G D Joshi एक उत्तुंग व्यक्तिमत्व


गोविंद दिनकर जोशी हे माझे मेहुणे, माझ्या मोठ्या बहिणीचे पती. त्यांचा जन्म १२ जून १९१७ रोजी झाला. १२ जून २०१७ त्यांचा हा जन्मशताब्दीचा दिवस त्यांच्या मुलांनी, मुलींनी जावयांनी त्यांच्या सुखद आठवणींना उजाळा देणारा "गोष्ट एका काळाची, काळ्या पांढऱ्या पडद्याची" हा छानसा कार्यक्रम करून साजरा केला. त्याची ही कथा.

माझे मेहुणे हे मूळचे पुण्याचे. त्यांचा विवाह १९४४ साली माझी मोठी बहीण (सध्या वय ९४) सुंदर हिच्याशी झाला, तेव्हा मी वर्षाचा होतो. लग्नानंतर त्यांचा मुक्काम तामिळनाडूतील मैलापुर या भागात होता. त्यानंतर आम्हाला कळायला लागेपर्यंत ते मद्रासला कसे गेले काय काम करीत होते याची काहीच कल्पना नव्हती. नंतर मोठ्या बंधूकडून आईकडून माझ्या बहिणीकडून कळले की ते मद्रासला सिनेमा इंडस्ट्री मध्ये संकलनाचे (Film Editing) काम करीत असत.

ते मद्रासला कसे गेले त्याचा एक वेगळाच किस्सा आहे. त्यांना बालवयातच सिनेमाविषयी आकर्षण होते. त्या काळाला साजेशी अशीच घरची परिस्थिती होती. आजूबाजूचे वातावरण देखील या परिस्थितीला साजेसेच. अशा परिस्थितीत त्यांनी चित्रपट क्षेत्राकडे जाण्याचा तिथेच काम करण्याचा ध्यास घेतला. त्याकाळच्या सनातन जमान्यात चित्रपट क्षेत्रात काम करू इच्छिणारे २५ /३० तरुण आपल्या ध्येयपूर्तीसाठी पोटापाण्यासाठी लाहोरला गेले. लाहोर ही त्यावेळी भारताची चित्रपट क्षेत्राची राजधानी होती. काही कालांतराने ते सर्वजण आपल्या नोकरीनिमित्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून दुसऱ्या सिनेनगरीत म्हणजे कलकत्त्यात आले.

१९३७ साली के.पी भावे निर्मित "दशावतारामुलू" या तेलगू चित्रपटाचे संकलन केले, त्यावेळी त्यांचे वय अवघे २० वर्ष होते. हा त्यांचा संकलित केलेला पहिला तेलंगु चित्रपट. १९३७ सालातच गोविंदराव, (त्यांना तिकडे जी.डीया नावाने ओळखायचे)  प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक सी. पुल्लया याची भेट झाली. पण त्यांनी सत्यनारायणव्रतम, कसुलपेरू, चाल मोहनरंगा या तीन चित्रपटाचे संकलनाचे काम केले. हे भारतातील पहिले थ्री इन वन चित्रपट! त्यानंतर त्यांनी मद्रासला आपले बस्तान हलविले. मराठी मातृभाषा असूनही, जिद्दीने तेलगू, तामिळ मल्याळम या भाषा व्याकरणासकट आत्मसात केल्या. पुढे अनेक उत्तम प्रसिद्ध तेलगू, तामिळ चित्रपटांचे संकलन (editing) या पडद्यामागच्या कलाकाराने यशस्वीपणे केले. या संकलकाचे भाग्य एवढे थोर, की त्यांच्या चित्रपट प्रवासात त्यांनी तीन मुख्यमंत्र्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटाचे संकलन केले. एक म्हणजे थोर मा. कैएन टी. रामाराव, माजी मुख्यमंत्री आंध्र प्रदेश दुसरे म्हणजे भारतरत्न कै. एम.जी. रामचंद्रन, माजी मुख्यमंत्री तामिळनाडू तिसऱ्या म्हणजे कै. जे.जयललिता, माजी मुख्यमंत्री तामिळनाडू.

सिनेक्षेत्रात कोणीही godfather नसताना त्यांनी या क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाने वेगळ्या पाऊलखुणा उमटविल्या. त्या काळी हे काम खूप कष्टाचे आणि जिकिरीचे होते. ध्वनिसंकलना बरोबरच positive/negative फिल्मचे मिश्रण करताना बराच वेळ लागायचा. एकाच कॅमेऱ्याने चित्रिकरण होत असल्याने, चित्रपटाची लांबी मोठी असायची. चित्रफित समोर ठेवून, संपूर्ण तीन तासांच्या चित्रपटाचे संकलन करणे किती अवघड जात असेल हे जाणकारांच्या लक्षात येईल. आजच्या काळात डिजिटलायझेशन झाले असल्याने काम तसे सुकर झाले आहे. चित्रपट संकलन हा कुठल्याही चित्रपटाचा अतिशय किचकट आणि महत्वाचा भाग असतो. तो चित्रपटाचा तारक मारक असतो

