‘डियर जिंदगी’ – एक फसलेला भला प्रयत्न!

‘इंग्लिश-विंग्लिश’नी गौरी शिंदेंच्याबाबत मनात आदर आणि चांगल्या कलाकृतींकरीता अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. हल्ली हिंदी सिनेमा नव-नव्या विषयांना धाडसाने हात घालतो आहे. अशा वेळी गौरी शिंदेंचा ‘डियर जिंदगी’ प्रथम दर्जाच्या स्टारकास्टसह येतो आणि त्याची कथा मानसोपचाराच्या काठा-काठाने पुढे जाते असं ऐकून जीव हरखून गेला होता. पण...

हा हिंदी सिनेमाबाबतचा अनेकदा आड येणारा ‘पण’ इथेही अगदीच दु:खद रीतीने अनुभवाला आला! मन, मानसशास्त्र, मनोविकारशास्त्र आणि त्यांतले विविध उपचारकर्ते यांबाबत लोकांना आपण काहीतरी सकारात्मक, शास्त्रीय, आधुनिक वगैरे सांगतो आहोत असे भासवून या क्षेत्रापासून दूर असलेल्या लोकांचे त्याविषयीचे भ्रम वाढीला लावण्याचेच काम या चित्रपटाने केले आहे असे अत्यंत खेदाने नमूद करावे लागेल. आणि, त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या सारख्याला या चित्रपटाविषयी लिहिणे-बोलणे आवश्यक बनते आहे. हा सिनेमा उथळ, केवळ थट्टा-विनोदाच्या अंगाने जाणारा असता तर कदाचित मानसिक आरोग्य क्षेत्राबद्दल काहीही भाष्य करूनही या क्षेत्राचे नव्याने कोणतेच नुकसान झाले नसते. पण, हा सिनेमा आणि त्याचे कर्ते गंभीर भाष्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याने मानसिक आरोग्य क्षेत्राबद्दल अनभिज्ञ असलेला फार मोठा समाज चुकीच्या समजांना आपल्या मनात अजूनच विश्वासपूर्वक घट्ट रुजवू शकतो हा फार मोठा धोका ‘डियर जिंदगी’ या सिनेमाबाबत आहे. डियर जिंदगी या सिनेमाचे सर्वांगिण परीक्षण हा या लेखाचा विषय नाहीच; आणि या सिनेमामुळे  मानसिक उपचार घेण्याबाबत काही सकारात्मक संदेश जरूर जातो हे मान्य करून पुढील मुद्दे मांडत आहे.

पहिली गोष्ट म्हणजे मानसशास्त्र आणि मनोविकारशास्त्र ही दोन वेग-वेगळी क्षेत्रं आहेत ही बाब सिनेमात अस्पष्ट राहिलेली आहे. सिनेमातील ‘दिमाग का डॉक्टर’ हा वैद्यकीय डॉक्टर म्हणजेच मनोविकारतज्ज्ञ (सायकिअॅट्रिस्ट) आहे की मानसशास्त्रज्ञ हे प्रेक्षकांना समजत नाही. मानसोपचारतज्ज्ञ हे वैद्यकीय तज्ञही असू शकतात आणि मानसोपचारातील प्रशिक्षण घेतलेले अन्य तज्ञही असू शकतात. त्यांची कामे परस्परपूरक असतात. काही मनोविकारतज्ज्ञ हे केवळ औषधोपचार करतात तर काही औषधोपचार आणि मानसोपचार अशा दोन्ही पद्धतीनी उपचार करतात. मात्र, या दोन्ही उपचारपद्धती पूर्णतः शास्त्रशुद्ध आणि शिस्तबद्ध आहेत. कोणाला वाटते म्हणून, कोणाला सुचते म्हणून, कोणाला आवडते म्हणून कोणी प्रशिक्षण न घेता ‘उपचार’ करू शकत नाही. तसे करणे हा गुन्हा आहे हे मानसिक आरोग्याबाबतही लागू आहे, कदाचित जास्तच लागू आहे. मानसोपचार ही कला जरूर आहे; पण त्या आधी, त्या बरोबर आणि त्या नंतरही ते शास्त्र आहेच हे विसरता कामा नये. खरे तर, दुर्दैवाने आज या शास्त्राला वळसा घालून, लोकांच्या अज्ञान, लज्जा, गैरसमजूती यांचा गैरफायदा घेणारे अनेकजण असे तथाकथित ‘उपचार’ करीत आहेतच. पण, त्यांना  ‘उपचार’ का म्हणता येत नाही हे स्पष्ट करणे हाच खरे तर या लिखाणाचा हेतू आहे.

