नर्मदा परिक्रमा - भाग ७


lश्री गणेशाय नमःl 
     मार्कंडेय मुनि युधिष्ठिराला नर्मदेचे महात्म्य सांगतात, " मी भगवान शंकराची मानसिक पूजा केली व कधीही नष्ट न होणाऱ्या नर्मदेच्या काठावर तपस्या केली. शास्त्र जाणणाऱ्या नर्मदेला, मृत्युलोकाची सर्व पापे नाश करणारी म्हटले आहे. धर्मप्राप्तीसाठी नर्मदा उपासना सदा योग्य आहे. जो कोणी नर्मेदेच्या जलात एकदा जरी स्नान करून शिवमंदिरात अर्चना करतो त्या व्यक्तीला दुर्लभ असा शिवलोक प्राप्त होतो. हे राजन, एकच परमात्मा ब्रम्हा, विष्णू, शिवात्मक होऊन कार्य करतो. काही अज्ञानी लोक यांच्यात भेद पाहतात. त्याचप्रमाणे गंगा, रेवा, सरस्वती एकच असुन तीन रुपामध्ये विभक्त झालेल्या आहेत. गंगा सर्व पाप हरण करणारी वैष्णवी विष्णुरुपा आहे. नर्मदा ही रुद्ररूपा आहे कारण ती  भगवंताच्या देहातून निघाली आहे. सरस्वती ही ब्रम्हदेवापासून उत्पन्न झाली आहे. "
     २६ डिसेंबर. आता पुष्कर तीर्थावर चितळेंचा निरोप घेऊन अमरकंटक सोडले व भारावलेल्या अवस्थेतून तिथून निघालो. आता आमचा नर्मदेच्या दक्षिण तटावरून प्रवास सुरु झाला. आज साधारणपणे ३०० किलोमीटर प्रवास करून महाराजपुरला मुक्कामाला जायचे होते. दुपारी मंदिरांत जेवण झाले. आता परिक्रमा संपणार म्हणून हुरहूर वाटत होती. संध्याकाळी किरात धर्मशाळेत थांबलो. आम्ही नर्मदेचे पाणी एका काचेच्या बाटलीत घेतले होते. तर बाकीचांचे प्लास्टिकच्या बाटलीत. ते कसे अयोग्य आहे हे आम्ही बसमध्ये इतर सहप्रवाशांना सांगत होतो. नर्मदा हर म्हणजे नरांचा मद हरण करणारी. नर्मदा मैय्यानी ती कशी अहं हरणारी आहे याचे प्रत्यंतर आम्हाला दाखऊन दिले. तर  आता दोनच दिवस राहीले असतांना त्या रात्री आमची ती काचेची बाटली फुटली. कशी कोण जाणे. आधी हसूच आले. पण लगेच लगबगीने ते पाणी (सर्व ठिकाणचे होते) एका पेल्यात गोळा केले. व आम्ही पण मग ते एका प्लास्टिकच्या बाटलीतच ठेवले. असा आमचा अहंकार माईने दूर केला. सकाळी २७ डिसेंबरला स्नानाला जातांना नर्मदेचा सुंदर घाट बघितला. इथे घाट खूप उंचावर आहे. 
                         महाराजपूर नर्मदा घाट
खूप पायऱ्या उतरून स्नानाला जावे लागते. स्नान, दर्शन, पूजा झाली. व आता आम्ही हुशांगाबादकडे प्रवास सुरु केला. सकाळच्या प्रहरी बसमध्येच स्तोत्र म्हणतांना खूप छान वाटत होत. 


                        सकलनपुरची गुंफा    
वाटेत आम्हाला सकलनपूर  लागले. तिथे जवळच एक गुंफा आहे. खूप पायऱ्या उतरून खाली जावे लागते. गुंफेच्या समोरून एक छोटा ओहळ वाहत असतो व वरून सतत पाणी येत असत. आणि मनुष्यवस्तीपासून बरीच दूर व शांत जागा असल्याने इथे ध्यानाला अनेक संन्याशी राहतात. तिथे आम्हाला खूप त्रिशूल दिसले.
                            गुंफेतील त्रिशूळ
हे बघून दुपारचे जेवण, गणपतीचे दर्शन करून मंदिराच्या आवारातच झाले. पुढच्या प्रवासाला निघालो.
     आज हुशंगाबाद इथे मुक्काम होता. सेठानी घाटाजवळच एका धर्मशाळेत राहीलो. सकाळी २८ डिसेंबर ला नेहमीप्रमाणे लवकर उठून नर्मदेच्या घाटावर गेलो. येथील घाट खूप मोठा व सुरेख बांधला आहे. नर्मदेचे पात्र पण खूप विस्तीर्ण आहे. इथून १ किलोमीटरअंतरावरून नर्मदा उत्तरवाहिनी होते. घाटावर आंघोळ
व पूजा केली. जवळच गायत्री मंदिर आहे. तिथे दर्शन घेतले. इथे गायत्री मंत्राचे सतत पुनश्चरण सुरु असते. छान प्रसन्न वाटत होते. आज ओंकारेश्वरला जायचे होते. परिक्रमा पूर्ण होणार आहे, हा संकल्प पूर्ण होण्याची घाई होतीच. पण मन मात्र नर्मदेच्या किनाऱ्यावरच रुंजी घालत होते.  
  
