जानेवारीतील प्रसन्न सकाळ. हवेत सुखद गारवा. मी जयपूरमधल्या दिग्गी पॅलेससमोर उभी होते. गेले काही दिवस मी या महोत्सवाला येणार असे घोकत होते आणि आज इथे पोचले होते. अनेक वर्षे या साहित्य मेळ्याबद्दल मी ऐकत होते, पेपरात वाचत होते, पण का कुणास ठाऊक, मी कधी तिथे जाईन किंवा आपण तिथे जावे, असा काही विचार माझ्या मनात आला नाही. पण सहा महिन्यांपूर्वी 'अंतर्नाद'च्या जुन्या अंकात यावर लेख वाचला. लेखिकेचे नाव आठवत नाही, पण ती माझ्यासारखीच साहित्यावर प्रेम करणारी, पुस्तकात रमणारी साधीसुधी वाचक होती. तिचा JLF चा अनुभव वाचला आणि ठरवले, की एकदा तरी आपण जायचंच या साहित्याच्या कुंभमेळ्याला.
इथे जाण्यासाठी फार खर्च वगैरे येतो, ही आपल्याला वाटणारी दुसरी भीती. तर तसे काहीही नाही. आपण आपले नाव, गाव देऊन, नाव नोंदणी करू शकतो. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून ही नोंदणी सुरू होते. जयपूर येथील दिग्गी पॅलेस परिसरात हे संमेलन होते. पॅलेस असला तरी हा 'राजवाडा' श्रेणीतला नाही, तर 'हवेली' या श्रेणीतील ही छोटीशी, देखणी वास्तू आहे. भरपूर मोकळी जागा आहे. या परिसरातच चर्चासत्रांचे आयोजन होते. हे संमेलन साधारणपणे पाच दिवस चालते. संमेलनाची सुरवात गायनाने आणि पारंपारिक नृत्याने होते. आणि मग पुढचे पाच दिवस हा सोहळा अविरत चालू असतो.
या परिसरात फ्रंट लॅान, चार बाग (याचा खरा उच्चार हा चाहार बाग असा आहे), मुगल टेंट, दरबार हॉल आणि बैठक या पाच ठिकाणी चर्चासत्रे होतात. 'संवाद' ही जागा पॅलेसच्या बाहेर, पण अगदी जवळच होती. या अशा सहा ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सतत चर्चांच्या मैफिली रंगत होत्या. त्याशिवाय संध्याकाळी जयपूरमधील काही हॉटेलात गाण्याचेही कार्यक्रम होते. मात्र याला वेगळे तिकीट होते.
आम्ही तिथे एक दिवस आधी पोचलो. तिथे पोचल्यावर नोंदणी केल्याची मेल दाखवून मग पास मिळतो. एक भलीमोठी पुस्तिकाही मिळते. यात संमेलनाचे वेळापत्रक असते. प्रत्येक ठिकाणी सहा ते सात चर्चासत्रे होतात दिवसाला. म्हणजे सहा ठिकाणी एकूण ४० ते ४२ चर्चा असतात दिवसाला. पाच दिवसांत जवळजवळ अडीचशेच्या आसपास चर्चासत्रे होतात. यात काही पुस्तकांचे प्रकाशन असते. नवीनच प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या लेखकांशी गप्पा असतात. सगळे काही पुस्तकांभोवती फिरत असते.
सगळ्या चर्चांचे मूळ हे साहित्य, कला, संगीत हे होते. या चर्चांमध्ये भाग घेणारे प्रामुख्याने लेखक, कलाकार हेच असतात, त्यामुळे वेळापत्रक वाचून गोंधळायला होते. कधी चर्चेचा विषय आवडतो; कधी चर्चा करणारे ओळखीचे असतात; कधी लेखक आवडता असतो; तर कधी आपल्याला आवडणारे दोन-तीन कार्यक्रम एकाच वेळी असतात! त्यमुळे कोणता कार्यक्रम पहावा, कोणता नाही याचा गोंधळ उडतो.
