अहिल्या

कोण होती अहिल्या ? पंचकन्यापैकी एक. ब्रह्माची निर्मिती. एक अप्रतिम सौंदर्यवती. गौतम ऋषींची पत्नी. एक पतिव्रता स्त्री! पण तिच्या सौंदर्यावर इंद्रदेव भाळले आणि त्याचा दोषही तिलाच लागला. अहिल्येच्या या गोष्टीत सगळीकडे पुरूषच आहेत. ब्रह्माने तिला निर्माण केली. या आपल्या कन्येसाठी गौतम ऋषी हेच योग्य वर आहेत, असे वाटून अहिल्येचे तिच्याहून वयाने खूप मोठ्या असणाऱ्या या तपस्व्याशी ब्रह्माने लग्न लावून दिले. या ऋषींनी, आपल्या या सौन्दर्यवती पत्नीच्या सौंदर्याला एक पुरुष म्हणून, पती म्हणून न्याय दिला असेल? कल्पना नाही. या सौन्दर्यवतीवर इंद्रदेव मोहित झाले. ही सगळी गोष्ट आपल्याला माहित आहेच.

पण आज ही गोष्ट आठवण्याचे कारण? सुजॉय घोष या बंगाली दिग्दर्शकाची 'अहिल्या' नावाची एक शॉर्ट फिल्म आहे. चौदा मिनिटांची छोटीशी फिल्म! पण खूप विचार करायला लावते. याही सिनेमात एक सुंदर स्त्री आहे. तिचा वयस्कर नवरा आहे. त्याचे नाव गौतम साधू! आणि इंद्र सेन नावाचा एक पोलीस अधिकारीही आहे. नायिकेचे नाव अहिल्या आहेफिल्मचे नावही अहिल्या आहे.

इंद्र सेन हा पोलीस अधिकारी एका अर्जुन नावाच्या बेपत्ता झालेल्या माणसाच्या शोधार्थ गौतम साधू या कलाकाराच्या घरी येतो. तिथे त्याला अर्जुनसारखीच दिसणारी एक छोटी बाहुली दिसते. तशा तिथे अजून पाच-सहा बाहुल्याही दिसतात. सर्व बाहुल्या या पुरुषांच्याच असतात. या सर्व कलाकृतींचे / बाहुल्यांचे श्रेय गौतम साधू आपल्या पत्नीला देतात. असं का? हे फिल्म पाहिल्यावरच समजेल सर्वांना.

ही फिल्म पाहून अनेकांच्या मनात अनेक विचार आले असणार. मला मात्र ही फिल्म पाहून अहिल्येला काव्यात्म न्याय मिळाला असे वाटले. अहिल्येचे दगडात रुपांतर होण्याचा शाप गौतम ऋषींनी तिला दिला. खरे तर, इंद्राचे मन अहिल्येकडे आकृष्ट झाले होते. तिच्या कडून नकळत चूक झाली होती. पण दगडात रुपांतर मात्र अहिल्येचे होते. ती पावन होते ती देखील रामाच्या पदस्पर्शाने!
या फिल्ममध्ये मात्र नायिकेवर आकृष्ट होऊन तिला भोगणाऱ्या सर्व पुरुषांची बाहुली बनते. आणि याला उ:शाप नाही.

अहिल्येच्या पुराणातल्या गोष्टीत 'अहिल्या' आहे, ती फक्त नावाने! एक जिवंत, हाडामांसाची स्त्री म्हणून ती कुठेच दिसत नाही. तिला दगडात रुपांतर होण्याचा शाप गौतम ऋषी देतात. पण मुळात तिच्या असण्याचा, तिच्या भावभावनांचा ते कधी विचार करतात का? रामाच्या पदस्पर्शाने ती पावन होते, म्हणजे परत जिवंत होते. पण पुढे काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पुराणातून मिळत नाहीतच.

'अहिल्या' या शॉर्ट फिल्ममध्ये मात्र बाहुली झालेले पुरुष पाहून आजच्या काही अंशी बदलत्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन घडते. फिल्म एका पुरुषानेच लिहिली व दिग्दर्शित केली आहे हे विशेष!
पुराणातल्या पंचकन्यांना देवत्वाची उपाधि देऊन एका बाहुलीत त्यांचे रुपांतर केले आहे. पण आजच्या अहिल्येला तरी एक हाडामांसाची जिवंत स्त्री म्हणून जगता यावे अशी आशा करायला हरकत नसावी. अहिल्या, गौतम, इंद्र, पुरुषी मानसिकता, स्त्रीची लैंगिकता याचा पुनर्विचार या चौदा मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममुळे झाला, हे ही नसे थोडके!                                                                                                            
असे म्हणतात, की कलाकृती आस्वादकाच्या नजरेतून खुलते. कलाकृती ही एखाद्या लोलकासारखी असते. प्रत्येकाला त्यातून नवे काही सापडू शकते. सगळयांनी ही फिल्म पाहून जरूर तुमची मते कळवा. बघू तुम्हांला काय जाणवते.


- स्नेहा केतकर



No comments:

Post a Comment