१९४९ साली खऱ्या अर्थाने त्यांचा तेलगू सिनेमाशी संबंध आला. तो त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा सुवर्णकाळच होता. जी.डी. म्हणजे गोविंदराव जोश्यांचे मुद्रणशास्त्र संकलन या दोन्हीत प्राविण्य होते. सरस्वती मूव्हीटोनचे managing director, श्री. आर. जी. तोरणे श्री. के. पी. भावे यांनी १९३७ सालीच प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा यथोचित गौरव केला होता

पुढे ते मद्रास येथील तत्कालीन चित्रपट महर्षी श्री. गुडवल्ली राम ब्रह्मम यांच्या संपर्कात आले. त्यांच्या "रायतूबिद्दा" या चित्रपटाचे संकलन करण्याची विनंती गुडवल्लींनी केली. यानंतर जी. डी त्यांच्या टीमचा एक महत्वपूर्ण भाग झाले. गोविंदरावही त्यांच्या दाक्षिणात्य चित्रपटातील यशाचे संपूर्ण श्रेय श्री. रामब्रह्मम यांनाच देत. त्यांनी ह्या काळात साधारणपणे १०० ते १५० चित्रपटाचे संकलन केले. त्यापैकी बरेच सिनेमे १०० दिवस, तर काही २५ आठवडे चालले. त्यांनी "सरस्वती मूवी पुणे, Quality Picture, आंध्र सिनेटोन, Janaki Picture, सारथी फिल्म्स अशा काही संस्थांसाठी संकलनाचे काम केले. यात १९४६चा रामदासु, श्रीकृष्ण पाण्डवीयं जयसिंहाम, बेमुलवाडा भीमकावी,संसारम, उम्मडी कुटुंबंम, पांडुरंग माहात्म्य अशा प्रसिद्ध चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल

महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर, अलका चित्रपटगृहाचे भास्करराव धारप, सदिच्छा चित्राचे श्री. दादा कोंडके, प्रसिद्ध लेखिका ज्योत्स्ना देवधर, कॅमेरामन गजानन जहागीरदार, आर्ट दिग्दर्शक व्ही.एस.घोडगावकर, लेखक विनायक देवरुखकर ह्या सर्वांशी त्यांचा जवळचा संबंध होता. मराठीतले "हळदी कुंकू", "वहिनींच्या बांगड्या" या सिनेमावर आधारित तेलगू सिनेमे त्यांनी काढले आणि ते पण खूप चालले. सदिच्छा चित्रचे निर्माते शाहीर दादा कोंडके एका पत्रात म्हणतात, आपण चित्रपट किती बारकाईने पाहता हे आपल्या थोड्याशा सहवासात आढळून आले. परप्रांतात राहूनसुद्धा आपण आपला लौकिक वाढविला त्याचे कौतुक वाटते.

त्यांच्या या क्षेत्रातल्या कार्याची दखल आंध्र सरकारच्या Department of Information & Public Relation घेतली आणि त्यांच्या डिसेंबर २०१६ च्या अंकात जी. डी. च्या कार्याची ओळख करून देणारा लेख प्रसिद्ध केला आहे.

माझे मेहुणे, आम्ही त्यांना काका म्हणायचो, कुटुंबवत्सल होते. जे काही काम ते करायचे ते फक्त कुटुंबासाठीच! त्यांची श्री दत्तगुरूंवर असीम भक्ती होतीपांढरे शुभ्र धोतर शर्ट कोट आणि काळीं टोपी असा त्यांचा पेहराव असे. त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण, संस्कार दिले. त्यांचा मुलगा बँक ऑफ इंडिया मधून निवृत्त झाला. मुलींनाही चांगले शिक्षण देऊन लग्नं करून महाराष्ट्रातच दिल्या आहेत

मी प्रथम १९७० मध्ये मद्रासला गेलो असताना त्यांच्याशी जवळून परिचय झाला . ते अत्यंत शांतपणे आणि मृदू आवाजात बोलत असत. त्यांच्याबरोबर मला आशिया खंडातील सर्वात मोठा स्टुडिओ विजया वाहिनीपहायला मिळाला. योगायोगाने एन. टी. रामराव यांचे शूटिंगही पाहायला मिळाले. जी. डीना दक्षिणात्य सिने इंडस्ट्रीत फार मान होता

एक मराठी माणूस, त्यावेळी तामिळनाडूसारख्या प्रांतात जाऊन, तामिळ-तेलगू-मल्याळम या अवघड भाषा व्याकरणासकट आत्मसात करतो सिने इंडस्ट्री मध्ये editing क्षेत्रात नाव कमावतो, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. अश्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाला त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा विनम्र अभिवादन.  


श्री. मोरेश्वर गाडगीळ
             
      .                                              

No comments:

Post a Comment