सेठानी घाट
                            

गायत्री मंदिर
आता आम्ही हरदा, हंडिया मार्गे निघालो. नर्मदेच्या आजूबाजूची जमीन खूपच सुपीक असल्याने आता प्रवासात प्रसन्न वाटत होते. गहू, हरबरा, पेरू, लिंब, आवळे असे बगीचे दिसत होते. ताजी भाजी पण होती. दुपारच्या जेवणाकरता असाच  एक छान फार्म हाउस मिळाला. नंतर वाटेत उसाचे मळे लागले.  इथले शेतकरी मैय्याच्या आशिर्वादाने प्रसन्न असतात. आणि मैय्याप्रमाणे ह्यांनापण खूप देण्याची दानत असते. पूर्ण मध्यप्रदेशात तुम्हाला खाण्यापिण्याला कधीच कमी नसते. आजही आलेल्या पाहुण्यांचे प्रसन्न अंत:करणाने स्वागत होते. आम्हाला पण पोटभर ताजा उसाचा रस व गुळ देऊन पाठवणी केली.   

फार्म हाउस व भाज्यांचे मळे.
आता रात्री आम्ही मोरटक्कामार्गे ओंकारेश्वरला पोहचलो. सर्वांना खूप कृतकृत्य वाटत होते. ही नर्मदा किती प्राणदायिनी आहे.तिचे सर्व मानव जातीवर उपकार आहेत, या आनंदात राहायचे. हा निश्चय करून झोपलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी २९ डिसेंबरला नर्मदा स्नान केले. संकल्प पूर्ण झाल्याची पूजा करून कढई-शिऱ्याचा नैवेद्य दाखवला व ९ कुमारिकांचे पूजन केले.  
संकल्प सिद्ध पूजा.
नंतर या तटावरून नावेने ओमकारेश्वरला गेलो. नर्मदेचे सर्व ठिकाणांहून आणलेले जल वाहून शिवलिंगाला अभिषेक केला. शिवमहिम्न स्तोत्र म्हटले. आमच्या भाषेत शिवाला व मैय्याला आमचा संकल्प पूर्ण केला म्हणून धन्यवाद दिलेत. तसा आम्ही बसनी प्रवास केल्यामुळे आमचे हे भ्रमणच झाले. पण, मार्कंडे ऋषींनी २७ वेळा नर्मदा परिक्रमा केली तर आपण एकदा तरी पायी परिक्रमा करावी अशी प्रत्येकाला इच्छा झाली. शरिराने जरी संकल्प पूर्ण केल्याचा आनंद होता तरी मनाने आपण नर्मदेच्या सानिध्यातच असतो व आठवणी आल्यातरी मन प्रसन्न होते. तो तिचा किनारा, कधी झुळझुळ वाहणारे पाणी, तर कधी शांत, गंभीर, पवित्र, स्वच्छ पाणी, कधी कधी उत्साहाने धबधब्याच्या रूपात पडणारा प्रपात. दरवेळेला ती वेगळीच भासते. सर्व प्राणीमात्रांना आश्रय व जीवन देतेच. अगदी मानवच नाही तर देवांना पण, संतांना पण तिच्या आजूबाजूला तपस्चर्येचा मोह झाला. नर्मदेच्या किनाऱ्यावर आपल्याला किती तरी जागृत देवस्थाने बघायला मिळतात.   
श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग
नर्मदेच्या सानिध्यात  खरच काहीतरी मोहिनी निश्चितच आहे. म्हणून तर मार्कंडे मुनींनी  "नर्मदा पुराण"  लिहून काढले नसेल ना.
     एके ठिकाणी ते लिहितात, " या मेकल कन्येचे जल प्राशन केल्याने शाश्वत मुक्तीची प्राप्ती होते. जे लोक हिच्या उत्तर तटावर राहतात ते रुद्राचे अनुचर होतात. जे लोक दक्षिण तटावर राहतात ते वैष्णव लोकांत जातात. तो प्रदेश/ देश धन्य आहे जिथून नरकाचा अंत करणारी शिवपुत्री नर्मदा प्रवाहित होते. अशी ही माता, तिची परिक्रमा करतांना किंवा भ्रमण करतांना साधारणत: हा प्रश्न प्रत्येक साधकाला भेडसावत असतो की नर्मदेच्या सान्निध्यांत असतांना नेमके करायचे काय?  मार्कंडे मुनींनी  त्यासाठी एक श्लोक लिहून ठेवला आहे.
     'नित्य जनार्दनाचे ध्यान करावे. भगवान शिवाचे नित्य पूजन करावे. आणि नारायणाचे ध्यान हे शास्त्र संमतच आहे. नर्मदेच्या जलामध्ये जीव, जंतू, किडे जरी मरण पावले तरी त्यांना देवलोक प्राप्त होतो.'
     तेंव्हा  मार्कंडे मुनी  अत्यंत मोलाचा सल्ला देतात, " मनुष्यांनी नेहमी श्रद्धा धारण केली पाहिजे. भक्ती, श्रद्धा आणि ईश्वरप्राप्तीची इच्छा हे एकार्थ वाचेचेच तिन्ही आहेत. श्रद्धा असली तर दोन्ही प्राप्त होतात." 
          हे आपल्या सर्वांना नर्मदामैय्येच्या कृपेत लाभो !
              असे हे नर्मदा भ्रमण सफळ संपूर्ण.

                          सौ. वर्षा संगमनेरकर 


    


No comments:

Post a Comment