फेसबुक पेजचा व्यावसायिक उपयोग




डिसेंबर महिना सुरू होतो आणि सोशल मीडियावर नव्या वर्षाची सुरुवात कशी करणार, अशा आशयाच्या पोस्ट दिसू लागतात. पुढच्या वर्षीचे संकल्प काय करता येतील, त्याकरता काय पर्याय आहेत, अशा अर्थाच्याही पोस्ट समोर येतात. जुन्या वर्षाचा आढावा घेणे तर सुरू असते, नव्या वर्षातली आव्हानेसुद्धा समोर येतात. नव्या वर्षाच्या संकल्पांमध्ये एक प्रवाह असतो, नव्या वर्षात जोडीदार कसा मिळवता येईल हा! थोडक्यात फेब्रुवारीतल्या व्हॅलेंटाइन्स डेची पूर्वतयारी किमान दोन महिने आधीपासून सोशल मीडियाने केली असते.
आज वापरलेली टूथपेस्ट वर्षापूर्वी तयार झालेली असते. कालावधी उत्पादनानुसार बदलू शकतो. पण प्रत्येक उत्पादनाला पूर्वतयारी लागते यात शंका नाही. कोणत्याही कंपनीचे, शाळांचे, प्रकाशकांचे जसे पूर्ण वर्षाचे नियोजन झालेले असते तसेच सोशल मीडिया कंपन्या आणि मार्केटिंग करणाऱ्याचे, मॅनेजरचे आयुष्यसुद्धा असेच नियोजनबद्ध असते. आज कोणताही यशस्वी ब्रँड पूर्वनियोजित जाहिरातींशिवाय अपूर्ण आहे. फेसबुज पेजवर जाहिरात करणे हा प्रभावी आणि स्वस्त असा जाहिरातीचा मार्ग झाला आहे.
फेसबुक अकाउंट असताना वेगळे फेसबुक पेज का तयार करायचे, असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे. पण फेसबुक प्रोफाइलचा उपयोग व्यावसायिक उद्देशाकरिता करणे हे फेसबुकाच्या टर्म्स ऑफ सर्व्हिसच्या नियमांचे उल्लंघन करणारे आहे, याची कल्पना अनेकांना नसते. त्यामुळे ते व्यवसायाकरिता वा व्यावसायिक उद्दिष्टांकरिता फेसबुक पेज तयार करता आपल्या प्रोफाइलचाच वापर करतात. त्याने नियमांचे उल्लंघन होते. त्याचा फटका केव्हाही बसू शकतो. ते टाळण्याकरिता आपल्या व्यवसायासंबंधी पेज तयार करणे आवश्यक आहे.
पेज तयार करायला मात्र फेसबुक अकाउंट असणे ही अट आहे. कुणी दोन फेसबुक अकाउंट केवळ जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरता करतात, त्याचा वापर पेजसारखा करतात. अशा व्यक्तिगत प्रोफाइल अकाउंटना पेजमध्ये बदलायची सोय फेसबुकने दिली आहे. त्याचा वापर करून व्यावसायिक पेज तयार करता येते. व्यावसायिक पेजेसकरता जे विशेष पर्याय उपलब्ध केले आहेत, त्याचा वापर व्यक्तिगत अकाउंटना करता येत नाही. थोडक्यात पेज केले नसेल तर व्यक्तिगत प्रोफाइलवर त्या सुविधांचा फायदा व्यावसायिकांना घेता येत नाही.
> पेजकरता असलेल्या सुविधा किंवा पर्याय काय आहेत?
>
जाहिरात तयार करणे
>
पेजला भेट देणाऱ्या लोकांविषयी अधिक माहिती मिळवणे
>
जाहिरातींमध्ये आर्थिक इतर बदल करणे
>
भेटकर्त्यांना कृती करण्यास प्रोत्साहन देणारी बटने निवडणे.
फेसबुक पेज कसे तयार करायचे?
तुमच्या फेसबुक अकाउंटमध्ये लॉगिन व्हा. पेज तयार करण्यासाठी प्रश्नचिन्हाशेजारी असलेल्या ड्रॉप डाउन मेनूमधून क्रिएट पेज हा पर्याय निवडा. पेज क्रिएट केले की त्यावर प्रोफाइल फोटो/लोगो अपलोड करा, कव्हर फोटो अपलोड करा. सर्व फोटो आणि व्हिडिओचा दर्जा उत्तम असेल याविषयी दक्षता घ्या. अबाउट या सेक्शनमध्ये पेजविषयी सर्व माहिती भरा. तुमची वेबसाइट, पेजचा उद्देश, तुमच्याशी संपर्क कसा करायचा, ही माहिती भरणे महत्त्वाचे आहे. पेज कोण सांभाळणार त्यासाठी काही अॅडमिन नेमता येतात. त्यांची नावे जाहीर करायची की नाहीत ते ठरवता येते. हे सर्व पर्याय फेसबुक पेजवर आहेत.
पेजवर पोस्ट करणे