मानवी मन मेंदूच्या सहाय्याने चालणारी ही खूप गुंतागुंतीची आणि बहुतांश अदृष्य अशी प्रक्रिया आहे. त्यामुळे, मनाचे आजार किंवा समस्या हाताळण्यासाठी अनेक वर्षांच्या अथक, चिवट प्रयत्नांतून काही उपचार-प्रक्रिया निर्माण झाल्या आहेत, होत आहेत आणि शास्त्र-कसोटीवर न टिकल्यास रद्दबादलसुद्धा केल्या जात आहेत. हे शास्त्र म्हणजे आजकाल केवळ मानसशास्त्र नसून मेंदूशास्त्र, आरोग्यशास्त्र, समाजशास्त्र, तत्वज्ञान अशा बहुविध शास्त्र-शाखांचा  समन्वय साधून विकसित होणारे शास्त्र आहे. आणि त्यांत होणारी उलथापालथ ही या क्षेत्राशी निगडीत असणाऱ्यांना समजून घ्यावीच लागते. त्यामुळेच, एखादी उपचारपद्धती कशी चालावी आणि कशी चालू नये याची शास्त्रीय कारणे असतात. तो केवळ कोणाच्या ‘स्टाईल’चा भाग असू शकत नाही! आपल्या डियर डॉक्टर खानला याची कल्पना सिनेमाकर्त्यानी दिली आहे असे दिसत नाही!
मानसिक उपचार करताना उपचारकर्त्याशी क्लायंटचे नाते हा नेहेमीच खूप गांभीर्याने सांभाळण्याचा विषय राहिला आहे. म्हणूनच त्यासाठी अनेक नियम आणि पथ्ये मोठ्या अनुभवांती व विचारप्रक्रियेतून ठरविली गेली आहेत. ही पथ्ये या सिनेमात सहजपणे धुडकारली गेलेली प्रेक्षक पाहतो.

आता इथे कुणाला प्रश्न पडेल की क्लायंट आज तणावमुक्त झाला हेसुद्धा महत्वाचे नाही का? नक्कीच आहे! पण तो त्यामुळे नव्या तणावाची पायाभरणी करीत आहे त्याचे काय? “मला आता उद्या कोण मदत करेल? मला कोणातरी अधिक सक्षम व्यक्तीची मदत नेहेमी लागणारच” हा तो नवा ताण असतो. योग्य पद्धतीने केलेल्या थेरपीमध्ये क्लायंट आजच्या समस्येवर मात करण्यासोबतच स्वत:ची व्यक्तिमत्व-बांधणी करण्यास शिकतो. आणि हे तो तेव्हाच शिकतो जेव्हा थेरपिस्ट क्लायंटला स्वत:त सुयोग्य बदल घडविण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल सातत्याने विश्वास देत रहातो. त्यासाठी क्लायंटची कोणतीही खास ‘स्पेशल’ पातळीवरची क्षमता किंवा व्यक्तिमत्व आवश्यक नसून आत्मपरीक्षण, बदलाची प्रेरणा आणि योग्य दिशेने प्रयत्न करणे इतकेच गरजेचे असते. हे करत असताना क्लायंटच्या सोबत राहण्याचे काम थेरपिस्टने करायचे असते. थेरपिस्टने स्टीअरिंग आपल्या हाती घ्यायचे नसते. आपला डी.डी. नेमकी हीच चूक करतो! हिमालयावर पूर्वतयारीविना चढून जिवाला मुकलेल्या कुणा ‘चाचा’ची गोष्ट सांगून तो कायरा ऊर्फ कोकोला एक निर्णय रेडीमेड घेऊनच देतो! तो भले आभास असा निर्माण करतो की ‘मी निर्णय दिला नाही, केवळ एक गोष्ट सांगितली’; पण वास्तवात आपल्या क्लायंटची या कसोटीच्या क्षणी कठोर आत्मपरीक्षण करण्यापासून त्याने सुटका केलेली असते. ‘मला एखादा निर्णय सोपा वाटतो तर तो मी घ्यावा; ज्यासाठी माझ्या शरीर-मनाची तयारी नाही ती गोष्ट मी हट्टाने किंवा कुठल्याही दबावामुळे करण्याची आवश्यकता नाही’ हे विधान योग्यच आहे. पण, ते विधान क्लायंटच्या आत्मपरीक्षणातून आले का? आपल्याला एखादी गोष्ट सोपी किंवा कठीण वाटते तर ती तशी का वाटते याचे भान क्लायंटला आले का? आपल्या निर्णयाचे स्वातंत्र्य आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी क्लायंटला उमजल्या का? आपला निर्णय आपणच निभावून न्यायला हवा आणि तो कसा निभावून न्यावा हे क्लायंटला कळाले का? अजिबातच नाही. म्हणून तर तिने अमेरीकेला न जाण्याचा निर्णय अत्यंत चुकीच्या पद्धतीने तिच्या मित्राचा (रघुनंदन) निष्कारण अवमान करून जाहीर केला. रेडीमेड विधाने, तत्वज्ञान आणि युक्त्या ढिगानी उपलब्ध असतात. अनेकजण (आणि गुगलसुद्धा!) तुम्हाला सतत त्याचे उपदेश पाजतच असतात. पण, हे उपदेश युक्तीने देणे, प्रभावी पद्धतीने देणे म्हणजेच थेरपी ही समजूत क्लायंट आणि थेरपिस्ट या दोघांसाठीही खूप घातक आहे!

