पैसे आणि चिठ्ठ्या टाकायला १ भेग पाडली होती. लोकं एका कागदावर हिरो किंवा हिरोईनचं नाव लिहून त्या कागदामध्ये काही पैसे ठेऊन बॉक्समध्ये टाकायची. बुधवारी चित्रहारमध्ये ज्याचं गाणं आलं त्याला दुप्पट पैसे. सुरुवातीला करमणुकीसाठी सुरू झालेल्या या खेळाचा नंतर लोकं पैसे मिळवायचं साधन म्हणून उपयोग करायला लागले. कधी कधी लोकं १०-२० रुपयेसुद्धा लावायची. मलाही या खेळामुळे दर बुधवारी १० ते २० रुपये मिळायला लागले. 


नंतर लोक नट-नटींच्या जोडीला गायक-गायिकांची नावंही टाकायला लागले. महंमद रफी आणि लता मंगेशकर यांची गाणी प्रत्येक चित्रहारात हटकून यायची, एका बुधवारी मला पुष्कळ पैसे द्यावे लागले आणि म्हणून मी या खेळात फक्त नट-नटींची नावं स्वीकारायला लागलो. 


आता चित्रहारला गर्दी वेगळीच असायची. लोकं आपल्या चिठ्ठीतल्या नटाच्या गाणं यायची वाट बघायची आणि गाणं आलं की आरडाओरड आणि हंगामा करायला लागायची. मला सिनेमाची खूप माहिती नसल्याने कधी कधी वादावादीही व्हायची. 
एका माणसाने धर्मेंद्रच्या नावाची चिठ्ठी टाकली आणि "तुम पुकार लो" या गाण्यानंतर माझ्याकडे पैसे मागायला लागला. मला धर्मेंद्र कुठेही दिसला नव्हता, पण त्याच्या मते धर्मेंद्रला या गाण्यात पाठमोरा दाखवला होता.  


दर बुधवारी असले हंगामे आणि चकमकी होत असल्याने जी मंडळी खरंच गाण्यांचा आस्वाद घ्यायला जमायची त्यांना त्रास होऊ लागला. त्यांनी या सट्ट्याबद्दल स्टेशन मास्तरांकडे तक्रार केली. स्टेशन मास्तर माझ्या परिचयाचे होते. त्यांनी मला हा सगळा प्रकार बंद करायची ताकीद दिली आणि मीही ते मान्य केलं. 


पण या खेळाने मला पैसे मिळू लागले होते म्हणून मी गुपचूप हा खेळ सुरूच ठेवला. या खेळात भाग घेण्यारांना ताकीद दिली की कुणीही चित्रहारच्या वेळेस एक शब्दसुद्धा काढायचा नाही. दर गुरुवारी सकाळी पैशाचा हिशोब केला जाईल. आणि कोणी किती पैसे लावले आणि कोण जिंकलं यावर कुठेही चर्चा करायची नाही. 


खेळ सुरूच राहिला. मला कधी कधी १०० रुपयेसुद्धा मिळायचे. सगळ्या स्टेशनला आता बुधवारच्या चित्रहारचे वेध लागलेले असायचे. मी आता शुक्रवारच्या मराठी छायागीतकरता एक वेगळा बॉक्स ठेवायच्या विचारात होतो, पण एका बुधवारी परत मजा झाली.


रामचंद्र गॅंगमन पहिल्यांदा या खेळात सामील झाला आणि त्याने एकट्याने १०-१० रुपयाच्या ५ चिट्ठ्या टाकल्या. प्रत्येक चिठ्ठीवर नावाबरोबर एक संख्याहि लिहिली होती.

१. प्रदीप कुमार 
२. विश्वजीत 
३. नादिरा 
४. सुनील दत्त 
५. वहीदा रहमान

आणि त्या बुधवारी ही गाणी या क्रमाने आली. 

१. जो वादा किया वो निभाना पड़ेगा।
२. पुकारता चला हूँ मैं।
३. आगे भी जाने ना तू.
४. ना मुह छुपा के जियों
५. पिया तोसे नैना लागे रे.

रामचंद्रांची सगळीच नावे त्याच क्रमाने आली होती. त्या बुधवारी पहिल्यांदा मला या खेळात नुकसान झाले, तेही ५० रुपयाचे. मी रामचंद्राला याच गुपित विचारले, पण तो माझ्याकडे बघून हसला आणि निघून गेला. 
पुढच्या बुधवारी रामचंद्रने २०-२० रुपयाच्या ६ चिठ्ठया टाकल्या आणि परत सगळी गाणी त्याने सांगितलेल्या क्रमाने आली आणि मला १०० रुपयाचा फटका बसला. रामचंद्राला कुठली गाणी येणार आहेत हे तर माहिती होतंच, शिवाय ती कुठल्या क्रमाने येणार आहे आणि गाणी ५ येणार आहेत की ६ हेसुद्धा बिनचूक माहीत होतं. मला काही समजेना. 


रामचंद्र काही केल्या आपलं गुपित सांगत नव्हता आणि मला १५० रुपये गमावल्यानंतर हा खेळ सुरु ठेवायची हिम्मत नव्हती. मी रविवारी रामचंद्रला घरी बोलावून जेवायला बोलावलं आणि चांगली दारू पाजली. तो तरी काही सांगायला तयार नव्हता. शेवटी त्याला खेळ बंद झाल्याचं कळलं तेव्हा त्याने 'अंदर की बात' सांगितली. त्याचा खुलासा ऐकून मी तीन ताड उडालो. त्याला दर बुधवारी सकाळी स्टेशन मास्तर या चिठ्ठ्या आणि पैसे देत होते आणि गुरुवारी रामचंद्र जिंकलेले पैसे परत मास्तरांना द्यायचा. त्याला या कामासाठी १० रुपये मिळत होते. 