आम्ही एक दिवस आधी गेल्यामुळे सगळी जागा नीट हिंडून पाहिली. त्या दिवशी सगळीकडे मांडामांड चालू होती. एकदम घरगुती, प्रसन्न वातावरण होते. संमेलनाचे स्वयंसेवक म्हणून तरुण मुलेमुली होती. अगदी अदबीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होती. जागेशी नीट ओळख झाल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी जय्यत तयारीनिशी गेलो. आणि कोठेही वेळ न दवडता कार्यक्रम पाहू शकलो. पहिल्या दिवशी उस्ताद झाकीर हुसैन आणि नसरीन मुन्नी कबीर यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. कलाकार म्हणून मोठे असलेले झाकीर हुसैन, माणूस म्हणूनही किती निर्मल आहेत, सच्चे आहेत याचा प्रत्यय आला. नसरीन मुन्नी कबीर यांनी कमी शब्दांत पण प्रभावीपणे मुलाखतकाराने कसे समोरच्याला बोलण्यास उद्युक्त करावे हे सांगितले. हा कार्यक्रम सर्वांची मने जिंकून गेला.
'Banned in India' ही चर्चा देखील उद्बोधक होती. कोणतीही बंदी कशी घातली जाते, या बाबत कशी एकवाक्यता नाही, बंदी घालणारे कधी कधी पुस्तक वाचतही नाहीत, अशी भरपूर रंजक माहिती यातून मिळाली. ‘अठराव्या शतकातील भारत आणि बदलता समाज’ यावरही चर्चा झाली. या सगळ्या चर्चा ऐकताना जाणवले की बोलणारे वेगवेगळ्या देशातील लेखक असल्याने वेगवेगळे दृष्टिकोन समोर येत होते. आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावत असल्याची सुखद जाणीव पहिल्याच दिवशी झाली.
चर्चासत्राच्या प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम वेळेवर सुरू करणे, वेळेवर संपवणे, पाहुण्यांना आणणे-बसवणे, त्यांची ओळख करून देणे, त्यांच्या साडीला-शर्टला नीट माईक लावणे अशा कामांसाठी खास लोक नेमलेले होते. हे सर्व जण तिथे अदृश्य रीतीने खपत होते. दिसत नव्हते पण त्यांचे अस्तित्व जाणवत होते. या संपूर्ण परिसरात स्वच्छतागृहांची चोख व्यवस्था होती. चहा, खाणे-पिणे, या सगळ्याचीही सोय होती. कुठेही रोख पैशाचे देणेघेणे नव्हते. एका स्मार्ट कार्डची सोय होती. त्यात पैसे भरून इथे सर्व ठिकाणी खर्च करायचा, अन्यथा आपल्या डेबिट वा क्रेडिट कार्डाचा उपयोग करायचा. या सर्व गोष्टी विस्ताराने सांगायचे कारण, की हा महोत्सव यशस्वी होतो यामागे या काटेकोर नियोजनाचा मोठा भाग आहे.
संमेलनाचा पहिला दिवस छान पार पडला. आम्ही ठरवले होते, ते कार्यक्रम व्यवस्थित पाहिले. गर्दी होती पण आटोक्यात होती. दुसऱ्या दिवशी २६ जानेवारी असल्याने दुपारपासून प्रचंड गर्दी झाली. इतके की, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे कठीण झाले. यातील दरबार हॉल आणि बैठक या दोन्ही जागा बंदिस्त होत्या. त्यामुळे तिथे २००/२५० लोकच मावू शकत होते. चार बाग, फ्रंट लॅान, मुघल टेंट आणि संवाद हे मोठे आणि खुले मंडप असल्याने या ठिकाणी अधिक लोक बसू शकत होते. या दिवशी नवाजुद्दिन सिद्दिकी आणि नंदिता दास यांचा 'मंटो'वरील सिनेमासंदर्भात कार्यक्रम होता. याला प्रचंड गर्दी झाली. हा कार्यक्रम काही खास झाला नाही. पण मला waters of contention/Asian Faultlines ही चर्चा ऐकायची असल्याने मी मुघल टेंटमध्ये जायचे ठरवले. गर्दीमुळे या कार्यक्रमाच्या आधीची चर्चाही तिथेच बसून ऐकायची ठरवली. आणि ध्यानीमनी नसताना, ही चर्चाही अतिशय छान झाली. लैला स्लीमानी, हान, जॅनीस परायत या तरुण लेखिकांची माहिती झाली. 'words are all we have' या विषयावरील ही चर्चा फारच रंगली. या तरुण मुलामुलींचे मुक्त आणि प्रगल्भ विचार ऐकून खूप कौतुक वाटले.
