Code Mantra - नाटक परीक्षण

मराठी रंगभूमीवर सध्या गाजत असलेल्या कोड मंत्र या नाटकाचा प्रयोग बंगलोर मध्ये १८ जूनला झाला. योगायोग असा की, या नाटकाचा महाराष्ट्राबाहेर हा पहिला प्रयोग आणि १८ जून हा या नाटकाचा पहिला 'वाढदिवस' .. आता बंगलोरमध्ये  मराठी नाटक दुर्मिळच. आलेलं कुठलंही नाटक बहुधा उचलूनच धरलं जातं. पण या कौतुकापलीकडे, आपल्या नाट्य गुणांवर कौतुकाला प्राप्त होणारं हे नाटक. ज्यांनी चुकवलं - मुद्दाम किंवा कारणाशिवाय - त्यांनी एक चांगला अनुभव गमावला.

हे नाटक बऱ्याच गोष्टींसाठी भावलं. अत्यंत सबळ कथावस्तू, एक अत्यन्त गंभीर, विचार करायला लावणारा आणि अस्वस्थ करणारा संघर्ष हा या नाटकाचा पाया आहे. "A few good men" या Broadway वर गाजलेल्या नाटकाचा हा मराठी (आधी गुजराती!) अनुवाद. योग्य त्या मराठीकरणाबरोबर. समाधानाची बाब ही, की ह्या मराठीकरणामुळे मूळ कथावस्तूला धक्का पोहोचलेला नाही. त्यातला संघर्ष तेवढाच तीव्र राहिलेला आहे. 

कर्तव्य आणि कर्तव्याचा अतिरेक यात एक अत्यंत पातळ का होईना सीमा  रेषा असते - आणि ती न ओलांडण्याचे भान ठेवावे लागते; नाहीतर त्याचे अनाठायी परिणाम होतात, हा या नाटकातला संघर्षाचा मुद्दा. कर्नल निंबाळकर या अत्यंत शिस्तप्रिय सैनिकी अधिकाऱ्याची, का कमकुवत सैनिकाला बदलण्याची धडपड. त्याला सवलत दिली तर संपूर्ण युनिटवर होऊ शकणाऱ्या परिणामांपासून युनिटला वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न. एका कमकुवत सैनिकामुळे संपूर्ण युनिट धोक्यात येऊ शकते याची  त्यांना जाणीव आहे. पण हे प्रयत्न थोडे जास्तच ताणले गेल्यामुळे; कुठे थांबायचे हे न समजल्यामुळे त्या सैनिकाचा गेलेला जीव. जे झालं ते ठीकच झालं; युनिटवरच्या टाळलेल्या परिणामांची ही एक छोटी किंमत असा निंबाळकराचा समज. तर एक अत्यंत हुशार लष्करी कायदेतज्ञ अहिल्या आणि सत्य शोधायची तिची धडपड यातून हे नाट्य रंगले आहे.

कल्पक नेपथ्य, प्रकाश रचना, ध्वनिसंकलन हे या नाट्याची रंगत वाढवतात. अगदी पहिल्या प्रवेशापासून सुरेख वातावरण निर्मिती करून या संघर्षाची धार वाढवतात. अत्यन्त ताकदीचे, कसलेले कलाकार - ही या नाटकाची जमेची बाजू. प्रमुख भूमिकांमध्ये मुक्ता बर्वे आणि अजय पूरकर यांनी जीव तोडून जान आणली आहे. संयत संवादफेक आणि तेवढाच पूरक अभिनय - निंबाळकराचा सरकारी गर्व, अभिमान, आणि त्याच बरोबर हाताखाली काम करणाऱ्या पण मित्र असणाऱ्या ले. कर्नल थत्त्यांबरोबर कसं वागावं हे न समजल्यामुळे होणारी घुसमट, पूरकरांनी सुरेख समोर आणली आहे. तर फाशी समोर दिसत असतांनाही युनिट वरची निष्ठा न ढळू देणाऱ्या  सैनिकांपुढे हतबल होणाऱ्या पण निंबाळकरांना न भिता आव्हान देणाऱ्या अहिल्या देशमुखांच्या भूमिकेचं मुक्ता बर्वेनी सोनं केलें आहे. या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना खिळवून ठेवते. 

निर्मात्यांचं कौतुक हे की पंधरा-वीस जणांची, अत्यंत सच्चेपणाने लष्करी तालमीत तयार केलेली तूकडी त्यांनी रंगमंचावर आणली आहे. कथानकात म्हटलं तर दुय्यम असणाऱ्या या भूमिका या सर्वानी इतक्या मनापासून वठवल्या आहेत की त्या सर्वांचाही मुद्दाम उल्लेख करायला हवा. 

क्वचित काही ठिकाणी abruptly सुरु होणारे काही प्रसंग आणि अहिल्या आणि तिच्या मित्रांमधले काही जरा जास्तच ताणले गेलेले प्रसंग सोडले, तर नाटक अगदी वेगवान आहे. कथावस्तू झपाट्याने पुढे सरकत क्लायमॅक्स पर्यंत येते. तो क्लायमॅक्स  त्याच्या अनपेक्षित कलाटणीने सुजाण रसिकाला एकीकडे थक्क करून सोडतो आणि दुसरीकडे ... पण ते लिहिणं अरसिकता  होईल. ते प्रत्यक्षच अनुभवायला हवं. 

नाटक बघून बाहेऱ  पडताना एक सुरेख नाट्यानुभव घेतल्याचा  आनंद मिळतो. आणि जे रंगमंचावर झालं ते बरोबर का  चूक हा विचार मनात येत राहतो. हे माझ्या दृष्टीने या नाटकाचे खरं श्रेय आहे. 

--- अभिजित टोणगांवकर 

No comments:

Post a Comment