थेरपी म्हणजे, क्लायंटच्या जीवनाचे तत्वज्ञान क्लायंटला पेलेल आणि उपयुक्त ठरेल असे क्लायंटनेच  ठरविणे. आणि हे करताना थेरपिस्ट हा कॅटालिस्ट असतो – ती प्रक्रिया घडण्यास उपयुक्त ठरणारा अलिप्त घटक! खरे तर ही प्रक्रिया खूप मोहक असते! मात्र, ती दाखविण्यासाठी सिनेमा बनविणारे तितके संवेदनशील असायला हवेत. डियर जिंदगी बाबत म्हणून तर खूप अपेक्षा होती. कोकोच्या बालपणातील मनाला झालेली जखम आणि त्या जखमेचा तिच्या जीवनात अदृश्यपणे सतत राहिलेला सल ही या सिनेमात टिपलेली एक महत्वाची मानसिक बाब आहे. हा सल कमी होण्यासाठी डी.डी. एक महत्वाची सूचना आणि गृहपाठ देतो की, आपल्या आई-वडिलांचा माणूस म्हणून त्यांच्या चुकांसह स्वीकार कर, त्यांच्याशी स्वत:हून संवाद कर. या सिनेमात अनेक चांगल्या तत्त्वज्ञानांचा उल्लेख आहे – त्यांपैकीच हे ही एक. पण, त्यातली आक्षेपार्ह गोष्ट ही की, अशी तत्वज्ञाने क्लायंटच्या मनात कशी उमलली किंवा रुजली हे सिनेमात दाखविण्याचा खूप कमी प्रयत्न केला आहे. कोणत्याही सिनेमाच्या माध्यम म्हणून मर्यादा असणार हे मला नक्कीच मान्य आहे. पण, ‘अशी वरवर कितीतरी योग्य वाटणारी तत्त्वज्ञाने प्रत्यक्षात क्लायंटला आपल्या जीवनात का अंगिकारता येत नाहीत?’ हा मानसिक उपचारांवर आधारित कलाकृतीसाठी कळीचा प्रश्न असायला हवा. नाही तर सारे काही सोपे-सोपे वाटू लागते. त्यातूनच, किती तरी नातेवाईक आणि मित्र अशी समजूत करून घेतात की एखाद्या दु:खी अथवा भावनिक समस्या असलेल्या व्यक्तीला उत्तमात उत्तम तत्वज्ञान सांगितले की पुरे! थेरपी कशाला हवी?

