मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाची आणि त्यातही प्रमुख दिवसांच्या विशेष कार्यक्रमाची बंगलोर कर रसिक दरवर्षीच मनापासून वाट पाहात असतात. या वर्षी रविवारी दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी उन्नती सभागृहात हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला माहिती तंत्रज्ञान अर्थशास्त्र विज्ञान संगीत साहित्य मॅनेजमेंट यासारख्या अनेक विषयात रुची व गती असलेले सुप्रसिद्ध लेखक श्री. अच्युत गोडबोले या वर्षीच्या गणेशोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून लाभले हे मित्रमंडळाचे रसिकांचे भाग्यच. सुरुवातीला वार्षिक सर्वसाधारण सभा व स्मरणिकेचे प्रकाशन झाले. यात मागील वर्षीच्या कामाचा आढावा, समितीचा सत्कार व पुढील वर्षीच्या समितीची ओळखही झाली. अभ्यासात व खेळात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून हा छोटासा कार्यक्रम संपला.
यानंतर श्री राजेश दामले यांनी घेतलेली दोन तासहून अधिक चाललेले प्रदीर्घ मुलाखत ही रंजक तर होतीच पण त्याहूनही जास्त विचार करायला लावणारी होती. वर उल्लेख केलेल्या सर्व विषयांवरील आपले विचार अतिशय स्पष्टपणे त्यांनी मांडले आणि आपला प्रवास रसिकांसमोर उलगडून दाखवला. मुलाखतीची सुरुवात अर्थातच अच्चुतजींच्या सोलापुरातील बालपणाच्या दिवसांतून झाली. आर्थिक दृष्ट्या मध्यमवर्गीय असलेल्या गोडबोलेंचा कुटुंब सांस्कृतिक दृष्ट्या मात्र अतिशय समृद्ध आणि संपन्न होतं. पंडित भीमसेन जोशी, शांता शेळके व अनेक मान्यवरांना जवळून बघताना संगीत, साहित्य हे केवल छंद नाहीत तर जगण्याचा अपरिहार्य भाग आहेत, त्याचा अभ्यास व आस्वाद तितक्याच समरसून घेतला पाहिजे हे त्यांना कुठे तरी जाणवायला लागले. आपल्या शाळेतील शिक्षकांच्या काही गमती जमती सांगतांना त्यांनी रसिकांना मनापासून हसवले.आयआयटीमधील शिक्षण हा नक्कीच त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. अतिशय हुशार व विविध विषयांमध्ये रुची असलेले अनेक जण तेथे होते.इंग्रजी साहित्य, मानववंशशास्त्र, भांडवलशाही का समाजवाद, पाश्चात्य संगीत,राजकारण अशा अनेक गोष्टींचा अभ्यास त्यांनी आयआयटीमध्ये केला.

महाराष्ट्रात सुद्धा गणपती उत्सव म्हणजे धांगडधिंगा असे स्वरूप होत असताना असा विचार करायला लावणारा दर्जेदार कार्यक्रम सादर केल्याबद्दल मित्रमंडळ समितीचे मनःपूर्वक अभिनंदन.
गांधार धाराशिवकर
No comments:
Post a Comment