या संमेलनात 'चीन ' या देशावर/विषयावर काही चर्चा झाल्या. चीनचे जागतिक राजकारणातील वर्चस्व आणि त्या देशाची एकाधिकारशाही हा येत्या काळातील आंतरराष्ट्रीय संबंधातील एक महत्त्वाचा मुद्दा असणार यात शंकाच नाही. चीनला कसे हाताळायचे ही अनेक देशांपुढील समस्या आहे. या विषयावर बोलणारेही लेखक-पत्रकार होते. चीनमध्ये काही वर्षे राहिलेले होते. त्यांचे विचार ऐकायला सर्वांनाच आवडले.
या संमेलनात अनेक साहित्य प्रकारांवरही चर्चा झाल्या. 'कादंबरी'वरील चर्चेत, कादंबरीचे भवितव्य काय यावर बोलताना एक जण गमतीत म्हणाला, 'काळजी करू नका. कादंबरी गेली अनेक वर्षे मरतेय.' थोडक्यात, जुन्या रूपात नाही, पण नव्या रूपात ती परत येतच राहणार आहे. रोहन मूर्ती यांनी भारतीय अभिजात साहित्य इंग्रजीत आणण्याची गरज व्यक्त केली. 'आधार' हा शब्द ऑक्सफर्ड शब्दकोशात घेतला त्यावर हिंदीत एक परिसंवाद झाला. ऐकायला खूप मजा आली. नाही म्हटले तरी, सतत इंग्रजी ऐकून थोडा कंटाळा यायचा. यात अशोक वाजपेयी, चित्रा मुद्गल, विनोद दुवा यांसारखे प्रसिद्ध लेखक होते. इंग्रजी-हिंदी शब्द एकत्र करून हिंदी भाषेचा अपमान करू नये, असे आग्रहाने चित्रा मुद्गल यांनी सांगितले. 'चलो इक बार फिरसे' या कार्यक्रमात ५०/६० च्या दशकातील गाण्यांवर, त्यातील साहित्य मूल्यांवर चर्चा झाली. त्या काळात साहिर, शैलेंद्र, मजरूह, हसरत जयपुरी, कैफी आझमी यांसारखे कवी, गीतकार म्हणून हिंदी सिनेसृष्टीत होते. त्यामुळे सिनेसंगीत असूनही या गाण्यांनी एक वेगळीच साहित्यिक उंची गाठली होती. त्यामुळेच ही गाणी आजही रसिकांच्या मनात आहेत. तरुण वर्गालाही ती आवडतात. आजच्या फिल्मी संगीतात मात्र तो हळुवारपणा, भावनांतील ती गहराई कमी होत चाललीय असे जाणवते.