सिनेमामध्ये नातेसंबंधांच्या बाबतीत अनेक महत्वपूर्ण विधाने आहेत. जसे की, लग्नासारखा निर्णय घेण्यापूर्वी अनेक व्यक्तींची पडताळणी करायला हवी, एकाच नात्यामध्ये सर्व अपेक्षांची पूर्तता व्हावी हा अट्टाहास असता कामा नये, अखंड पालकत्व हा पालकांचा स्वत:चा निर्णय असतो तर त्याविषयी त्यांनी मुलांना दोष देऊ नये  इत्यादी. वास्तविक, अशी विधाने हा व्यक्तींच्या व्हॅल्यू सिस्टिम्सचा (जीवनमूल्ये) महत्वपूर्ण भाग असतो. तिथे थेरपिस्टने स्वत:च्या जीवनमूल्यांचा प्रसार करण्याचा मोह टाळणे खूप आवश्यक असते. भले ती मूल्ये कितीही सुंदर आणि उपयुक्त असोत. थेरपिस्टचे काम असते की, क्लायंट स्वत: आपल्याला उपयुक्त जीवनमूल्ये ठरविण्याच्या आणि स्वीकारण्याच्या दिशेने जावा. अन्यथा चांगल्या मूल्यांचा भ्रष्ट स्वरूपात वापर होऊ शकतो. जसे, ‘लग्नासारखा निर्णय घेण्यापूर्वी अनेक व्यक्तींची पडताळणी करायला हवी’ याचा अर्थ तसे न करणारे सर्वजण चूकच आहेत का? काही व्यक्ती असा निर्णय इतर व्यक्तींशी तुलना न करताही घेऊ शकतात. काही व्यक्ती आधी घेतलेला निर्णय गरज पडल्यास बदलूही शकतात. आणि खरे तर त्यासाठी अधिक भावनिक संतुलनाची गरज असते. या उलट ‘सर्वांनी अनेक खुर्च्या ट्राय करूनच निर्णय घ्यावा’ असे सांगणे म्हणजे निर्णयात चूक होताच कामा नये असे सुचविण्यासारखे आहे.  दुर्दैवाने, सिनेमात थेरपिस्ट डी.डी. हा कायराला तसे सूचित करताना दिसतो. कारण, त्याला तिच्या मनातील अपराधीपणाची आणि शरमेची भावना कमी करण्याची घाई झालेली आहे. म्हणजे एक प्रकारे तो तिच्याहून अधिक डिफेन्सिव्ह आहे! तसेच, नात्यांतील अपेक्षांबाबत सांगता येईल. अपेक्षांचे ओझे नात्यांवर असता कामा नये हे खरे. पण, कोणत्याही नात्यामध्ये स्वत:खेरीज दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोनाची आणि अपेक्षांचीपण बाजू असते हे विसरता येईल का? आपण एखाद्या नात्यात कोणत्या अपेक्षा ठेवतो आणि कोणत्या नाही याबाबत पुरेसा संवाद दोन व्यक्तींमध्ये असेल तरच हे तत्व नीट साकारेल. अन्यथा, तो एका व्यक्तीचा मतलबीपणा ठरणार नाही का? त्यामुळे, मुद्दा असा की, चांगली तत्त्वज्ञाने सांगणे म्हणजे थेरपी नव्हेच! तर तत्त्वज्ञाने क्लायंटच्या अंगाबरोबर बेतून घेण्यास मदत करणे म्हणजे थेरपी होय. याचे एक चांगले उदाहरणही सिनेमात दिसते. ते उदाहरण म्हणजे, कायराचे पालक तिच्यासमोर आपल्याला आयुष्यभर पालक राहण्याचा किती त्रास होतो असे सांगतात, तेव्हा कायरा तिच्या ‘जीनियस’ थेरपिस्टने सुचविलेले नसतानादेखील त्यांना लक्षात आणून देते की, खरे तर पालक आपल्या स्वत:च्याच मर्जीने घेतलेल्या निर्णयाचे खापर निष्कारण मुलांवर फोडत असतात. हे कायरा बोलू शकली कारण, तिला आपल्या स्वत:च्या मतांचा उच्चार करण्याचे बळ आले होते. हे बळ तिला स्वत:बद्दलची अपराधीपणाची भावना कमी झाल्यामुळे आले असू शकते. ही खरी थेरपी म्हणता येईल.

