रात्रीचे बारा वाजून गेलेले. आमच्या आयुष्यासारखे – खरं तर जन्मासारखे. माझा जन्म म्हणे रात्री 12 वाजून 20 मिनिटांचा. त्यातही घोळ. मला जेव्हा शाळेमध्ये गणिताच्या पुस्तकात कालमापन शिकवलं गेलं, तेव्हा कधीतरी कळलं की रात्री 12 वाजेपर्यंत एक तारीख असते आणि बारानंतर पुढची तारीख. झालं, आपल्या जन्माच्या गडबडीत तेव्हा आजूबाजूला असलेल्या लोकांनी ती तारीख बरोबर लिहिली असेल कशावरून? चुकचुकली... पाल!
आईला
विचारलं. तिनं आपलं काहीतरी उत्तर दिलं. म्हणजे ते इतकं काहीतरी होतं की आता ते आठवतही नाही. पण
त्यानं माझं समाधान न झाल्याचं मात्र मला नक्की आठवतंय. आणि आता हा सल आपल्याला
आयुष्यभर असाच बाळगावा लागणार. स्वतःला जाणून घेण्याच्या प्रयत्नात,
आपला
जन्म किती वाजता, कुठल्या तारखेला झाला हेही माहीत असू नये हे केवढं दुःख! पण
आता हे कधीच न संपणारं दुःखं आपलंसं मानून हसून साजरं करायचं असं मी
लहानपणीच ठरवलं.
तसंही, कालमापनाची
संकल्पना कळेपर्यंत तर मी माझी वाढदिवसाची तारीख स्वीकारलेली होतीच की! त्यामुळे
इतकी वर्षं त्या तारखेला वाढदिवस साजरा करून मला त्या तारखेची आणि त्या तारखेलाही
माझी सवय झाली असणार. म्हणजे झालेली होतीच. आणि थोडी आवडायलाही लागली होती.
सम-विषम
संख्या कळल्या तेव्हा जगातल्या – माझ्या विश्वातल्या
- असतीलनसतील त्या सर्व संख्यांचे सम-विषममध्ये वर्गीकरण करून झाले. काहीही कारण
नसताना सम संख्या अधिक आवडायच्या. विषम संख्या आल्या की मन खट्टू व्हायचं. पुढे सम
संख्या आवडायला अजून काही काही कारणं मिळत गेली. तीही काही खास कारणं अशी नाहीच.
गणितातल्या आवडत्या-नावडत्या क्रिया. संख्येला पूर्ण भाग गेला की आनंद व्हायचा.
बाकी काही राहू नये असं वाटायचं. आयुष्याचंही असंच असेल का? पूर्ण
भाग जावा... बाकी काही राहू नये. सम संख्यांना पूर्ण भाग जातोच जातो, म्हणून
त्या आवडू लागल्या.
मग पुढे
2, 3, 4, 5, 6, 8, 9, 11 यांच्या कसोट्या आयुष्यात
उतरल्या. त्याला कसोटी का म्हणतात मला ठाऊक नाही. म्हणजे किती वेगवेगळ्या
गोष्टींना कसोटी म्हणतात... कसोटी सामने असतात क्रिकेटचे आणि अजूनही असं काही...
आणि या गणितातल्या कसोट्या. सुदैवाने, कसोट्यांनी माझी
कसोटी पाहिली नाही. मी ते शिकल्यापासूनच मला तो प्रकार एवढा आवडायचा की बस... घे
संख्या की लाव कसोटी... दे धमाल!
कश्शाकश्शावरचे
आकडे सोडले नाहीत तेव्हा मी. चौथीच्या स्कॉलरशिपमुळे लागलेल्या सवयी मी अगदी
आत्ताआत्तापर्यंत सोडवत होते (म्हणताना, सोडाव्यात असं
काही फारसं मनातही नव्हतं, तशी गरजही
नव्हती आणि त्यासाठी खास वेगळे प्रयत्नही नव्हते.)
रस्त्यावर
जायला तेव्हा एवढं आवडायचं, कारण तिथे अमर्याद संख्यांचा खजिना होता. अतिशय
रहदारीच्या रस्त्यावर तर अजूनच मज्जा. प्रत्येक गाडीबरोबर तिला लागून तिची
नंबरप्लेट यायची आणि हेच ते आमचं गाड्या आवडण्याचं कारण असायचं. पुढे कॉलेजात
गेल्यावर रस्त्यावरून जाणार्या गाड्यांकडे मित्र वळूनवळून बघायचे तेव्हा कळायचंच
नाही, गाडीत रंग आणि नंबरप्लेट यांशिवाय बघण्यासारखं काय असतं! पण त्या
माझ्या चौकस नजरेच्या मित्रांना, स्त्रीच्या देहाचे सुलभ वक्राकार जसे जाणवायचे
तसेच कारच्या देहाचेही दिसायचे, चालायची चार आणि
चालवायचे एक चक्र सोडून इतरही!
असो. तर
सम संख्यांना तर 2, 4, 8 आणि कधी कधी 6 अशा
एवढ्या कसोट्या लावता यायच्या. आणि मग 16, 24, 32 यासारख्या
सगळ्यांनी भाग जाणार्या संख्या सापडल्या की अजूनच छान वाटायचं. 16,
24, 32 म्हणजे अगदी आपल्या गोड माणसांसारख्या. ज्यांचं सगळ्यांशी जमतं.
कोण्णाशी भांडण नाही आणि मुख्य म्हणजे सगळ्यांच्या गळ्यातला ताईत असणार्या.
खरंतर
आपलं आकड्यांशी नातं इथेच संपत नाही. एवढंच की काही नाती जन्मभर आठवत राहतात तर
काही लवकर विसरली जातात. काही जन्मभर सोबत असूनही लक्षात राहात नाही, जसा की
चष्म्याचा नंबर! ह्या निमित्ताने तुम्हालाही पाहायचंय का तुमच्या नात्यांकडे अधिक
सजगपणे?
No comments:
Post a Comment