तुमच्या व्यक्तिगत अकाउंटवर जसे पोस्ट करता तसे फोटो, माहिती, लेखन, व्हिडिओ पेजवरही करू शकता.
पब्लिशिंग टूल्स
पेजवर खूप पोस्ट एकाच वेळी तयार करून ठेवता येतात. त्या केव्हा प्रकाशित करायच्या ते ठरवता येते. ही सोय व्यक्तिगत प्रोफाइलकरता उपलब्ध नाही.
आपल्या पेजला भेट देणाऱ्या लोकांविषयी अधिक माहिती मिळवणे.
फेसबुक पेजवर इनसाइट्स नावाचा पर्याय आहे. त्यामुळे पेजला कोण भेट देते त्यांच्याविषयी माहिती गोळा करता येते. त्यानुसार पेजचा वा जाहिरातीचा प्रमुख टार्गेट वर्ग कोणता ते ठरवता येते.
जाहिरात तयार करणे
तुमच्या फेसबुक अकाउंटमध्ये लॉगिन व्हा. पेज तयार करा. पेज तयार करण्यासाठी प्रश्नचिन्हाशेजारी असलेल्या ड्रॉप डाउन मेन्यूमधून क्रिएट पेज हा पर्याय निवडा. त्याच मेनूमध्ये जाहिरात कशी करायची या पर्यायावर क्लिक करून येणारे पर्याय बघा. जाहिरात तयार करण्याचा उद्देश काय आहे, ते ठरवा. तुमचा जाहिरातीचा अकाउंट नसेल तर ते तयार करा. उत्तम फोटो, लेखन, व्हिडिओ त्यातून लोकांना कृती करायला प्रोत्साहन मिळावे हे जाहिरातीचे प्रमुख घटक आहेत. वेगवेगळे घटक वापरून जाहिरात तयार करा.
जाहिरातींमध्ये आर्थिक इतर बदल करणे.
जाहिरात तयार केली की, ती प्रामुख्याने कोणाला दिसावी हे ठरवावे लागते. देश, वयोगट, भाषा इत्यादी पर्यायातून ती निवड करावी लागते. किती पैसा खर्च करायचे ते ठरवावे लागते. हे बजेट बदलता येते. इतर पर्यायही बदलता येतात. एकाच वेळी एकाच उत्पादनाच्या चारपाच वेगवेगळ्या जाहिराती करण्याचा सल्ला जास्त फायदेशीर ठरतो.
कृती करण्यास प्रोत्साहन देणारी बटने निवडणे.
पेजवर आलेले लोक तुमच्या साइटवर जाऊ शकतात, खरेदी करू शकतात, वर्गणी भरू शकतात, संपर्क करू शकतात. हे बटन निवडून ठरवता येते.
पेजवर जे दिसते त्याचा क्रम बदलणे.
पेजवर आलेल्या लोकांना कोणती माहिती आधी दिसावी असे वाटते त्यानुसार त्यामधील पर्यायांचा क्रम बदलता येतो. व्हिडिओ, पोस्टस, फोटो वा पेजवरील रिव्ह्यू आधी दिसावे हे पेज मॅनेजरला ठरवायचे असते.
सोशल मीडिया मॅनेजमेंटकरिता उपलब्ध पर्याय काय आहेत?
एकाहून अधिक फेसबुक पेजेस आपण आपले अकाउंट वापरून तयार करू शकतो, ते मॅनेज करू शकतो. त्यावर पोस्ट प्रकाशित करू शकतो. त्या पेजला भेट देताही मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वापरून हे व्यवस्थापन करता येते. सोशल मीडिया मॅनेजमेंट करता उपलब्ध पर्याय विविध आहेत. आपली गरज आणि बजेट काय आहे त्यानुसार हे पर्याय बदलता येतात. स्वीकारता येतात.
Hootsuite
Sprout Social
ही दोन सोशल मीडिया मॅनेजमेंट टूल्स प्रामुख्याने वापरली जातात.
हे दोन्ही प्रोग्रॅम्स सहज शिकता येतील असे आहेत, शिवाय खूप प्रभावी आहेत.
फेसबुक पेजेस
लोकप्रिय खेळाडू सचिन तेंडुलकर यांचं फेसबुक पेज किमान एकदा बघावं असं आहे. त्याशिवाय पेज मॅनेजमेंट कशी करायची याचे दाखले देणारी काही फेसबुक पेजेस कोलगेट इंडिया, लाफिंग कलर्स, बिइंग इंडियन ही आहेत. व्यवसाय नवीन आहे, वेगळा आहे तरी यशस्वीपणे सोशल मीडिया वापरणारे अनेक आहेत. आद्या ओरिजिनल्स (सायली मराठे) हे एक पेज असेच आहे. डॉक्टर जोगळेकर्स डेंटल सोल्यूशन्स (डॉ. मंदार जोगळेकर) हे पेज वैद्यकीय व्यवसायाबद्दल फेसबुकचा वापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण आहे.
- सोनाली जोशी, ह्यूस्टन, अमेरिका



No comments:

Post a Comment