विशाल भारद्वाज यांची मुलाखतही खूपच रंगली. मक़्बूल, ओंकारा, हैदर या तीन सिनेमांवर प्रामुख्याने चर्चा झाली. यातील काही दृश्येही दाखवण्यात आली. दरबार हॉलमध्ये 'vanishing step wells of India' यावर slide show व चर्चा झाली. भारतीय प्राचीन वास्तुशास्त्र, तरुण वास्तुशास्त्रज्ञांना शिकवत नाहीत. त्यामुळे एकेकाळी ज्या विहिरींनी आपली संस्कृती जपली, वाढवली, आपली तहान भागवली, त्या विहिरी आज नामशेष होत चालल्या आहेत यावर माहिती देण्यात आली. Itihas : Translating Historical Fiction या चर्चासत्रात विक्रम पांडे यांचे विचार ऐकायला मिळाले. त्यांनी 'श्रीमान योगी' या पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर केले आहे.
'पद्मावत' या सिनेमावर, पर्यायाने सेन्सॉर बोर्डावरही चर्चा होणे स्वाभाविकच होते. तशी ती झालीही. वाणी त्रिपाठी या कलाक्षेत्रातील मान्यवर असून त्या सेन्सॉर बोर्डावरही आहेत. त्यांनी एकही सीन न कापता पण ३/४ disclaimers देऊन सिनेमाला परवानगी देण्यात आली आहे हे स्पष्ट केले. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी मात्र महोत्सवाला येण्याचे रद्द केले. नाहीतर त्यांचे विचार ऐकायला मजा आली असती. पत्रकारिता, Dance of democracy यावर सगळ्यांनी आपले विचार मांडले. सुधीर चौधरी, विनोद दुआ, सचिन पायलट, पवन वर्मा, श्रीनिवासन असे ओळखीचे चेहरे या परिसंवादात होते. हमीद करझाई, सोहा अली खान या लेखकांची त्यांच्याच पुस्तकांच्या संदर्भात मुलाखत झाली. लेनिन, हिटलर या म्हटले तर जुन्या राजकारण्यांवरही कार्यक्रम झाले.
शशी थरूर यांच्या प्रकाशित झालेल्या नव्या पुस्तकाबद्दल ते बोलले. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. या व्यक्तीवर अनेक जण फिदा आहेत हे नक्की. ह्या आधी नयनतारा सेहगल यांचीही मुलाखत झाली. या दोघांनीही आपले हिंदुपण हे भाजपच्या हिंदुत्वाच्या व्याख्येपेक्षा वेगळे असल्याचे ठासून सांगितले.
जयपूर साहित्य संमेलनाचा शेवट एका वादविवादाने होतो. या वेळचा विषय हा ‘अजूनही पुरुष सहजपणे स्त्रियांवर अत्याचार करतात’ हा होता. कारण ह्या गुन्ह्याबद्दल होणारी शिक्षा ही कडक नाही आणि अशा अश्लाघ्य कृत्यांचा न्यायनिवाडाही लगेच होत नाही. त्याला खूप वेळ लागतो आहे असे मत पडले. यावर दुमत होण्याचे कारणच नव्हते. संमेलनात देश-विदेशातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. मंचावरून बोलणारे मात्र लेखक-साहित्यिकच होते. सरस्वतीचा इतरत्र होणारा अपमान ह्या ठिकाणी भरून काढला जात होता.
या महोत्सवातील सर्व कार्यक्रम ऐकणे हे अशक्यच होते. पण आता नव्या तंत्रज्ञानामुळे you tube वर या सगळ्या चर्चा तुम्ही घरबसल्या ऐकू शकता. या सर्व मेळाव्यात एक प्रकारचा सुसंस्कृतपणा जाणवला. गर्दीत/गोंधळातही एक शिस्त जाणवली. मतभेद असूनही कोठेही विरोधाचा टिपेचा सूर निघाला नाही. एका सुसंस्कृत समाजाचे हे छोटेखानी रूपच होते. आणि हे रूप पाहायचे असेल, अनुभवायचे असेल तर मात्र जयपूरलाच जायला हवे.
फार विचार करू नका, साहित्याच्या ह्या वारीत वारकरी बनून जरूर जरूर जा.
(हा लेख मार्च २०१८ च्या 'सत्यवेध' मासिकांत छापून आला आहे.)
No comments:
Post a Comment