सोमवारी मी कॅन्टीनच्या काउंटरवरचा बॉक्स काढून टाकला आणि एक बोर्ड ठेवला ज्यावर, "आज पासून सर्व बंद" एवढंच लिहिलं. स्टेशन मास्तर दुपारी जेवायला कॅन्टीनमध्ये आले, पण मी त्यांची नजर चुकवत आपलं काम करत राहिलो. 
जेवणनंतर जेव्हा ते आपल्या खोलीत एकटे होते, मी भीत भीत त्यांना भेटायला गेलो. 

"काय गणोबा, कसं काय चाललं आहे?"

"साहेब, आपल्याला सगळं माहीतच  आहे." मी खाली मान घालूनच बोललो. 

"तर रामचंद्राने सगळं सांगितलं तुम्हाला!" साहेब हसत म्हणाले. 

"आता काय बोलू साहेब? आजपासून सगळं बंद.

"असं तुम्ही आधीही बोलला होतात." मास्तर मिस्कीलपणाने म्हणाले. 

"साहेब, हा तर फक्त खेळ होता. तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगतो. आपल्या या खेड्यात करमणुकीची काय साधनं आहेत?
थोडाफार विरंगुळा तर हवा ना. तुम्ही स्वतःच सांगा की सगळा  स्टाफ पूर्वीपेक्षा तरतरीत आणि उत्साही असतो की नाही. या स्टेशनवरचा स्टाफ वर्षानुवर्षे तेच काम करतो आहे, त्याला काही चैतन्य, काही नावीन्य नको का? माणसाला जगायला काही स्वप्नं, काही संघर्ष नको का? तेच तेच काम करून सगळे विटून गेले होते, या खेळाने सगळ्यांची थोडी करमणूक झाली तर काय बिघडलं?" 

"गणोबा, वक्तृत्व स्पर्धेत करतात तसली भाषणं केली तरी खोट्याचं खरं करू शकणार नाही. आता मला सांगा, जर हा खेळ होता तर मग आज "आज पासून सगळं बंद" अशी पाटी का लावली आहे? तुम्ही हरला म्हणूनच ना? जेव्हा तुम्ही हरलात तेव्हा तुम्हाला हा खेळ नकोसा झाला. कधी विचार केला आहे की जेव्हा तुम्ही जिंकला तेव्हा लोकांनी किती पैसे हरले असतील? बिचारी लोकं घाम गाळून पैसे मिळवतात ते काय सट्ट्यात गमावण्यासाठी?  कॅन्टीनमध्ये TV करमणुकीसाठी ठेवला होता सट्ट्यासाठी नाही. 


आणि स्वप्नं आणि संघर्षाचं म्हणाल तर लोकांकडे चांगले आणि सकारात्मक पर्याय असतात, पण ते कठीण असतात. लोकांना स्वप्नं हवी, संघर्ष हवे पण फक्त सोपी, ज्यासाठी परिश्रम लागत नाही ती. तुमच्या म्हणण्याप्रमाणे या खेड्यात करमणुकीचे साधन नाही, तुम्ही ही समस्या का सोडवत नाही? आपल्या कॉलोनीत एक रिकामं पडलेलं मैदान आहे, तिथे खेळाची सोय करणं हे स्वप्न नाही होऊ शकत आणि त्यासाठी संघर्ष नाही केला जाऊ शकत? मी सांगतो, तुम्ही जे चालवलं होतं ते स्वप्न नव्हे व्यसन होतं. प्रत्येक व्यसनामागे ध्येय, संघर्ष, चैतन्य नसल्याच्या  काहीतरी सबबी सांगितल्या जातात; मग ते व्यसन जुगार असो, दारू असो कि सिगारेट. हे उसने चैतन्य, संघर्ष सोपे असतात कारण ते थोडेसे पैसे खर्च करून विकत घेता येतात आणि नंतर ते व्यसनच त्यांच्या आयुष्याचा संघर्ष होऊन जातं.

"साहेब, चूक झाली, खरंच आज पासून सगळं बंद!

"ठीक आहे, मग जा आता, झालं ते विसरून जा.

"पण साहेब...

"गणोबा, तुम्हाला तुमचे हरलेले पैसे नाही मिळायचे." साहेब हसत हसत म्हणाले. 

"नाही साहेब पैसे नको, मला अजून हा उलगडा झाला नाही की तुम्ही गाणी कशी ओळखली?" खरं तर मला पैसेच हवे होते, पण मी लगेच पवित्रा बदलला. 

"ते तर सोपं आहे, माझा भाचा दिल्ली दूरदर्शनला कामाला आहे आणि टेलीफोनबद्दल तुम्हाला माहीतच असेल!
"बरं साहेब, मी जातो

"गणोबा थांबा, हे घ्या १५० रुपये, जे मी २ दिवसात जिंकले आहेत. आपल्या कॉलोनीतलं मैदान स्वच्छ करवून घ्या. १ फ़ुटबॉल आणि व्हॉलीबॉलही विकत घ्या आणि एक स्पोर्ट्स क्लब सुरू करा. तुमच्या त्या खेळाच्या सगळ्या लोकांना या क्लबात सामील करा म्हणजे त्यांची सगळी स्पर्धा, संघर्ष आणि ध्येय बाहेर येईल. आणि हां, मी पण तुमच्या खेळात होतो नाही का, मीसुद्धा येत जाईन रोज संध्याकाळी. TV पण व्यसनच आहे, रात्री थोड्या वेळच पुरे, जास्त नको.


- सचिन गोडबोले 

No comments:

Post a Comment