भावनिक समस्या असलेल्या कुणाही व्यक्तीने मानसोपचार घ्यायला हवा असा संदेश देण्याचा प्रयत्न करताना त्याबाबत नकळत या सिनेमाने असा चुकीचा संदेश दिला आहे की, मानसोपचार म्हणजे शहाण्या माणसाकडून आपले अज्ञान किंवा अडचण दूर करणे! आता तुम्हीच मनापासून सांगा की, ‘तू अज्ञानी आहेस म्हणून जरा शहाणपण शिकून ये’ असे म्हटल्यावर किती जण थेरपी घ्यायला उत्सुक राहतील? वास्तविक क्लायंट हा काहीवेळा थेरपिस्टपेक्षा अधिक शिक्षित, अधिक अनुभवी आणि शहाणासुद्धा असू शकतो किंवा सर्वसाधारण क्षमतेचाही असू शकतो. आणि थेरपिस्टसुद्धा सायकलपासून माणसापर्यंत काहीही रिपेयर करण्यात वाकबगारच  असायला हवा असे नाही! क्लायंट मानसिक, शारीरिक, सामाजिक अशा अनेक कारणांपैकी काही कारणांनी काही वेळेपुरता अडचणीत आलेला असतो आणि थेरपिस्टकडे ती अडचण दूर करण्याची शास्त्रशुद्ध तंत्रे असतात, इतकंच! ही तंत्रे शास्त्रशुद्ध असतात हा मुद्दा मी इथे पुन्हा एकदा अधोरेखित करतो आहे. आजच्या घडीला या तंत्रांचा खूप उच्च पद्धतीने अभ्यास होतो आहे. या अभ्यासामध्ये अत्याधुनिक मेंदूशास्त्र समाविष्ट असते. मानसोपचारांच्या विविध पद्धती असून त्या वापरण्यासाठी खास प्रशिक्षण घ्यावे लागते. एखादे तंत्र खरेच उपयुक्त ठरते का, ते नक्की केव्हा उपयुक्त ठरते आणि का उपयुक्त ठरते यावर खूप मोठ्या प्रमाणात संशोधन होत असते. औषधांशिवाय मानसोपचार केव्हा करावेत आणि औषधांसह मानसोपचार केव्हा करावेत यावर प्रत्यक्ष पुराव्यानिशी अभ्यास होत असतो. मानसोपचार प्रत्यक्ष मेंदूत कोणते बदल घडवतात आणि का घडवतात याचे शास्त्रीय पुरावे असतात. मात्र या सिनेमात सुरुवातीला मानसोपचारतज्ज्ञ एका कॉन्फरन्समध्ये जी चर्चा करताना दाखविले आहेत ती शास्त्रीय चर्चा नाहीच आहे. ती केवळ सर्वसाधारण विधाने आहेत. शिवाय त्यातील ‘प्रोग्नोसीस लीड्स टू डायग्नोसिस’ अशी काही विधाने निरर्थकही आहेत!
सिनेमामध्ये आपला डी.डी. ड्रीम अॅनालिसिसपासून बोटीवर फिरण्यापर्यंत मनाला येईल ते तंत्र मनाला येईल तसे वापरताना दाखविले आहे. वेळेची मर्यादा पाळण्याचे तत्व हट्टीपणाने वापरल्यासारखे दाखविले आहे. सेशन्सचा अजेंडा क्लायंटला काय हवे हे न पाहताच एकाधिकार असल्यासारखा थेरपिस्ट ठरवितो असे दिसत राहते. तीच बाब थेरपी थांबवतानाही घडताना दिसते. वास्तविक थेरपी केव्हा आणि का थांबेल हे थेरपीदरम्यान क्लायंटला पूर्ण विश्वासात घेऊन आणि भविष्यातील गरज कशी हाताळली जाईल याची योजना करूनच थेरपिस्ट सांगत असतो. क्लायंटला वाऱ्यावर किंवा रस्त्याकडेला सोडून देऊन नव्हे! यातून थेरपिस्ट हा आश्वासक मदतनीसाऐवजी कोणी विशेषाधिकार असलेला हुकूमशहा वाटतो. अशा सर्व चुकांमुळे डियर जिंदगी पाहताना मानसोपचार हे शास्त्र आहे असे कुठेच मनावर ठसत नाही. ती केवळ एक हुशारी वाटते. आणि तसे वाटणे घातक आहे! डी.डी. च्याच भाषेत बोलायचं तर असा प्रश्न मला पडतो की, हिमालयावर चढण्याचा कुठलाच पूर्व-अभ्यास न करता असा घातकी प्रयत्न का बरे केला आहे?


डॉ. अनिमिष चव्हाण 
एम.डी. – मनोविकारतज्ज्ञ

No comments:

Post a Comment