वैदिक काळात भारतात
स्त्री चांगल्या अर्थाने मुक्त होती. विचार, आचार, अनेक प्रकारची शास्त्रे इत्यादी विषयांत सर्वोच्च नैपुण्य संपादनाचे असणारे
स्वातंत्र्य गार्गी व तत्सम स्त्रियांच्या रूपाने आजही
आपणास परिचित आहेच. रामायण-महाभारत काळातही रूढ अर्थाची शिक्षण पद्धती नसली तरी
जीवनासाठी, व्यवहारासाठी लागणारे शिक्षण आणि विद्या उपलब्ध असल्याचे अनेक दाखले
सीता, कैकयी, द्रौपदी, सुभद्रा यांच्या रूपात आढळतात.
त्यानंतर मात्र झालेली परकीय आक्रमणे, स्वार्थी राज्यसत्ता, प्रजेला आलेली मरगळ, अंधश्रद्धा, कर्मकांडं याला आलेले अवास्तव महत्त्व स्त्रियांच्या गळचेपीला
कारणीभूत ठरले आणि स्त्री स्वतंत्रं
अर्हति चा अतिरेक समाजात पसरला. संपूर्ण देशच
थंड गोळ्यासारखा झाला. याला चेतना देण्याचे काम संतांनी केले. रामदासांनी ‘सामर्थ्य
आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे’ या उक्तीने अवघा महाराष्ट्र जागवला.
याला स्त्रियाही अपवाद नव्हत्या. रामदासांनी आपल्या
क्षेत्रात स्त्रियांना प्रवेश देऊन शिकवले, इतकेच नव्हे तर त्यांच्यातील कुवत
पाहून अधिकारी पदेही दिली. वेणा बाई ही पहिली स्त्री मठाधिपती. तिच्यासाठी त्या
काळात लोकवादालाही
सामोरे जायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. ज्ञानेश्वरांची मुक्ताबाई, नामदेवांची जानाई, तुकारामांची बहिणाई या देखील
संतपदाला पोहोचल्या.
यानंतर अनुक्रमे राजाराम मोहन रॉय, महादेव गोविंद रानडे, आगरकर, महात्मा
फुले, महर्षी कर्वे यांनी स्त्रियांना शिक्षण, चालीरिती, रूढीपरंपरा, गुलामी
यातून बाहेर काढून जगाचे दार त्यांच्यासाठी खुले केले.
कर्नाटकात हे कार्य एम. व्ही. ऊर्फ सर विश्वेश्वरैया
यांनी केले. त्यांनी स्त्रियांबद्दलचे आपले विचार अतिशय स्पष्टपणे मांडले आहेत त्यांनी
त्यांच्या कार्यात स्त्री-पुरुष हा भेद मांडला नाही. यांच्यामुळेच मुलींना
प्राथमिक शिक्षणाची दारे खुली झाली. त्यांनी स्त्रियांबद्दलचे आपले विचार
स्पष्टपणे मांडले आहेत. ‘स्त्रियांनी शिकावे, स्वावलंबी व्हावे,
प्रत्येक गोष्टींसाठी नवऱ्यावर अवलंबून राहू नये, आपले
निर्णय आपण घ्यावेत, स्त्री आहोत म्हणून मर्यादितच राहिले
पाहिजे अशा अनावश्यक गोष्टी सोडाव्यात, अकारण लाज टाकून
द्यावी, धीटपणे उभे राहून नवऱ्याच्या खांद्याला खांदा
लावून संसार करावा; आत्मविश्वास आणि धैर्य यशस्वी जीवनाचा पाया आहे हा मूलमंत्र
विसरू नये.’ असे त्यांचे विचार होते. या विचारांचे कृतीत रूपांतर करण्याचा प्रयत्न
त्यांनी आयुष्यभर केला. म्हैसूर, बंगळूर इत्यादी ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज काढून
उच्च शिक्षणास प्रवृत्त केले. कला, वाणिज्य, तंत्रशिक्षण घेणे सुलभ, संरक्षित
व्हावे म्हणून म्हैसूर येथे मुलींसाठी तीन मजली वसतिगृह बांधले.
वैयक्तिक पातळीवरही त्यांनी आपल्या पुतण सुनेला, जी
लग्नाच्या वेळी मॅट्रिकपर्यंत शिकली होती, तिला पदवी
घेण्यासाठी प्रोत्साहित केले. पदवी मिळवल्यावर i am proud of you म्हणून पत्र लिहिले. सोनसाखळी भेट म्हणून दिली.
मुलींनी शिकले पाहिजे याबाबत ते आग्रही होते. फक्त
शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील शेतकरी व महिला यांच्या करता शेतीला पूरक
लघुउद्योग चालू करावे असा विचार त्यांनी मांडला. गावातील प्रत्येक घर हे निर्मितीक्षेत्र
व्हावे असे त्यांचे म्हणणे होते. त्यातही महिलांचा सहभाग त्यांनी महत्त्वाचा मानला. प्रशिक्षण वर्ग घेऊन त्यांना स्वावलंबी करावे
व आत्मसन्मानासाठी जागृत करावे यासाठी ते कृतिशील राहिले.
शिक्षित कृतिशील महिलांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता.
श्रीमती ठाकरसी या उच्चशिक्षित व स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीमंत महिला.
त्या महिनाभरासाठी म्हैसूरला आलेल्या असताना त्यांच्या निवासासाठी विश्वेश्वरय्या
यांनी स्वतः बंगला भाड्याने घेऊन
त्यांची बडदास्त ठेवून सन्मानित केले.
व्यक्तिगत पातळीवरही परिचयातील परित्यक्ता विधवा
महिलांना आपल्या पगारातून दरमहा मदत पाठवून त्यांचे जीवन सुसह्य करण्यास यांनी
आयुष्यभर मदत केली. असा प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त होणारा नेता मिळणे फार अवघड.
पाणी, धरणे, उद्योगधंदे, शिक्षण, कारखाने इत्यादिक क्षेत्रातील त्यांची कामेही महान आहेतच; पण त्याबद्दल
पुन्हा केव्हातरी. इथे मी फक्त त्यांनी महिलांच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याचा
मागोवा घेतला आहे. अशा या द्रष्ट्या, कृतिशील, देशाभिमानी व्यक्तिमत्त्वाच्या ऋणात राहून त्यांचे कार्य डोळसपणे पुढे
नेण्यासाठी प्रत्येक देशवासियांनी कटिबद्ध राहिले पाहिजे इतकेच!
मीरा मुकुंद
No comments:
Post a Comment