भागवत समर्पण एक अनुभव


मी व्यवसायाने शिक्षक. २३ वर्षांपूर्वी शासकीय महाविद्यालयातून गणिताचा प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो. जर मला एखादा सुंदर, गुळगुळीत कागद दिसला व मिळाला तर तो मी जपून ठेवत असे. त्यावर काही सुविचार लिहिणे, गणित लिहिणे हा माझा छंद. २०१४ च्या जुलै-ऑगस्ट मध्ये रायपूरला बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे आले होते. बाबांची जन्मशताब्दी असल्याने त्यांच्याकडून एक डायरी व सीडी मिळाली. डायरीचा कागद खूपच छान आणि गुळगुळीत असा होता. त्यागी पुरुषाची डायरी इकडेतिकडे टाकायची नाही, नेहमीकरिता आठवण राहील असे त्यात काहीतरी लिहावे असे माझ्या मनात आले. विचारांती ठरविले की यात श्रीमदभगवद्गीता (श्लोक) लिहून काढावी. ती संपूर्ण लिहून काढली. गीता लिहून काढल्यावर आता पुढे काय लिहावे याचा विचार करीत होतो. काही सुचत नव्हते. पण द्वारकाधीशाने त्याची तयारी आधीच करून ठेवली होती. 

ती अशी की, २०१५ च्या जानेवारी महिन्यात माझ्याकडे एक 'धर्मयज्ञ' नावाचे मासिक आले. या मासिकाचा मी वर्गणीदार नव्हतो. कोणीतरी माझा संपूर्ण अचूक पत्ता दिला होता. हे 'धर्मयज्ञ' मासिक गीता फौंडेशन, मिरज इथून आले होते. याचे संचालक श्री. दिलीप वासुदेव आपटे गुरुजी. भागवत ग्रंथावर त्यांचा हातखंडा. पावस येथे त्यांनी एक भागवत सप्ताह  केला. याला ४० ते ८५ वयोगटातील श्रोते उपस्थित होते. गुरुजींच्या मनात विचार आला की लोकांना भागवत संस्कृत संहिता लिहून काढायला प्रवृत्त करावे. त्यांनी मासिकात त्याची घोषणा केली व सांगितले की, "भागवताची संस्कृत संहिता लिहून काढा. स्वच्छ, सुंदर व शिस्तबद्धतेने संहिता लिहा.’ भागवतात बघून प्रत्येक श्लोक लिहायचा. एकूण श्लोक संख्या १८,००० व १२ स्कंध. काम सोपे नाही, पण अशक्यही नाही. लिहून झाल्यावर हस्तलिखित भागवत २०१६ मधील डिसेंबर महिन्यात गीताजयंती दिनी द्वारकेला जाऊन द्वारकाधीश चरणी समर्पित करायचे. 

लिखाणाकरिता कोणतीही अट नाही, पण लिहायचे. हे माझ्या वाचनात आले आणि निश्चय केला आपण संस्कृत संहिता लिहायची. त्याप्रमाणे दि. २१ मार्च २०१५ चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी पाडव्याच्या दिवशी लिहिण्यास प्रारंभ केला आणि दि. २४ फेब्रुवारी २०१६ माघ शुद्ध सप्तमी, रथसप्तमी या दिवशी संपूर्ण भागवत संस्कृत संहिता लिहून झाली. "निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ" याची प्रचीती आली.


