नवं क्षितीज खुणावतं आहे!


येत नव्हतंच आम्हालाही 
लिहा-वाचायला, चार जणात बोलायला.  

पैसा म्हणजे काय?
तो कसा येतो? कसा जातो
नव्हती कळत व्यवहाराची भाषा.  

पण शिकून घेतलीच ना आम्ही ती?  
कधी पडत, कधी सावरत 
कधी तुमची मदत घेऊन  
तर कधी विरोध पत्करून 
पोचलो काळाच्याही पुढे दोन शतकं.
  
आमच्यापैकी काही जणी भाग्याच्या - माझ्यासारख्या!
त्यांच्याबरोबर आले तुमच्यातले काही जण.  
पण बाकीच्या साऱ्या? माझ्या आजीसारख्या
त्यांनाही होती पुढे जायची उमेद  
निर्माण करायचं होतं त्यांनाही एक सुंदर जग 
तुमच्या साथीनं, तुमच्या सोबतीनं.
  
पण तुम्ही बसलात काळाच्या मागे दोन शतकं.  
आपल्या सिक्स पॅक्सचा आणि 
निसर्गाने दिलेल्या आणखी कुठल्या कुठल्या अवयवांचा अभिमान मिरवत  
आणि आमच्या अवयवांवर फालतू जोक्स मारत
 
गेलेल्या गेल्यायत केव्हाच्याच (माझ्या आजीसारख्या)
आता आठवणी काढू नका.  
आहेत त्यांनाही वेळ नाही 
तुमच्या मिनतवाऱ्या करायला
आणि रांगड्या हातात लाटणं शोभतं का? म्हणत 
तुमचे अहंकार जपत बसायला. 
 
येत नसेल तर शिकून घ्या 
पण आता पुढे या    
आलात तर तुमच्यासह 
नाही आलात तर तुमच्या विना 
पण जायचं तर नक्की आहे
नवं क्षितीज खुणावतं आहे!

प्रज्ञा जेरे अंजल



No comments:

Post a Comment