भागवत समर्पणाची तारीख १० डिसेंबर २०१६ गीता जयंती हा दिवस होता. पण काही अडचणींमुळे ही तारीख बदलली व ती २३-१२-२०१६ ठरविली गेली. त्याप्रमाणे सर्वजण दि. १८-१२-२०१६ ला द्वारकेस एकत्र आले. संपूर्ण कार्यक्रम दि. १९,२०, २१आणि २२ असा होता. दि. १९ ला सकाळी सर्व जण रुक्मिणी मंदिरात आपापले लिखित ग्रंथ घेऊन जमले. तेथून कार्यक्रमस्थळी ग्रंथ शिरी घेऊन नाचतगात दिंडी स्वरूपात आले. त्यानंतर विधिवत समारंभ सुरू झाला. प्रथम मातृकापूजन, पुण्याहवाचन वगैरे केले गेले. दि.१९, २०, २१ या दिवशी दशम स्कंध पठणाद्वारे स्वाहाकाराच्या कार्यक्रमाचे आयोजन होते. दशम स्कंधाचे एकूण अध्याय ९० व श्लोकांची संख्या ३९४६. प्रत्येक श्लोक म्हणून स्वाहा म्हणत होमात आहुती द्यायची होती. दि..२२ रोजी पूर्णाहुती झाली. तिन्ही दिवस मिळून कृष्णजन्म, रुक्मिणी विवाह, दही हंडी इत्यादी मनोरंजक कार्यक्रम पण झाले. त्यानंतर दि. २२ रोजी सकाळी द्वारकाधीशाचे मंदिरातच सरस्वती पूजनासहित ग्रंथ समर्पणाचा कार्यक्रम झाला. श्रीकृष्णाच्या चरणी हस्तलिखित भागवत ग्रंथाच्या समर्पणाने एक मोठे कार्य आपल्या जीवनात साध्य झाल्याचे अतीव समाधान आणि जीवनाच्या साफल्याचा आनंद मिळाला.

भागवत ग्रंथासंबंधी


कलियुगात मनुष्यप्राणी कालरूपी सर्पाचे भक्ष्य झालेले आहेत. या त्रासाचा संपूर्ण नाश करण्यासाठी श्री. शुक्रदेवांनी श्रीमद् भागवत शास्त्रावर प्रवचन केले. राजा परिक्षिताला ही कथा सांगितली. यात व्यास, सूत, शौनक, नारद यांची प्रश्नोत्तरे आहेत. अनेक कथा यात आहेत. जशा दशावतार, भक्त ध्रुव, प्रल्हादचरित्र, समुद्रमंथन, वामन अवतार, श्री राम जन्म, श्री कृष्ण जन्म, रुक्मिणी विवाह, रासक्रीडा, परीक्षित मोक्ष, कृष्ण स्वधाम, दत्तात्रेय ऊपाख्यान इत्यादी.

संपूर्ण भागवत लिहिताना मला शुक्राचार्यांचा उपदेश आवडला व प्रत्येकाने आपल्या जीवनात त्याप्रमाणे वागण्याची प्रतिज्ञा करावी असे वाटते. शुक्राचार्यांनी आपल्या शिष्यांना मानवाच्या जीवनासंबंधी महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ते सांगतात, 
"धनं च भूमौ पदावश्च गोष्ठे, कांता गृहद्वारि जन: स्मशाने,
देहे चितायां परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छन्ति जीव एक:"

म्हणजे मानवाचा मृत्यू झाल्यावर, धन भूमीपर्यंतच राहणार, ते बाहेर येणार नाही, पशु गोठ्यापर्यंतच राहणार, पत्नी घराच्या दारापर्यंतच येणार, मित्रमंडळी स्मशानापर्यंतच, मृतदेह चितेपर्यंतच या त्या सीमा सांगितल्या. परंतु परलोक मार्गावर मात्र एकटा जीवच आपल्या जीवनात केलेल्या कर्मानुसार जातो. केवढा मोठा सिद्धांत भागवताने दिला आहे.

माझा एक विचार आहे तो सांगतो. ज्यांना शक्य असेल त्यांनी भागवताची संस्कृत संहिता लिहावी आणि हस्तलिखित द्वारकेला नाहीतर बंगलोरमधील इस्कॉन येथे श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित करावी. भागवत लिहिणे जमत नसल्यास, श्रीमद भगवद् गीता लिहून काढावी व तीच समर्पित करावी.


या संबंधी अधिक माहिती हवी असल्यास गीता फौंडेशन, चैतन्य, लोकमान्य सोसायटी, पंढरपूर रोड, मिरज ४१६४१०, महाराष्ट्र येथे संपर्क करावा. यांचे 'धर्मयज्ञ' मासिक पण खूप उद्बोधक असते. वयोवृद्धांकरिता अतिउत्तम आहे.

|| श्रीकृष्ण: शरणं मम ||

प्रो. कृष्ण गोपाल वैशंपायन



No comments:

Post a Comment